Vishwajit Rane|GMC Dainik Gomantak
गोवा

शस्त्रक्रिया रखडल्या, OPD सेवेवरही परिणाम; आरोग्यमंत्री राणेंच्या आश्वासनानंतर GMC डॉक्टरांचा संप मागे

गोमन्तक डिजिटल टीम

Kolkata Doctor Rape Murder Case

पणजी: कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार व खून याच्या पार्श्‍वभूमीवर डॉक्टरांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा मोठा फटका गोमेकॉतील रुग्णांना बसला. अनेक शस्त्रक्रिया रखडल्या व ओपीडीतील सेवेवरही परिणाम झाला.

शस्त्रक्रियांची संख्या वाढत गेल्यास त्याचा पुढील कामकाजावर परिणाम होईल, या भीतीने निवासी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन देताना आरोग्यमंत्र्यांनी हा संप मागे घेण्यास भाग पाडले.

राज्यभरातून ओपीडीमध्ये रुग्णांचे होणारे हाल तसेच नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात असल्याने रुग्णांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. स्थानिक डॉक्टरांच्या मागण्या मंत्री विश्वजीत राणे यांनी मान्य केल्याचे पत्र दिल्यानंतर निवासी डॉक्टरांनी बेमुदत सुरू ठेवलेला संप अखेर मागे घेतला.

गोवा रेसिडेंट असोसिएशनतर्फे आरोग्यमंत्री राणे यांना निवेदन देण्यात आले होते. आता संप मागे घेतल्याने दिवसाला सुमारे ५० रखडलेल्या शस्त्रक्रिया तातडीने केल्या जातील.

कायदे आणखी कठोर हवेत; राणे

गुन्‍ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मी तत्‍पर असतो. त्‍यासाठी कठोर कायदा करायला देखील मी पुढे असतो. डॉक्‍टरांवरील अन्‍यायाविरोधात आज जे डॉक्‍टर एकवटले, त्यांना माझा पाठिंबा आहे. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर दाद मागण्यासाठी त्यांनी समोर येणे आवश्यक आहे. असे गुन्हे पुन्हा होऊ नयेत, यासाठी कठोर कायदा केला पाहिजे, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.

विश्‍वजीत यांचे ममतांवर वाग्बाण

ज्या राज्यात महिलांवर बलात्कार होतात आणि त्यांचा जीव जातो, त्याच राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत. आज त्या महिला मुख्यमंत्री या प्रकरणाला राजकीय रंग देतात. त्यांनी राजकारण बाजूला ठेवून डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करणे महत्त्वाचे आहे. माणुसकीच्या नात्याने आणि महिला म्हणून त्यांनी महिलांच्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या. मात्र, तसे झाले नसल्याची खंत मंत्री राणे यांनी व्यक्त केली.

महिला डॉक्टरांची नेमणूक

महिला डॉक्टरांच्या समस्या केवळ महिला डॉक्टरच जाणू शकतात आणि महिला त्यांनाच त्या बोलून दाखवू शकतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महिला डॉक्टर नेमणार असल्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा इस्पितळांचे ऑडिट

राज्यातील दोन जिल्हा इस्पितळांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करायला हव्यात, त्या करण्यात येतील. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. या दृष्टीकोनातून आम्ही दोन्ही जिल्हा इस्पितळांचे ऑडिट करणार असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.

तक्रारींची त्वरित दखल घ्या!

गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर (गार्ड) संघटनेने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात त्वरित पावले उचलण्याची मागणी केली. त्यांनी केलेल्या निवेदनात तक्रार आल्यास त्यावर त्वरित कारवाईची मागणी केली.

सर्व ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक आधारित रिपोर्टिंग प्रणाली, गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक, व्हिजिटर पास देणे, हॉस्टेल बांधकाम आदी विषय या निवेदनात नमूद केले आहेत. या सर्व मागण्या मान्य करण्याची ग्वाही मंत्री राणे यांनी दिली आहे.

म्हणून संप मागे; डॉ. आयुष शर्मा

‘गार्ड’चे अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा म्हणाले की, हे आंदोलन करण्यामागे आमची प्रमुख मागणी महिला डॉक्टरांना न्याय देणे, ही होती. सुदैवाने गोव्यातील इस्पितळांमध्ये चांगल्या सुविधा आहेत. मात्र कधीही काहीही होऊ शकते, म्हणून अतिदक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे निवेदन देऊन काही विषय त्यांच्या नजरेस आणून दिले आहेत. ते विषय सोडवून निवेदनात नमूद केलेल्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिल्याने आम्ही संप मागे घेतला.

डॉक्टरांनी सध्या जो संप केला, त्यावेळीही रुग्णांना त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली होती. त्‍यामुळेच रुग्णांवर आमच्या संपाचा परिणाम दिसून आला नाही. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रुग्णांना त्रास दिला नाही.
संदेश चोडणकर, अध्यक्ष, आयएमए, गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT