मोरजी : चावदेवाडा-पार्से येथील दिगा पोळजी या युवकावर काल रात्री (17 जून) रोजी आठ वाजता बिबट्या वाघाने तुये येथे हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी दिगा हा दुचाकी वाहनावर होता. बिबट्याने झेप घेऊन त्याच्यावर हल्ला केला त्याच्या पायाचा चावा घेतला.
दुचाकीने तसेच पायाने जोरात धडक देऊन दिगाने कसाबसा आपला पाय वाघाच्या तोंडातून हिसकावून घेतला आणि तशाच गतीने वाहनावर बसून थेट तुये हॉस्पिटलच्या दिशेने धूम ठोकली. तेथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रस्तुत प्रतिनिधीने जखमी युवकाची तुये हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, काल रात्री आठ वाजता आपण बांबोळी येथून कामावरून पार्से गावी येत असता तुये पंचायतीच्या इमारतीपासून 50 ते 60 मीटर लांबीच्या मुख्य रस्त्याच्या उतरणीवर अचानक आपल्यावर बिबट्या वाघाने झडप घातली आणि आपला उजवा पाय जबड्यात पकडला.
आपण भयभीत झालो. त्याच अवस्थेत पायाने त्याला जोरदार झटका मारला. त्यामुळे बिबट्याने आपला पाय सोडला. तीच संधी साधून व वाहनावरील बॅलन्स तसाच राखून खाली पडलेले चप्पल न घेताच तसाच मोटरसायकलने तुये हॉस्पिटल गाठले. त्यानंतर सविस्तर माहिती डॉक्टरांना व वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली.
खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी दिगाची जबानी घेतली. शिवाय घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर सायंकाळपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिली.
अलीकडे बिबट्या वाघांचा संचार लोकवस्तीत वाढला आहे. अनेक कुत्री, वासरांचा फडशा पाडला आहे. आता तर मुख्य रस्त्यावरही वाहनचालकांवर बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने नागरिक भयभीत झालेले आहे. वन खात्याने त्वरित बिबट्या वाघाचा बंदोबस्त करावा.
- चंद्रशेखर पोळजी, पार्सेचे माजी सरपंच
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.