मडगावच्या कोंब प्रभागातील नगरसेवक असलेले दादा नायक हे तसे हरहुन्नरी स्वभावाचे व्यक्तिमत्व. आपल्या प्रभागातील नव्हे तर मडगावच्या कुठल्याही व्यक्तीचे मडगाव पालिकेत काम असल्यास ते त्यांना करुन देण्यास हे दादा एका पायावर तयार. त्यांच्या या अशा सकारात्मक आणि लोकांना पावणार्या ‘दादागिरी’मुळे लोक त्यांच्या प्रेमात पडले नाही तरच नवल. त्यामुळे या दादांचे नाव सगळ्यांच्याच मुखी असते. हा वाढता पाठिंबा पाहून की काय कोण जाणे आता म्हणे या दादांना मडगावचा आमदार हाेण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी तशी घोषणाही केली आहे. दादा नगरपालिका निवडणूक जिंकले ते दिगंबर कामत यांच्या पॅनलमधून. आता आमदारकीची निवडणूक ते दिगंबर बाबांच्या विरोधात लढणार का? ∙∙∙
ज्याप्रमाणे एकेकाळी संगीत संशय कल्लोळ हे नाटक गाजले होते .त्याच प्रमाणे आपल्या राज्यात राजकारण्यांचे ‘मानापमान’ नाटक गाजत आहे. मराठ्यांत डॉ. प्रमोद सावंत श्रेष्ठ? की विश्वजित राणे श्रेष्ठ?. भंडारींमध्ये रवी नाईक श्रेष्ठ की, श्रीपाद नाईक मोठे?. सारस्वतांत रोहन यांचे वजन जास्त की दिगंबर कामत यांचे?. ‘एसटी’ समाजात गोविंद गावडे महान की, रमेश तवडकर श्रेष्ठ?. या सगळ्यात जास्त ‘मानापमान’ गाजतेय ते अनुसूचित जमातीच्या राजकारण्यांत. रमेश तवडकर, गोविंद गावडे यांच्या मानापमानाचा फटका बसलाय, तो काणकोणकरांना. काणकोणच्या रवींद्र भवनाच्या लोकार्पण सोहळ्यावर या नाटकाचा प्रभाव पडत आहे, असे आम्ही नव्हे, काणकोणकार म्हणताहेत. ‘रेड्या पाड्याचे झुंज आणि झाडांचेर काळ’ म्हणतात तसला हा प्रकार. ∙∙∙
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे पर्वरीत खूप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला लोकांचीही मोठी उपस्थिती लाभली. येथील क्षात्रतेज सभागृह तुडुंब भरले होते. या कार्यक्रमाला सहकारमंत्री सुभाष शिरोडकर तसेच आमदार संकल्प आमोणकर आणि प्रेमेंद्र शेट अशा तिघांनीच उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी येणार असे कबूल केले होते, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी चालली होती, पण मुख्यमंत्री काही आले नाहीत, मात्र ओबीसींनी आपली ताकद दाखवताना ओबीसीतील एकोणीसही समाज एकत्र आले असल्याची हाक दिली. आता राजकारण्यांनाही ओबीसींचा धसका घ्यावा लागणार असा रागरंग दिसतोय, कारण राज्यातील लोकसंख्येत ओबीसींची संख्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, बरोबर ना...! ∙∙∙
बंदी असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात परराज्यांतून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्याने स्थानिक मूर्तिकारांसह पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. स्थानिक मूर्तिकार अशा ‘पीओपी’च्या मूर्तींना प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. सध्या अनेक ठिकाणी ‘पीओपी’च्या मूर्तींची खुलेआम विक्री सुरू असून, प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनीही ‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदी असेल, असे म्हटले होते. परंतु, प्रशासकीय विभाग डोळेझाक करताना दिसतात. मध्यंतरी, संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रात ‘पीओपी’च्या मूर्तींची विक्री झाल्यास कारवाईचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले होते. परंतु अद्याप यंत्रणा झोपीच गेल्याचे दिसते. त्यामुळे बंदीचा आदेश हा फक्त कागदावरच दिसतो. ∙∙∙
पेडणे अर्थात मोपा विमानतळावरील टॅक्सीवाल्यांचा प्रश्न सध्या चिघळलेला आहे. त्याला जबाबदार कोण सरकार की अन्य कोणी राजकारणी ते यथावकाश उघड होईलच पण त्यांतून टॅक्सीवाल्यांकडून जो सर्वसामान्य प्रवाशांचा छळ होतो, तो दूर होणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या आंदोलनातूनच एकेकाकडे किती टॅक्सी आहेत, असा मुद्दाही पुढे आला आहे. किनारपट्टीतील एका आमदाराच्या चारशे ते पाचशे टॅक्सी असल्याचा आरोपही हल्लीच झालेला आहे, अन् ते लोकांना खरेही वाटू लागले आहे. कारण अनेक आमदार सध्या लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून टॅक्सीवाल्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. टॅक्सीच का, ‘रेंट अ कॅब’चेही तसेच आहे. आता जरी सरकारने त्यावर आळा घातला असला तरी एकेकाच्या मालकीच्या किती ‘रेंट अ कॅब’ आहेत, असा प्रश्न आता केला जात आहे. काही ठिकाणी तीस-पस्तीस अशा कॅब पार्क केलेल्या आढळतात. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर वाहतूक खोळंबाही होतो. मडगावात विद्यानगर येथे, बार्देश बाजारसमोर नेहमीच त्याचे प्रत्यंतर येते. आता ‘रेंट अ कॅब’ही मोजाव्यात, पण वाहतूक मंत्र्यांकडे त्याचे उत्तर आहे का, असा मुद्दा त्यांतून उपस्थित होतो. ∙∙∙
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ अर्थात हॅास्पिसियो या दिवसांत वरचेवर चर्चेत येत आहे, ते वेगळ्या कारणास्तव; अर्थात तेथील असुविधांमुळे. आरोग्यमंत्र्यांचा सारा भर ‘गोमेकॉ’वर असल्याने तर असे प्रकार होत नाहीत ना, असा प्रश्न त्यामुळे लोकांना पडत आहे. सदर इस्पितळात गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचार न करता सरळ ‘गोमेकॉ’त पाठविले जाते, असा आरोप विधानसभेतही झाला होता. परवा तर मडगावात एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला ‘गोमेकॉ’त तातडीने हलविण्याचा प्रसंग आला तेव्हा वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही व त्यामुळे तो दगावला. ही स्थिती असेल तर सरकार रुग्णवाहिकांवर प्रचंड खर्च करून उपयोग तो काय असे कोणालाही विशेषतः अशा रुग्णांच्या कुटुंबियांना पडला तर त्यांत काही चुकीचे नाही.दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री असताना शिलान्यास केलेल्या या इस्पितळाची वास्तू साकारली खरी, पण त्यांत जर रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत , साधी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचारांअभावी मृत्यू येऊ लागला तर तिचा उपयोग काय असा प्रश्न त्यांतून उपस्थित झाल्याशिवाय रहाणार नाही. युवा नेत्यांना मात्र त्यांतून आयतेच मुद्दे मिळतील, असे बाबांचे समर्थक म्हणू लागले आहेत. ∙∙∙
गेल्या काही महिन्यांपासून पेडण्यातील टॅक्सी चालकांनी विविध मागण्यांसह गोवा माईल्सचा काऊंटर मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काढून टाकण्याच्या मागणीसाठी इतके दिवस आंदोलन सुरू ठेवले होते. मात्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत गोवा माईल्सला दिलेला काऊंटर बंद केला जाणार नाही असे ठामपणे सांगितल्याने टॅक्सी चालकच नमरले. त्यांच्यासोबत सरकारशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतलेले स्थानिक आमदारही काहीच करू शकले नाहीत. त्यांनाही हा काऊंटर बंद झालेला हवा होता, त्यामुळेच तर त्यांनी या टॅक्सी चालकांना पुढे काढून आंदोलन सुरू केले होते. मात्र, मुख्यमंत्री गोवा माईल्स काऊंटरबाबत ठाम राहिल्याने अखेर टॅक्सी चालकांनाच माघार घेण्याची पाळी आली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या इतर सर्व मागण्या मान्य केल्या त्यामुळे आंदोलन आणखी ताणून धरल्यास जे पदरात पडलेय तेही आंदोलन अधिक तीव्र केल्यास मिळणार नाही, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे टॅक्सी चालकांतच धुसफूस सुरू झाली आहे. ∙∙∙
कदंब पठारावरील भाजपच्या नव्या भव्य कार्यालय इमारतीची पायाभरणी झाल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजप कार्यालयाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन होणार, असे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय झाला. ‘काँग्रेस हाऊस’ हे अजूनही जुन्या इमारतीत असून या काळात भाजपने चांगल्या ठिकाणी कार्यालय सुरू करून आता नव्या कार्यालयाचे काम हाती घेतले. गोव्यात काँग्रेसने अनेक दशके राज्य केले असले, तरी त्यांना नवे कार्यालय घेता आले नाही. दोनेक वर्षांपूर्वी पाटो येथील एका इमारतीत काँग्रेसने कार्यालय घेण्यासाठी बुकिंग केले होते, परंतु पक्षाने थकबाकी फेडली नसल्याचा प्रकार उघडकीस आला होता. प्रदेशाध्यक्ष कोणी असो, पक्षाची स्थिती मात्र ‘जैसे थे’ आहे. आता अमितरावांनी विधान केल्यानंतर त्यांनी नवीन कार्यालयाचे लवकरच केल्यास ते हिरो होतील, यात काही शंका नाही. परंतु न केल्यास ते टिंगल टवाळीचे धनी होतील हे नक्की, अशी चर्चा सोशल मीडियात रंगलीय.∙∙∙
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.