Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: विधानसभेतील महिला आमदार

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभेतील महिला आमदार

गोवा विधानसभेत तीन महिला आमदार आहेत आणि तिन्हीही सत्ताधारी पक्षात आहेत. या तिन्ही महिला आमदारांपैकी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे आणि शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. तिसऱ्या महिला आमदार असणाऱ्या जेनिफर मोन्सेरात यांना आमदारकी तसेच मंत्रिपदाचाही अनुभव आहे, परंतु आताच्या विधानसभेतील कामकाज पाहता. डॉ. दिव्या राणे आणि दिलायला लोबो अधिक सक्रिय दिसतात. विधानसभा कामकाजात देखील त्यांचा सहभाग इतर आमदारांच्या तोडीस तोड आहे, परंतु जेनिफर मोन्सेरात यांचा पूर्वीपासूनच स्वभाव मवाळ असल्याने आणि आता तर त्या केवळ आमदार असल्याने अधिक सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या महिला आमदारांचा परफॉमन्स अधिक चांगला असल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙

असुनी नाथ ते अनाथ

विधानसभा अधिवेशनात सत्ताधारी मंत्री व आमदारांसह असणाऱ्या त्यांच्या स्‍वीय सचिवांना सध्या उपवास घडत असल्याची चर्चा आज विरोधी आमदारांच्या दालनात सुरू होती. सत्ताधारी आमदारांच्या जेवण-चहापान कक्षात म्हणे आता केवळ मंत्री व आमदारांनाच प्रवेश मिळत असल्याने मंत्री - आमदारांचे पीए आता विधानसभा संकुलातील सार्वजनिक कक्षात जेवायला जातात; परंतु तेथे गर्दी एवढी असते की काही वेळातच जेवण संपते. त्यातच मागील कॅंटीनकडे जाणारा दरवाजा बंद केल्याने हे पीए आता विरोधी आमदारांच्या कक्षात येऊन पोटाची भूक भागवतात. जेवणाचे सोडा, किमान चहा तरी देण्याची व्यवस्था करा असे सत्ताधाऱ्यांचे कर्मचारी म्हणू लागले आहेत. त्यांचेही खरे, सकाळी ९ वाजता घरातून निघून रात्री ९ पर्यंत उपाशीपोटी कसे बरे काम करणार बिचारे. ∙∙∙

कुणबी जॅकेटची माविनना भेट

सध्‍या कुणबी साडीला जीआय नॉर्म प्राप्‍त झाले असून गोव्‍यातील या अस्‍सल हातमागावरील कापडाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. एकेकाळी गोव्‍यातील लोक या साडीकडे पाहून नाक मुरडायचे. मात्र, आज ही साडी फॅशन स्‍टेटस बनलेली आहे. या साडीला तिचा योग्‍य मान मिळावा यासाठी कुडतरीच्‍या भाजप मंडळाकडून नेहमीच प्रयत्‍न होत आहेत. काल पंचायतमंत्री माविन गुदिन्‍हो यांचा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्ताने कुडतरी भाजप मंडळाने मंत्री गुदिन्‍हो यांना या कुणबी साडीने तयार केलेले जॅकेट भेट म्‍हणून दिले. यावेळी भाजप मंडळाचे अँथनी बार्बोझा आणि स्‍नेहा भागवत उपस्‍थित होत्या. कुणबी साडीचा मान वाढविण्‍यासाठी तिचा कसा उपयोग केला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण होते. ∙∙∙

युरी आलेमाव बनले आक्रमक

विधानसभेतील प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पुन्हा त्यांच्या प्रश्‍नांना न्याय दिला जात नाही. विरोधकांचे प्रश्‍न व उपप्रश्‍न चर्चेसाठी कामकाजात दाखल करून घेतले जात नाही असा प्रश्‍न पुन्हा उपस्थित केला व याचे स्पष्टीकरण सभापतींनी द्यायला हवे असा जोर धरला. आलेमाव यांना त्यांच्या मागणीपासून गप्प बसवण्यासाठी सभापतींनी शून्य तासाच्या कामकाजास सुरवात केली. मुख्यमंत्र्यांनी सभापतींना डोळ्यांनी इशारा करून कामकाज पुढे रेटण्यास सांगितले असा टोमणा हाणला. या सभागृहाचे अध्यक्ष हे सभापती असले तरी मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सभागृहातील कामकाज चालवले जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी डोळ्यांनी इशारे करण्याचे थांबवावे व विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्यास संधी द्यावी. विरोधकांचे प्रश्‍नच विचारात घेतले जात नाही यावर युरी आलेमाव यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते असल्याने आलेमाव यांना विधानसभेत आक्रमक भूमिका घेणे भाग आहे. मात्र, त्यांचेच प्रश्‍न विधानसभेत चर्चेच्या पटलावर न घेतल्याने आज ते आक्रमक बनले व रागाने हातातील कागदही फेकून दिले. ∙∙∙

ढवळीकरांचे श्लोक

ज्येष्ठत्वाबरोबर संयम राखल्यास पदरी काय पडू शकते हे सुदिन ढवळीकरांनी सभागृहातील आमदारांना धडा दिला असावा. आपल्या वीज खात्यावर बोलताना त्यांनी ‘पॉवर’ दाखवली. विरोधकांकडून झालेल्या आरोपांवर उत्तर देताना मंत्री ढवळीकर यांनी सचोटीचे दर्शन घडवले. रामदास स्वामींचे श्लोक त्यांनी विरोधकांना ऐकवले. वीज निर्मिती असो की सवलतीची रक्कम देणे असो ढवळीकर नव्या (कदाचित) सदऱ्यात तरुण दिसत होते. त्यांनी सभागृहात प्रथमच माविन आणि रवी नाईक यांना विचारलेल्या प्रश्नांची आठवण सांगत ज्येष्ठत्व सांगण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचीही कामे करण्यात मागे नाही, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. विरोधकांकडून या खात्यावर इतरांप्रमाणे प्रहार झाला नाही, त्यामुळे कदाचित ढवळीकरांसाठी गुरुवारचा दिवस ‘सुदिन’ ठरला असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

सरकारचे नंतर, ढवळीकर ट्रस्टचे अगोदर...!

धुवांधार पावसामुळे राज्यात शेतीची पार वाट लागली. होत्याचे नव्हते झाले, त्यानंतर कृषिमंत्री रवी नाईक यांनी सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रवींचे एक चांगले असते, सर्वसामान्य नागरिकाला सरकारचा कसा फायदा मिळवून द्यायचा याचे गणित त्यांना चांगले अवगत आहे. आता हे सरकारचे पैसे मिळतील या दुमत नाही, पण सध्या तरी मडकईतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले, त्यांना माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे लगेच मदत करण्यात आली. इतर कोणत्याच मतदारसंघात एवढी तात्काळ मदत कोणत्याही आमदाराने दिलेली नाही. त्यामुळे पहिला मान ढवळीकर ट्रस्टचा. आता हा ट्रस्ट अर्थातच या भागाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे, पण या ट्रस्टमार्फतही सर्वसामान्य गरजूंना मोठा दिलासा दिला जातो, सरकारचे पैसे मिळतील तेव्हा मिळतील, पण ढवळीकर यांचे पुत्र मिथिल ढवळीकर यांनी लगेच अर्थसाह्य वितरित करण्याची कार्यवाही सुरू केली आणि निस्तेज झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हासू फुलले हे मात्र नक्की....!∙∙∙

बारा वर्षांची प्रतीक्षा निष्फळ

डीडीएसएसवाय योजनेतून लाभार्थ्यांना दोन हजार रुपये दिले जातात, ती रक्कम किमान पाच हजार करावी यासाठी विरोधकांनी मागणी लावून धरली होती. परंतु समाजल्याणमंत्र्यांनी तो विषय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवू असे सांगत ती मागणी चार हात लांब ठेवली. बारा वर्षे झाले तरी त्या योजनेची रक्कम वाढत नसल्याचे विरोधी आमदारांचे म्हणणे तसे पाहिले तर योग्यच. विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहात आलेला ईमेल मंत्र्यांसमोर वाचून दाखविला. त्या ईमेलचा विषय हाच की सरकारी योजनांतून लाभार्थ्यांना दोन हजार रुपये दिले जातात, परंतु त्यात वर्षानंतरही वाढ होत नाही. आमदारांचे वेतन मात्र न सांगता वाढविले जाते. आता यातून सामान्यांनी आणि लाभार्थ्यांनी काय बोध घ्यायचा तो घ्यावा. ∙∙∙

म्हापसा पालिका अन् प्रताप...

काही दिवसांपूर्वीच म्हापसा पालिकेत शहरातील कचरा संकलन व्यवस्थापनाबाबत बैठक झाली. यात नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना धारेवर धरत शहरातील कचरा संकलनाच्या गैरव्यवस्थापनासंदर्भात जाब विचारला. बैठकीला तीन दिवस उलटले, तरीही अद्याप ब्लॅक स्पॉट्स, कलेक्शन पाँईट्स व रस्त्यांवरील कचरा अजूनही गोळा किंवा साफ होत नाही. मात्र, प्रभाग पाचमधील एका नवीन प्रकल्प स्थळावरील डेब्रिज उचलण्यासाठी पालिकेने तत्परता दाखविल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. उलट या प्रकल्पात अद्याप कुणी राहत नाही, तरी पालिकेचे आठ कर्मचारी मिळून येथील मोडतोडीचे सामान व कचरा शुक्रवारी उचलताना दिसले. आता पालिका कर्मचारी कुणाच्या सांगण्यावरून आणीबाणीची स्थिती आल्यासारखी कुणी राहत नसलेल्या स्थळी सेवा बजावत होते, हा संशोधनाचा विषय. कारण एकीकडे शहरात अनेक ठिकाणी कचरा साचलेला असताना म्हापसा पालिकेच्या पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांना खासगी नागरिकांकडून काही अतिरिक्त आर्थिक मोबदला मिळतोय का? असा प्रश्न आता नगरसेवकच विचारू लागलेत..∙∙∙

पुरस्कार व सत्कार

लेखकरावांना पुरस्कार मिळाला ते ठीक आहे. मागील काही वर्षे थेंबभरही लिहिलं नाही तेही ठीक आहे, पण पुढच्या वर्षीचे पुरस्कार जाहीर व्हायची वेळ झाली तरी लेखकरावांचे सत्कार सुरूच आहेत. गल्लीत, गावात, वाड्यावर हे सत्कार चाललेत. नवकल्पनाधारीत नवीन लेखन हा पुरस्कार असतो. उच्च दर्जाचं लेखन हा पुरस्कार असतो. कसंही का असेना, जो पुरस्कार मिळाला तोच तर सत्‍कार होय. लोकांची पसंती प्राप्त करणे हा अलंकार व भूषण असतं लेखकरावांचं. सत्कारलोलुपतेचा आजार सामाजिक स्वास्थ्य बिघडवायला आणि युवकांना गैर धडे द्यायला कारण ठरतात, हे शल्य आहे. म्हातारी वृद्ध म्हणून ती मरणारच, पण काळ सोकावतो ही खंत आहे.∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

गोव्याच्या लोकसंस्कृतीत 'घुमट वाद्याला' अनन्यसाधारण स्थान का आहे? चर्मवाद्यांच्या विशेष योगदानाबद्द्ल जाणून घ्या!

गोव्यात Beach Wedding महागलं? दिवसाला मोजावे लागणारे तब्बल 'एवढे' रुपये, Price Details

Goa Today's News Live: इडीसीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री,इतर संचालकांचीही नेमणूक!

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

SCROLL FOR NEXT