Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Goa Lifestyle: शाश्‍वताच्या मेरूशिखरी

Goa Lifestyle: शतकापूर्वी आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेच्या बाबतीत बहुतांशी उत्पादक व ग्राहक या दोन्ही भूमिका बजावत होतो. त्यात पहिला स्तर होता कुटुंब व दुसरा होता गाव यात दैनंदिन गरजा पुरविणारी शाश्‍वत स्वरुपाची व्यवस्था गाव ही होती. काही मोजक्याच गरजा गावाबाहेरून पुरविल्या जात.

दैनिक गोमन्तक

Goa Lifestyle: लाट येवूं द्या कधीही

वाट नाही बदलती

शाश्‍वताच्या मेरू शिखरी

दृष्टी राहो अढळ ती

नवयुगाची दोन पिढ्यांची उत्सवी वाटचाल करीत पोचलो विनाशाच्या कड्यापर्यंत. शतका-सहस्त्रकांच्या यात्रेत संकटे बरीच आली होती. पण सर्वनाशाचा कडा कधी पाहिला नव्हता. थांबता येत नाही. मागे वळता येत नाही.

काळ पुढे रेटती असतो. नवी वाट कशी शोधायची? जगण्याची जुनी पथ्ये होती. बघूया त्यात आजच्यासाठी काही तथ्ये सापडतात का? दिवसाची सुरुवात व्हायची सुर्योदयाच्या बऱ्याच पूर्वी. त्यासाठी झोपणे लवकर व्हायचे.

ऊर्जेच्या आजच्या तीव्र टंचाईच्या काळात 10-15 टक्के घरगुती वीजवापरात बचतकेवळ दिनकर्म बदलल्यामुळे होऊ शकेल. हे ही नसे थोडके! शिवाय सूर्योदयापूर्वी शुध्द तजेलदार शीतल हवेत फिरून आल्यास ती ताजगी दिवसभर टिकते. हे दान नाही लहान.

धान्य, फळे, भाजीपाला, दुधदुभते, मांसमासळी आपल्या किंवा आजुबाजूच्या गावातील असणे ही स्थिती गेल्या शतकाच्या मध्यापर्यंतची. आज तांदूळ आंध्रांतून, गहू पंजाबमधून, भाजीपाला बेळगाव -कोल्हापूरवरून. फळे? महाराष्ट्र कर्नाटक ते थेट हिमालयातून, परदेशाहूनही!

दुधदुभते महाराष्ट्र कर्नाटक व गुजरातमधून सुध्दा मांस बाहेरून. भरपूर मोठा समुद्रकिनारा लाभला असला तरी मासळी काहीवेळा बाहेरूनही फार्मेलीनने टिकवलेली विषारी मासळी!इमारतींसाठी सिमेंट, पोलाद बाहेरून- टाईल्स, लाकूड, खिडक्या दारे काचा, प्लबिंगचे, वायर-स्वीच -बल्ब विजेचे सामान बाहेरचे बहुतांश वीज बाहेरची कामगारसुध्दा बाहेरचे.

जेसीबी ट्रक कारपासून मुलांची खेळणीसुध्दा बाहेरील. चकाचक सजलेल्या बाजारपेठांत किमान ९० टक्के माल बाहेरचा. शेकडो हजारो किलोमीटरचा. त्यात चीनचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात. आपले मुख्यमंत्री ‘स्वावलंबी गोव्या’ ची घोषणा करतात. ती केवळ घोषणाच का त्यामागे काही कार्यक्रम आहे?

स्वावलंबनाचा कार्यक्रम नरेंद्र मोदींनी जाहीर केला तो राष्ट्रस्तरावर. तांत्रिक, संरक्षण विषयक व आर्थिक स्तरावर. त्याची बांधणी दैनंदिन गरजांसाठी सुक्ष्म स्तरावर होईल तेव्हाच त्याचा परिणाम जाणवेल. व्यक्ती-कुटुंब- गांव या क्रमाने जाऊं त्यावेळी पायापासून बांधणी होऊ शकेल. विकासाला स्वावलंबनाची जोड मिळाली तरच तो टिकाऊ ठरेल. आज उभारले, उद्या उचलले असा मांडव तंबूंचा देखावा म्हणजे विकास नव्हे.

पोलिथिनच्या, पिशव्या, कुंड्या जमवून कृषिमेळा करता येतो. अन्न घटकांचे स्वावलंबन हवे असल्यास पिकाचे नियोजन व प्रत्यक्ष लागवड करावी लागते. त्यासाठी हात व मने यांना प्रशिक्षण लागते.

शतकापूर्वी आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेच्या बाबतीत बहुतांशी उत्पादक व ग्राहक या दोन्ही भूमिका बजावत होतो. त्यात पहिला स्तर होता कुटुंब व दुसरा होता गाव यात दैनंदिन गरजा पुरविणारी शाश्‍वत स्वरुपाची व्यवस्था गाव ही होती. काही मोजक्याच गरजा गावाबाहेरून पुरविल्या जात.

ही व्यवस्था काही सहस्त्रके चालली. कारण त्या व्यवस्‍थेच्या ढांच्याची आखणी काही शाश्‍वत तत्वांच्या आधारावर घडली होती. साधारण पाऊण ते एक शतकापूर्वी यंत्रयुगाने दिलेली दगडी कोळसा, खनिज तेल या जीवाश्‍म ऊर्जेवर चालणारी वाहने आली, यंत्रे आली, वीज आली.

आणि जलद वाहतूकीच्या साधनांद्वारे व्यापारव्यवस्थेने पाय रोवले. उत्पादक -व्यापारी-ग्राहक अशी त्रिस्तरीय व्यवस्था आली. ही निसर्गतत्वांच्या विरूध्द असल्याने निसर्गच धोक्यात आला. व्यवस्था ही अशाश्‍वत बनली. निसर्गाला ओरबाडून स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात सृष्टीचा भांडवलाची कोठारे रिती होऊ लागली.

सृष्टीचा समतोल ढळूं लागला. पृथ्वीचे, समुद्राचे तापमान वाढू लागले. चक्रीवादळांची वारंवारिता वाढली. ऋतुचक्र अस्थिर बनले. भलत्या वेळी अकल्पित ठिकाणी ढगफुटी, महापूर, यानी गावे शहरे बुडू लागली.

पर्वतउतार, डोंगरकडे ढांसळू लागले. वस्त्या, गावे त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जाऊं लागली. मोठ्या शहरातील हवा धुरकट बनली. अति प्रदुषणाच्या मर्यादाही उल्लंघल्या जाऊ लागल्या. शाळा कॉलेजना सुट्टी, कार्यालये बंद जाहीर करावे लागले. दिवासाची विमानेही रद्द करण्याचे जाहीर करावे लागले.

या सर्वांचे प्रमुख कारण ठरले वरील ऊर्जास्त्रोतांचे ज्वलन. सौरऊर्जा, पवनऊर्जा, हायड्रोजन वगैरे स्वच्छ व शाश्‍वत ऊर्जास्त्रोत हे जीवाश्‍म ऊर्जास्रोतांना पर्याय ठरू शकतील एवढ्या ताकदीने उभे राहू शकले नाहीत.

याकरिता विश्वाला अशाश्‍वती देणाऱ्या आजच्या व्यवस्थेलाच पर्याय ठरेल अशी व्यवस्था निर्माण करणे हाच यावर एकमेव उपाय ठरतो. अर्थात आजच्या व भविष्यातील शाश्वत आरोग्यपूर्ण परिस्थितीसाठी संयुक्तिक ठरेल नाही याची तपासणी करण्याची गरज आहे. पहिल्या व दुसऱ्या परिच्छेदात आजच्या गरजांची ढोबळ जंत्री आलेली आहे त्याचे अवलोकन केल्यास त्या सर्वांचा समस्याप्रधान असा एक समान धागा ठरतो तो म्हणजे बहुतांश जीवनावश्यक वस्तू.

लांबून वाहतूक करून आणण्याचा आणि त्यात जीवाश्‍माचे जे प्रचंड प्रमाणात ज्वलन होते त्यातून होणाऱ्या वैश्विक प्रदूषणाचा. दुसरी गोष्ट ही केंद्रीकरण प्रधान व्यवस्था निसर्ग प्रकृतीच्या विकेंद्री व्यवस्थेच्या पूर्णपणे विरुद्ध टोकाची असल्याने तिचे सृष्टीशी कधीच जमणार नाही हेही स्पष्ट दिसते. प्राणिमात्राच्या आयतेपणाच्या सुखलोलुपतेच्या दुर्बलतांना चुचकारून त्याची शक्तीस्थाने उद्ध्वस्त करणारी व त्याला सदैव गुलाम बनविणारी बाजारव्यवस्था व राज्यव्यवस्था यांवर पूर्णपणे अवलंबून राहिल्याने ही परिस्थिती उद्‍भवली आहे.

आपली कार्यशक्ती, प्रतिभा, सृजनता आपण गंजू दिल्या आहेत. सृष्टीने आपल्या आवतीभोवती विकेंद्रितपणे मांडून ठेवलेली ताजी अस्सल दर्जाची साधनसामुग्री कुजत पडलेली आहे आणि व्यवस्थेने आपल्या गव्हाणीत आणून टाकलेल्या शिळ्या चाऱ्यांवर आपण सुख मानायला लागलो आहोत.पिंजऱ्यात पक्ष्याला अडकवून काही महिने ठेवला की मालक पिंजऱ्यात चार दाणे टाकतो त्याचीच सवय होते.

नंतर पिंजरा उघडा टाकला तरी तो पक्षी बाहेर छोटीशी फेरी मारून पुनः पिंजऱ्यातच दाणे खायला येतो. कारण रानातून आपले अन्न मिळविण्याचे कौशल्य व आत्मविश्‍वास तो गमावून बसलेला असतो. आपली अवस्था काहीशी तशीच बनलेली आहे.

यासाठी आत्मबलाची जोपासना करायची आहे. आत्मविश्‍वास पुन- मिळवायचा आहे. स्वावलंबनाचा जुना वारसा जागवायचा व नव्या रुपाने पुढे आणायचा आहे. सृष्टीसदैव आपल्या साथीला आहे कुणाशी संघर्ष नाही. संग्राम नाही. संगीत आहे. सृष्टीच्या पार्श्‍वसंगीताबरोबर गायलेल्या आत्मस्वरांचे. बाजार व्यवस्‍थेतील वरील दोष प्रोझ्युमर व्यवस्थेत रहात नाहीत जागेअभावी हा विषय पुढील लेखात चालू राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT