Lairai Festival Bicholim: श्री लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रोत्सवाला पाच दिवसांचा अवधी असल्याने सध्या शिरगावात जत्रेचा माहोल तयार झाला असून, तयारीही जोरात सुरु आहे.
सध्या शिरगाव गावात फेरीतील स्टॉल थाटण्याचे काम सुरु असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही फेरीत ‘गोबी मंच्युरीयन'चे स्टॉल दिसणार नाहीत.
अस्वच्छता आणि आरोग्यास हानीकारक असल्याचे कारण पुढे करून ‘गोबी मंच्यूरीयन'च्या स्टॉलना यंदाही बंदी घालण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे.
गोबी मंच्युरीयनचा स्टॉल उभारल्यास कडक कारवाई करण्याचे संकेतही देवस्थान समितीने दिले आहेत. त्यामुळे 'गोबी मंच्यूरीयन' खवय्यांच्या जिभेला यंदाही लगाम बसणार आहे.
देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीची जत्रा येत्या सोमवारी (ता.24) साजरी होणार असून, परंपरेनुसार हा जत्रोत्सव पाच दिवस चालणार आहे.
जत्रा जवळ आल्याने सध्या गावात चैतन्यदायी आणि मंगलमय वातावरण निर्माण होऊ लागले आहे. जत्रेची तयारीही सुरु झाली आहे.
गोबी मंच्युरीयनला विरोध
गेल्या काही वर्षांपासून 'गोबी मंच्युरीयन' वाल्यांचा धंदाही तेजीत चालत आहे. शिरगावात जत्रेवेळी ''गोबी मंच्यूरीयन''चे प्रस्थ वाढले होते. मात्र आरोग्य आणि स्वच्छतेचे कारण पुढे करुन गेल्या वर्षी स्थानिक पंचायतीसह देवस्थान समितीने ''गोबी''च्या स्टॉलना बंदी घातली होती.
गेल्या वर्षी हा निर्णय यशस्वीही झाला होता. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिरगावच्या जत्रेवेळी या व्यावसायिकांना स्टॉल थाटण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.
गोबी मंच्युरीयन बनविताना एक प्रकारचा उग्र वास त्यातच अस्वच्छता यामुळे आरोग्याला हानिकारक ठरण्याचा संभव अधिक आहे.
असे कारण देत गेल्यावर्षी स्थानिक पंचायतीने गोबी मंच्यूरीयनच्या विरोधात ठराव घेऊन अन्न आणि औषध प्रशासनाला पाठविला होता देवस्थान समितीनेही ''गोबी''च्या स्टॉलना विरोध केला होता.
जत्रेला ''गोबी मंच्युरीयन'' ही आमची संस्कृती नाही. गोबी मंच्युरीयन तयार करताना अस्वच्छता होत असते. कोणते पदार्थ वापरतात, त्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध होत नसते. उग्र वासही सहन होत नाही. गोबी मंच्युरीयन खाल्ल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याचा धोका असतो.
याचा सारासार विचार करूनच गोबी मंच्युरीयनवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टॉलना जागा वाटप करताना ''गोबी''चे स्टॉल थाटू नयेत. अशी सूचना करण्यात आली आहे. हे स्टॉल आढळून आल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल.
- भगवंत गावकर, सचिव, श्री लईराई देवस्थान, शिरगाव.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.