Crime In Goa: देशात हुंडाबंदी कायदा होऊन ६२ वर्षे उलटली तरी हुंड्यापायी मुलींचा न थांबलेला छळ लज्जास्पद आहे. विवाह संस्कृतीमध्ये बदल होत गेले तरीही मुलगी नांदवून घेण्यासाठी जावयाला भरीव रक्कम किंवा खिसा फाटेल एवढी महागडी भेट देण्याची प्रथा थांबलेली नाही.
योग्य तो मोबदला मिळाला नाही तर लग्न करून पतीच्या घरी आलेल्या नववधूला ज्या अनन्वित अत्याचाराला सामोरे जावे लागते, त्याच्या कहाण्या सुन्न करणाऱ्या आहेत. गोव्यात तसे प्रकार फार घडत नसत. परंतु हल्लीच्या काळात घडलेल्या शिवानी राजवत, दीक्षा गंगवार व सामंता फर्नांडिस या हुंडाबळी प्रकरणांना मुळीच दुर्लक्षून चालणार नाही.
विकासाच्या नावाखाली ‘कॉस्मोपॉलिटन’ बनल्यावर त्याचे ‘साइड इफेक्ट’देखील समोर येतात. माणसाचा जीवनाकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन गुन्हेगारी प्रवृत्तीला पूरक ठरला आहे. शिवानी, दीक्षा या सुखी संसाराची स्वप्ने उराशी बाळगून आपल्या पतीसोबत उत्तर भारतातून गोव्यात आलेल्या.
पुरुषसत्ताक मानसिकतेने त्यांचा घात केला. वास्को येथे नौदलात काम करणारा अनुराग राजवत २० लाखांसाठी पत्नी शिवानीसह सासूचा गॅसगळती घडवून जीव घेतो; १२ लाखांसाठी पती गौरव दीक्षाला पाण्यात बुडवून मारतो; सामंता सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलते हे धक्कादायक व शोचनीय आहे.
समस्या दूर करण्याचे हत्या हे जणू साधन झाले आहे, अशा आविर्भावात गुन्हे घडत आहेत. समाज म्हणून आपण त्याकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे. गोवा, कोकण प्रांताला सुदैवाने हुंडा पद्धतीचा शाप नाही.
तीन दशकांपूर्वी आलेल्या ‘पुढचे पाऊल़’सारख्या चित्रपटांनी हुंडाबळीविषयक समाजात प्रबोधन झाले. परंतु राज्याच्या तथाकथित विकासाच्या परिघात बाहेरून आलेल्या अपप्रवृत्ती सामाजिक पोत बिघडवत आहेत. इथे आपणाला कोणी ओळखणारे नाही, ही जाणीव गुन्हेगारी प्रवृत्तीला पोषक ठरते, अर्थात ते गोव्यातच घडते असे बिलकूल नव्हे. परंतु भविष्याचा वेध घेताना त्याचा विचार क्रमप्राप्त ठरतो.
हुंडाबळी असो वा अन्य गुन्हेगारी, त्याचा सामाजिक अंतरंगावर विपरीत प्रभाव पडतोच. डोंगर बोडके करून, जिथे मोकळी जागा दिसेल तेथे निवासी प्रकल्प उभे राहत आहेत. बाहेरील राज्यांतून गोव्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
त्या दृष्टीने जोवर आपला धोरणात्मक आवाका विस्तारत नाही तोवर ‘निकोप पर्यटन’ ही संकल्पनाही दिवास्वप्नच ठरेल. गोवा म्हणजे चंगळ अशी प्रतिमा बदलावी लागेल. इथे येणाऱ्या देशी पर्यटकांत कुटुंबासोबत नव्हे तर घोळक्याने येणारे पुरुष त्याची साक्ष देतात.
पर्यटन खात्याने धार्मिक पर्यटनाची गरज ओळखून राज्यातील ११ मंदिरांवर लक्ष केंद्रित केले हे बरेच झाले. चंगळवादाच्या पलीकडे जाऊन नवा आयाम मिळण्यास ते साह्यभूत ठरेल. गोव्यात काहीही केले तरी खपून जाते, हा दृष्टिकोन त्यामुळे बदलेल.
गुन्हेगारी प्रवृत्तीला व इतरत्र उघडपणे करण्यास न मिळणारे कौटुंबिक गुन्हे इथे सहज करता येतात, कुणी विचारणारे नाही, ही गोव्याविषयी झालेली धारणा या प्रकारची कृत्ये गोव्यात सातत्याने घडण्यास कारणीभूत आहे.
गुन्हेगारी कृत्यांत गोवेकरांचा सहभाग नाही किंवा नगण्य आहे, यावर समाधान मानणे घातक ठरेल. गोमंतकीय मूलतः हिंसक नाही, तो समाधानाने जगणारा आहे. पण, अशा अनियंत्रित व बदलत जाणाऱ्या सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम समाजावर काही प्रमाणात तरी निश्चितच होतो.
गोव्यातील ग्रामीण भागांत असलेला सामाजिक एकोपा, आपुलकी व विचारपूस करण्याची प्रवृत्ती शहरी भागांत कमी होत चालली आहे, हा या सर्व घटनांचा लहानसा परिणाम. आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतेय, याची साधी माहितीही असत नाही. भाडेकरू ठेवताना कुठलेही कागदपत्र न घेणे, न पडताळणे व त्याची खबर पोलिस यंत्रणेला न देणे, इतपत गोमंतकीय बेफिकीर झाले आहेत.
त्यामुळे गोव्याच्या संस्कृतीशी परिचित नसलेले, जुळवून घेऊ न इच्छिणारे अनेक समाजघटक आपल्याभोवती त्यांचे आचार-विचार घेऊन वावरतात. त्याचा परिणाम गोमंतकीय समाजजीवनावर होतो. गुन्हेगारीपेक्षाही गोमंतकीय समाजमनावर कळत नकळत होणारा हा प्रभाव आपल्या पुढील पिढीवर निश्चितच होईल. गुन्हेगार गोमंतकीय नाहीत, या दिलाशापेक्षा समाजजीवनावर हळूहळू होणारा प्रभाव फार घातक आहे. सातत्याने वाढत जाणाऱ्या या घटना म्हणूनच चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.