Konkani Drama competition 2024  Dainik Gomantak
गोवा

Konkani Drama : धनयां देवंचारा : एक बऱ्यापैकी रंगलेला प्रयोग

Konkani Drama : प्रभावी सादरीकरणामुळे संहितेच्या मर्यादांवर मात, सृजनशीलतेला प्रेक्षकांची दाद

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Konkani Drama :

तीन दिवसांपूर्वी याच स्पर्धेत कला आविष्कार या वाळपईच्या संस्थेने सादर केलेल्या ‘धनयां देवंचारा’ या पुंडलिक नाईक लिखित नाटकाचा प्रयोग बराच फसल्यामुळे परत एकदा याच नाटकाचा प्रयोग पाहण्यात रस वाटत नव्हता.

पण विठ्ठल मंच सांगाती कारापूर-तिस्क - साखळी या संस्थेने या नाटकाचे प्रभावी सादरीकरण करून नाटकात रस निर्माण केला. संहितेत विशेष दम नसला व ती कालबाह्य झाल्यासारखी वाटत असली तरी सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका समजून केल्यामुळे व त्यांना परिपक्व दिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे एक चांगली कलाकृती सादर होऊ शकली.

आता नाटक तेच असल्यामुळे दोन प्रयोगांची तुलना होणे अपरिहार्य ठरते. पूर्वीच्या प्रयोगापेक्षा या प्रयोगाची बांधणी भरीव झाली. मुख्य म्हणजे प्रयोग अगदी बंदिस्त वाटला. पूर्वीच्या प्रयोगातील काही प्रसंग वगळून तर काही प्रसंग जोडून त्याला एक वेगळ्या प्रकारचे स्वरूप देण्यात आले. त्यामुळे नाटकाला गती प्राप्त होऊ शकली.

कृष्णा व त्याचा पूर्वज कुष्टा याची ही कथा. कुष्ठाची कुऱ्हाड देवंचाराच्या तळ्यात पडते आणि देवंचार त्याला पहिल्यांदा चांदीची व नंतर सोन्याची कुऱ्हाड आणून देतात. पण प्रामाणिक कुष्ठा त्या आपल्या कुऱ्हाडी नाही, असे सांगून स्वीकारत नाही.

त्याच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन देवंचार त्याला त्याच्या कुऱ्हाडीसह सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीही भेट म्हणून देऊन टाकतात. कृष्णा आपल्या पूर्वजाचा हाच फॉर्मुला आपल्या बायकोवर वापरायला पाहतो. तो तिला तळ्याच्या ठिकाणी नेऊन बुडवतो व देवंचाराकडे आपली बुडालेली बायको देण्याची मागणी करतो.

त्याचबरोबर तो आपल्या पूर्वजा करता वापरलेला कुऱ्हाडीचा फॉर्मुला देवंचाराला या संदर्भात वापरायला सांगतो. त्याप्रमाणे देवंचार प्रथम चांदणी नावाची एक बाई तळ्यातून काढतो व तिलाच आपली बायको मानून मोठ्या खुशीत कृष्णा घरी जातो. पण चांदणी त्याच्या मित्रांबरोबर नाचायला लागल्यामुळे तसेच त्याला घर कामे करायला लावल्यामुळे तो तिला तळ्यात आणून बुडवतो व देवंचाराकडे तळ्यातून दुसरी बायकोची मागणी करतो.

त्याप्रमाणे देवंचार त्याला सोनिया नावाची बाई तळ्यातून आणून देतो. पण ही बाईही चांदणी सारखीच असल्यामुळे कृष्णा तिलाही कंटाळतो व आपली पहिलीच बायको लोहिता हिलाच परत तळ्यातून आणण्याची मागणी करतो. नंतर काय होते, हा या नाटकाचा उत्तरार्ध. यात भूत योनी प्राप्त झालेले मुंजा, निमो व खेत्री हेही आहेत. निमो हा लोहिताचा भाऊ असतो. नाटकाच्या शेवटी प्रसन्न झालेला देवंचार निमोला थोड्यावेळापुरता मनुष्य योनीत आणून लोहिताशी त्याची भेट घडवितो. आजच्या काळात ही कथा न पटणारी असली तरी सजग दिग्दर्शन व कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे कलाकृती रंजक ठरली. सगळ्यात जास्त दाद द्यावी लागेल, ती या नाटकाच्या दिग्दर्शिका बिंदिया नाईक यांना.

पात्रांना दिलेल्या सूचक ‘मुव्हमेंटस’ तसेच योग्य वातावरण निर्मिती याद्वारे त्यांनी नाटकाचा परिणाम वाढविला. प्रत्येक पात्राला त्यांनी वेगवेगळ्या लकबी दिल्या. नाटकाच्या शेवटी देवचार प्रसन्न झाल्यावर रंगमंचाच्या आतून रंगमंचावर येणाऱ्या पलितेच्या आकाराच्या वस्तू जबरदस्त प्रभाव सोडून गेल्या. सर्जनशील दिग्दर्शक तकलादू संहितेचेसुद्धा कसे सोने करू शकतो, हे नाईक यांनी दाखवून दिले. त्यांना कलाकारांनी ही योग्य साथ दिली.

