Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मुख्‍यमंत्र्यांना सनबर्नचे एवढे कौतुक का?

Khari Kujbuj Political Satire: नोकरी वाचविण्यासाठी वाट्टेल ते!

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्‍यमंत्र्यांना सनबर्नचे एवढे कौतुक का?

गोव्‍यात आयोजित केल्‍या जाणाऱ्या सनबर्न महोत्सवात ड्रग्‍सचा सर्रास वापर केला जातो अशा तक्रारी नेहमीच होत असतात. दोनवेळा तर या महोत्सवात भाग घेतलेल्‍या पर्यटकांचा अंतही झाल्‍याचे दिसून आले होते. त्‍यामुळे आता उत्तर गोव्‍यात हा फेस्‍टीव्‍हल नको अशी मागणी होऊ लागली आहे. त्‍यामुळे यंदा हा महोत्‍सव दक्षिण गोव्‍यात आयोजित करणार असे पिल्‍लू अलीकडेच सोडण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍यावर दक्षिण गोव्‍यात बराच गदारोळ माजला. दक्षिण गोव्‍यातील लोक सनबर्नच्‍या विरोधात आहेत असे चित्र त्‍यामुळे निर्माण झाले होते. या परिस्‍थितीत मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्‍या बिचाऱ्या सनबर्नवाल्‍यांना का एवढे सतावता? असे म्‍हणत या आयोजकांची एकप्रकारे बाजू उचलून धरली आहे. मुख्‍यमंत्र्यांना या महोत्‍सवाचे एवढे कौतुक का बरे आहे? दोतोर यावर काही बोलणार का? ∙∙∙

खरा चिअर लीडर कोण?

आपल्या नेत्यांचे काही चेले असतात ते नेत्यांच्या इशाऱ्यांवर नाचतात. त्यातील एक म्हणजे कुंकळळी काँग्रेस गट प्रमुख आसिस नोरोन्हा. त्यांचे आलेमाव घराण्याकडे असलेले संबंध सगळ्यांनाच माहीत आहेत. आसिस यांनी परवा युरी आलेमाव यांना सरकारने कुंकळळी रणसंग्राम जयंतीच्या कार्यक्रमात डावलल्याचा आरोप करून मुख्यमंत्री व समाज कल्याण मंत्र्यावर टीका करताना सुभाष फळदेसाई यांना चिअर लीडर संबोधले. आसिस बाब खरे म्हणजे चिअर लीडर ही उपाधी तुम्हास चांगली शोभते. कारण आपण युरीच्या इशाऱ्यावर व तालावर छान नाचता, असे आम्ही नव्हे भाजपाचे कार्यकर्ते म्हणत आहेत. ∙∙∙

नोकरी वाचविण्यासाठी वाट्टेल ते!

‘कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी’ असे म्हटले जाते. सरकारी नोकरवर्गात सगळ्यात जास्त बदनाम म्हणजे पोलिस असे म्हटले जाते. मात्र, सगळेच पोलिस चिरीमिरी घेणारे नसतात व सगळेच वाईट नसतात. काही पोलिस असेही आहेत, ज्यांना आपली नोकरी सांभाळण्यासाठी स्वतःच्या पगारातील पैसे खर्च करावे लागतात. रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांना तालांव देणाऱ्या पोलिसांना आपण शिव्या देतो. मात्र, या पोलिसांना दिवसाला सक्तीने दहाजणांना वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दंड द्यायलाच हवा अशी सक्ती आहे. आता वाहतुकीचे नियम कडक झाल्यामुळे वाहनचालक सर्व कायदे व नियमांचे पालन करतात. वाहतूक पोलिसांना दंड देण्यासाठी दहा वाहनचालक मिळत नाही म्हणून बिचारे पोलिस स्वतःच आपल्या पगारातील दंड भरून दंडाची दहा प्रकरणे नोंद करतात. नोकरी वाचविण्यासाठी या पोलिसांना स्वतःचा जीव धोक्यात घालून व लपून छपून राहून वाहनचालकांचे सावज हेरावे लागते. म्हणून ते पोलिस म्हणतात ‘पापी पेट का सवाल है’. ∙∙∙

लोबोंनी काढले चिमटे...

कला अकादमीविषयी आमदार मायकल लोबो यांनी मंत्री गावडे यांना चिमटे काढले. कला व संस्कृती खात्याचे मंत्री एकदम बरे. (आता तो येथे नाही) सर्व लोक म्हणतात, मंत्री म्हणून तो नाटकात बरे बोलतो. नाटकात काम करण्यासाठी मंत्री कलाकार म्हणून एकदम बरे. कला अकादमीत भरतनाट्यम कार्यक्रमाच्या निमित्ताने लोबो गेले. पहिल्या दिवशी उद्‍घाटन झाले, त्यावेळी ध्वनी यंत्रणा योग्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ध्वनी यंत्रणा बाहेरून आणावी लागली. त्यासाठी आपण ८० हजार रुपयांचा धनादेश दिला. आपणास जर ती रक्कम परत दिली, तर बरी. मंत्री छत्रपती शिवाजी महाराज झाले, कधी कधी संभाजी महाराजांचे पात्रही ते रंगवतात, पण त्यांनी तलवार योग्य पद्धतीने काढायला हवी. कला अकादमी पाण्यात कशी पोहत आहे, त्याला जबाबदार कोण? असा सवाल लोबो यांनी केला. त्यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ची आठवण यावेळी त्यांनी करून दिली. ∙∙∙

कदंबची नवी योजना

गोवा कदंब महामंडळाने आता विजेवर चालणाऱ्या बसगाड्या सुरू केल्या आहेत, परंतु त्या मोजक्याच आहेत. त्यामुळे गोमंतकीयांची खऱ्या अर्थाने सेवा करतात त्या आपल्या जुन्या इंधनावर चालणाऱ्या बसगाड्याच. कदंब महामंडळाद्वारे जशी पास योजना राबविली जाते, तशी खास पावसाळ्यासाठी म्हणून बसमधून प्रवास करताना आपल्याला पावसाळ्याचा आनंद लुटण्याची संधी मोफत दिली जाते. टीप टीप बरसा पाणी... या गाण्याप्रमाणे एकदा का तुम्ही बसमध्ये बसलात की पावसाळ्याचा प्रत्यक्ष अनुभव तोही निवांतपणे एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करत पावसाळ्यामुळे हिरवाईने नटलेला निसर्ग पाहत हा अनुभव घेता येतो. ही ऑफर काही दिवसांसाठीच सुरू आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर महामंडळाच्या वाहनांद्वारे प्रवास करा अशाप्रकारचे कदंब महामंडळावर टीका करणारे विनोदी संदेश समाज माध्यमांद्वारे फिरत आहेत. ∙∙∙

वीज खांब उन्मळण्याचे कोडे

गोव्यात हल्लीच्या काही वर्षांत मॉन्सूनचा वादळी आरंभ होतो व त्याचा सर्वाधिक फटका वीज खात्याला बसतो तो वीज खांब उन्मळून वा मोडून पडल्यामुळे. यंदा तर अशा प्रकारामुळे विविध भागांत मिळून काही लाखांचे नुकसान झाल्याचे खात्याने म्हटले आहे, पण काहींना यामागे रॅकेट तर नाही ना अशी शंका यायला लागली आहे. ते म्हणतात की झाडे पडून हे खांब मोडणे वा वाकणे समजता येते, पण काँक्रीट घालून उभे केलेले खांब वाऱ्याने उन्मळून पडणे शक्य नाही. एक तर ते व्यवस्थितपणे उभे केलेले नसावेत वा ते सदोष असावेत. पूर्वी साळावलीची जलवाहिनी वरचेवर फुटायची. नंतर त्यामागे एक रॅकेट असल्याचे उघडकीस आले होते. दुरुस्तीचे काम मिळण्यासाठी पाण्याचा दाब वाढवून ती फोडली जायची म्हणे. तसेच या वीज खांबांचेही नसावे ना? असा संशय हे जाणकार घेतात. सुदिनबाब ऐकताय ना? ∙∙∙

शेट्ये यांची चलाखी

राज्य सरकारच्या तिजोरीत अधिकतर महसूल हा जीएसटी, विक्री कर आणि वाहनांवरील करातून येतो. त्याशिवाय अबकारी खात्याच्या महसुलाचा टक्काही वाढलेला दिसून येतो. अबकारी खात्याचा वाढलेला महसूल ही चांगली की वाईट गोष्ट हे तुम्हीच ठरवावे, असे म्हणत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आपल्या पेशाची आब राखली. बोलण्याच्या ओघात अनवधानाने अनेकजण वाहवत जातात, पण डॉ. शेट्ये यांनी मद्य विक्रीतून मिळणारा महसूल हा राज्यासाठी चांगला की वाईट हे ठरवण्याचा चेंडू इतरांकडे ढकलत बाजूला होणे पसंत केल्याचे दिसून आले. त्यामुळे शेट्ये यांनी जी चलाखी दाखवली तिचे खरोखरच कौतुकच करायला हवे. ∙∙∙

पन्नास द्या, मगच बोला!

सुरवातीला टीसीपी आणि नंतर अबकारी खात्‍यातील जावयांचे प्रताप उघडकीस आणल्‍यानंतर आता मडगावातील जलस्रोत खात्‍यातील प्रभाग २ मध्‍ये असलेल्‍या आणखी एका जावयाचे असेच प्रताप ऐकू येऊ लागले आहेत. हा जावई एका उच्‍च पदावरील अभियंता असून या विभागाद्वारे जी कामे हाती घेतली जातात, त्‍याचे कंत्राट वगैरे म्‍हणे हाच जावई कंत्राटदारांना देतो. मात्र, त्‍यासाठी त्‍याला पन्नासाचा नैवेद्य दाखवावा लागतो असे सांगितले जाते. आता हे पन्नास म्‍हणजे ५० हजार रुपये हे वेगळे सांगण्‍याची गरज नाही. या अधिकाऱ्याचे म्‍हणे ५० हातावर टेकविल्याशिवाय पानही हालत नाही. ∙∙∙

विरोधकांचा धसका

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षाकडून विधानसभेत काळा पेहराव करून येणाऱ्यास बंदी घातली आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी हा तोंडी आदेश दिला असल्याची माहिती पुढे आली आहे. विरोधकांकडून सरकारचा निषेध म्हणून आपले समर्थक काळे कपडे घालून विधानसभेत पाठवतील, अशी भीती सत्ताधारी पक्षाला वाटू लागली आहे. यापूर्वीच्या अधिवेशनात विरोधी सर्व आमदारांनी काळा पेहराव करून सरकारचा निषेध नोंदविला होता. भाजपच्या अनेक कार्यक्रमांत किंवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमालाही काळ्या पेहरावास मान्यता दिली जात नाही, गोव्यातही भाजप तोच कित्ता गिरवत आहे. मात्र, पुढील काळात विरोधी आमदार जर काळा पेहराव करून आले, तर त्यांना अटकाव केला जाणार काय, हे पाहावे लागणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT