मेरशी येथील विशाल गोलतकर खूनप्रकरणी संशयित तुषार तुळशीदास कुंडईकर (३८) याच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असला तरी पोलिसांनी केलेल्या तपासकामाच्या दस्ताऐवजात त्याचा खुनाशी किंवा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याशी काहीच संबंध नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
इतर दोघा संशयितांना याच कारणामुळे जामीन मिळालेला असल्याने संशयित तुषार यालाही सशर्त जामीन अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला.
संशयित तुषार कुंडईकर याने वैयक्तिक ३० हजार रुपयांची हमी व तत्सम रकमेचा एक हमीदार सादर करावा. त्याने साक्षीदारांना धमकावण्याचा किंवा तपासकामात अडथळा आणू नये. जुने गोवे पोलिस स्थानकात दर पंधरवड्याने हजेरी लावावी, अशा अटी न्यायालयाने त्याला घातल्या आहेत. विशाल गोलतकर याच्या खुनाशी संशयित तुषार याचा काहीच संबंध नाही. तो त्यावेळी उपस्थित होता.
मात्र, मारहाण करण्यात किंवा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामध्ये त्याचा हात नव्हता. या प्रकरणातील दोघा संशयितांना याच कारणावरून जामीन मिळाल्याने त्यालाही जामीन द्यावा, अशी बाजू संशयितातर्फे पवित्रन यांनी मांडली होती.
सरकार पक्षातर्फे जामिनाला विरोध
जामिनाला विरोध करताना सरकारतर्फे डी. गावस यांनी बाजू मांडताना सांगितले की, संशयित व साक्षीदार एकाच परिसरातील असल्याने त्याला जामीन दिल्यास तो साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे. तपासकाम प्राथमिक टप्प्यात असून आणखी काही साक्षीदारांच्या जबान्या नोंदवायच्या आहेत. मयत विशाल गोलतकर याच्या शरीरावरील गंभीर जखमा पाहिल्यास त्याची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.