तिसवाडी: राज्यातील सर्वात मोठी कुंभारजुवे आणि नेवरा या दोन खाजन जमीन तिसवाडी तालुक्यात आहे. मात्र, त्यांची सद्यस्थिती दयनीय आहे. एकेकाळी उत्तर गोव्याचा धान्य भंडार असलेल्या या दोन्ही खाजन शेती नष्ट होऊन नदी पात्रात विलीन होण्याच्या मार्गावर आहेत.
याबाबत शेतकऱ्यांकडून मामलेदारांकडून नेमण्यात आलेल्या स्थायी समित्यांकडे बोट दाखवण्यात येत आहे, या समित्यांमार्फत खाजनात परप्रांतीयांना प्रवेश दिल्याचे दावे करण्यात येत आहेत.
काही महिन्यांपूर्वी नेवरा खाजन शेतीत मुद्दामहून नदीचे पाणी घेऊन बुडविण्याचा प्रकार उघडकीस आला होता. वृत्तपत्रांनी या विषयावर प्रकार टाकल्यानंतर मामलेदारांनी कारवाई करत मानस ठेकेदारांना नोटीस बजावून मानसीची काढलेली दारे पुन्हा लावण्याची ताकीद दिली होती.
त्यात एक परप्रांतीय मानस ठेकेदार असल्याचा खुलासा झाला होता. पारंपरिक शेतकऱ्यांना मानस ठेकेदारी दिली जावी यासाठी लिलाव व्यवस्था केली होती, परंतु यात आता बेकायदा परप्रांतीयांना प्रवेश दिला जात आहे. यासाठी स्थायी समिती जबाबदार असल्याचे आरोप शेतकरी करीत आहेत.
खाजन शेतीकडे काहीजणांनी पाठ फिरवली असली तरी करमळीसारख्या गावात आजही मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. परंतु खाजन शेतीत मासेमारी माफिया घुसल्याने शेती धोक्यात आली आहे. वारंवार खाजन जमीन नदीच्या पाण्याखाली बुडून मासेमारी करण्याचे प्रकार घडत आहेत. करमळीतील धाडो खाजनमधील प्रकार दै. गोमन्तकने उघडकीस आणला होता. मात्र आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. या प्रकाराला स्थायी समिती नेमण्याचा प्रकार कारणीभूत असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
खाजन शेती बुडवण्याचा प्रकार उघडपणे केला जातो. मानस ठेकेदारांना राजकीय नेते, महसूल खात्यातील अधिकारी आणि पोलिस यांचा वरदहस्त लाभल्याने हे प्रकार वारंवार घडतात. काही राजकीय नेत्यांचे नातेवाईक यात गुंतल्याने याकडे काणाडोळा केला जातो. यात काही पोलिसदेखील मुद्दामहून प्रकरण रेटण्याचे काम करत असल्याचे आरोप शेतकऱ्यांकडून होत आहेत.
पारंपरिक व्यवसाय गोमंतकीयांकडे राहावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. परंतु महसूल खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या खाजनात परप्रांतीय घुसले आहेत. मानस ठेकेदारी परप्रांतीय व्यक्तींना दिली जात असून हा प्रकार सरकारच्या नजरेसमोर होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना कृती करण्याची ताकीद घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
खाजन जमिनीत शेती करण्याची पद्धत ही आमच्या पूर्वजांनी केली होती. शेती व्यतिरिक्त मासे पकडण्यासाठी मानस व्यवस्था होती. त्यात देखरेख आणि इतर कामांसाठी लागणारा निधी हा मानसीच्या लिलावाद्वारे यायचा. येथे केवळ पारंपरिक शेतकरी आणि त्यांच्या वारसदारांना स्थान होते. परंतु महसूल खात्याने जेव्हा पासून स्थायी समिती नेमण्याचा प्रकार सुरू झाल्यापासून शेतकरी सोडून भलतेच मानस ठेकेदार झाले आहेत, त्यात परप्रांतीयांचा देखील समावेश आहे.राजेश नाईक, पंच सदस्य, करमळी
स्थायी समिती प्रक्रिया रद्दबातल करून त्या जागी प्रशासक नेमून कारभार चालवला पाहिजे, तसेच पारंपारिक शेतकऱ्यांचे वारसदार ओळखून त्यांची नोंद करण्याची गरज आहे. अन्यथा स्थायी समितीमुळे चाललेला गैरव्यवहार असाच सुरू राहील. कोणी ही येऊन या समितीवर सदस्य होतात आणि नंतर आपली मनमानी कारभार करतात.रामराव वाघ, अध्यक्ष, खाजन ॲक्शन समिती
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.