Goa Fire News: मुशीरवाडा-कोलवाळ येथील सर्व्हे क्रमांक 429/0 या जागेमधील चार भंगारअड्ड्यांना भीषण आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तर एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला गोमेकॉत दाखल केले आहे. या घटनेला जबाबदार धरून भंगारअड्डा मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. दहा तासांनंतरही आग धुमसतच होती.
या आगीमुळे गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अग्नितांडवावर रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरूच होते. सायंकाळपर्यंत म्हापसा, पिळर्ण, पर्वरी व पेडणे अग्नीशमन दलाचे मिळून 40 पेक्षा जास्त पाण्याचे बंब वापरले गेले. ही आग बुधवारी (ता.28) सकाळी 10.30 वा.च्या सुमारास लागली.
प्राप्त माहितीनुसार, इरफान रिझवान खान यांच्या मालकीच्या भंगारअड्ड्यात सकाळी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी त्याची ठिणगी पडून ही आग लागल्याचे सांगण्यात आले. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण करून इतर शेजारील भंगारअड्ड्यांमध्ये पसरली.
अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र आगीची भीषणता इतकी तीव्र होती की परिसरात आगीमुळे धुराचे लोट पाहायला मिळाले.
दरम्यान, या आग दुर्घटनेला कारणीभूत रिझवान प्लास्टिक इंडस्ट्री या भंगारअड्ड्याचे मालक रिझवान खान व इरफान रिझवान खान यांच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे आग लागून त्यामध्ये यासिम अन्सारी शेख (उत्तर प्रदेश) हा कामगार जखमी झाल्याबद्दल कोलवाळ पोलिसांनी भा.दं.सं.च्या 285, 337 व 34 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा आढावा...
या आगीत कामगार यासीन शेख (56) हा गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्यामुळे रुग्णवाहिकेतून त्यास म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, स्थिती गंभीर असल्याने त्यास गोमेकॉत पुढील उपचारार्थ हलविले. तो जवळपास 70 टक्के भाजला, असे सूत्रांनी सांगितले.
या चारही भंगारअड्ड्यांत निरुपयोगी टाकाऊ वस्तू होत्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खराब टायर, ट्यूब्स, 100 एसीचे संच, बॅरल, फायबर, पुटे, रासायनिक पदार्थ वीजवाहिन्यांच्या तारा आदी साहित्य या आगीत भस्मसात झाले. आग पसरत असल्याने येथील कामगारांनी काही साहित्य तसेच महत्त्वांची कागदपत्रे बाहेर काढली. मात्र, हे प्रयत्न अपुरे पडले. कारण आगीने रौद्ररूप धारण केले होते.
या भंगारअड्ड्यांना लागूनच काही निवासी घरे होती. या आगीची झळ या घरांना पोहोचू नये यासाठी अग्निशमन दल व पोलिसांकडून काळजी घेण्यात आली. त्यासाठी या भंगारअड्ड्यांच्या मागच्या बाजूने पाण्याचे फवारे मारले जात होते. या घरांतील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, जेणेकरून कोणतीच अनुचित घटना घडू नये.
दुपारनंतर दोन जेसीबी बोलाविल्या. या जेसीबींच्या साहाय्याने भंगारअड्ड्यांमधील साहित्य विखुरण्याचा प्रयत्न करण्यात आला, जेणेकरून ही आग पसरू नये. भंगारअड्ड्यास लागून असलेल्या दुकानांतील साहित्य शेवटच्या क्षणी काढण्यात आले.
वाटेसाठी जेसीबी मशिनचा वापर
या चार भंगारअड्ड्यांच्या मालकांमध्ये इरफान रिझवान खान, कंसर अन्सारी, रामबाबू निसार, मोहम्मद सलीम मुनियार यांचा समावेश.
हे चारही भंगारअड्डे जवळपास अडगळीत असल्याने जेसीबीच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या वाहनास जाण्यास वाट करण्यात आली.
कोलवाळ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी तसेच अग्नीशमन दलाचे संचालक व साहाय्यक विभागीय अधिकारी हे घटनास्थळी जातीने लक्ष ठेवून होते.
घर क्रमांक दिला कसा
हा भंगारअड्डा पंचायतीने गेल्या वर्षी जमीनदोस्त केला होता. वीज व नळ जोडणी कापली होती. जमीनदोस्त केलेल्या या भंगारअड्ड्याला घर क्रमांक तसेच वरील जोडणी कशी दिली गेली याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. तसेच या एकंदरीत प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच नित्यानंद कांदोळकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.