वैभव सावळ यांचा कृष्णा यथायोग्य वाटला. त्यांचा मुद्राभिनयही वाखणण्यासारखाच. त्यांची पत्नी लोहिताच्या भूमिकेत वेदश्री सावळ बाजी मारून गेल्या. लोहिताचा ठसका व नंतर चांदणी झाल्यावर तिचा नखरेलपणा यातला फरक त्यांनी समर्थपणे प्रतीत केला.

चांदणीच्या भूमिकेत तीन मित्रांबरोबरच सादर केलेला त्यांचा नृत्याविष्कार प्रंशसनीयच. इतर भूमिकांत मुंजो झालेला गौरेश वेरेकर भाव खाऊन गेले. बाकीच्या कलाकारांनी त्यांना योग्य साथ दिली. त्यामानाने थोडे कमी पडले, ते देवचार झालेले अजय जाधव. एक जोडपे आपल्याला मूल झाले, असे देवंचाराला सांगायला येतात, हा प्रसंग उपरा वाटला. यातली गीतेही वातावरणाला पूरक अशी होती. आम्ही देवंचाराच्या धुवो, फट रे फट सारख्या गाण्यामुळे योग्य वातावरण निर्मिती होऊ शकली. फट रे फट हे गाणे म्हणत भूत योनीत गेलेले तिघेजण कृष्णाच्या भोवती फेर घालून नाचतात, तो प्रसंग पूरक अशा गाण्यामुळे प्रभावी ठरला.

जवाहर बर्वे यांचे पार्श्वसंगीत ही परिणामकारक होते. खास करून योग्य ठिकाणी कावळ्याचा व कोंबड्यांचा आवाज टाकल्यामुळे प्रसंग सजीव होऊ शकले. सर्वेश च्यारी यांचे नेपथ्यही प्रसंगानुरूप असेच होते. एकीकडे कृष्णाचे घर तर दुसरीकडे देवंचाराचे झाड असे रंगमंचाचे विभाजन करून. च्यार यांनी आपले कसब प्रकट केले.

श्रृत नाईक यांची प्रकाश योजनाही नाटकाच्या प्रसंगांना शोभेल अशीच होती. एकंदरीत काहीशा अव्यक्त अशा संहितेचे प्रभावी सादरीकरण करून विठ्ठल मंच सांगाती या संस्थेने स्पर्धेच्या सलग दोन नाटकामुळे घसरलेल्या आलेखाला ऊर्जा दिली एवढे खरे.

‘गोमन्तक’च्या परीक्षणाचे कौतुक

गोमन्तकतूनमधील नाट्य स्पर्धेच्या परीक्षणाचे कौतुक होत आहे. एका कलाकाराने तर चक्क आम्हांला बक्षीसापेक्षाही गोमंतकातून प्रसिद्ध होणारे परीक्षण महत्त्वाचे वाटते असे सांगितले. त्यामुळे दर दिवशी प्रसिद्ध होणारे परीक्षण कलाकारांबरोबर नाट्य रसिकांचाही कुतूहलाचा विषय बनला आहे.

दोन्ही प्रयोगांची तुलना

''धनयां देवंचारा'' हे नाटक दोन संस्थांनी सादर केल्यामुळे प्रयोगाची तुलना होणे साहजिकच होते. सादरीकरण जरी वेगळे असले तरी संहिता तीच असल्यामुळे प्रयोग बघण्यातली मजा थोडी कमी होते. याबाबतीत राजीव गांधी कला मंदिराने ऐतिहासिक नाट्य स्पर्धांच्या बाबतीत स्पर्धेत एकच नाटक घेण्याचा नियम केला आहे.

त्याचा उल्लेख करावासा वाटतो. जी संस्था पहिल्यांदा अर्ज करते त्या संस्थेला ते नाटक देण्यात येते. नंतर अर्ज केलेल्या संस्थांना त्याच नाटकाचा प्रयोग करता येत नाही. कला अकादमीनेही याबाबत विचार करणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रयोगाच्या मध्यंतरात अशी चर्चा सुरू होती. दोन्हीही प्रयोगांची तुलनाही केली जात होती.

कोणता प्रयोग डावा व कोणता उजवा याबाबतीतही रसिकांत ऊहापोह सुरू होता. नव्या दमाच्या संहिता घेण्याऐवजी त्याच त्याच चावून चोथा झालेल्या संहिता का घेतल्या जातात, यावरही मल्लिनाथी सुरू होती. त्यात परत दोन संस्थांना आकर्षण वाटावे असे ‘धनयां देवंचारा’ या संहितेत काय आहे, याचेही आकलन बऱ्याच जणांना होत नव्हते.

गर्दी वाढली

‘मिशन आपालिपा’ या नाटकाला कला मंदिरात जो शुकशुकाट दिसत होता, तो या प्रयोगाला बऱ्यापैकी गर्दी झाल्यामुळे नष्ट झाला. पण तरीही बऱ्याच खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. या नाटकाला प्रेक्षकांकडून प्रतिसादही चांगला मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT