Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांनी केले राजकीय बॅलन्स!

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांनी केले राजकीय बॅलन्स!

राजकारण्यांना राजकीय बॅलन्स करावेच लागते. मुख्यमंत्री म्हणल्यावर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची कला समजावी लागते. मुख्यमंत्री परवा केपे भागात होते. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यात विस्तव ही जात नाही, हे सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्री परवा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या घरी जावून गणेशाचे दर्शन घेतले व फोटो सेशन ही केले. आता बाबुकडे गेला म्हणजे सुभाष रावाकडे जायलाच लागणार, हे मुख्यमंत्र्यांना माहीत होते. म्हणून मुख्यमंत्री अतिदुर्गम कावरे गावात जाऊन सुभाष फळदेसाई यांच्या जुन्या घरी गणेशाचे दर्शन घेतले व फोटो सेशनही केले. मात्र मुख्यमंत्र्यांनी फोटो इतरत्र पाठवले ते फक्त सुभाषचेच असेही म्हणणारे कमी नाहीत. काही का असेना मुख्यमंत्री जाणतात बॅलन्स कसे करावे ते! ∙∙∙

विजय-गिरीशचा याराना

एकेकाळी विजय सरदेसाई आणि गिरीश चोडणकर यांचा छत्तिसाचा आकडा होता, असे म्‍हणतात की, विजयला फातोर्डातून सहज जिंकता येऊ नये, यासाठी गिरीशने थातूर मातूर का होईना, आपले उमेदवार फातोर्डात उभे केले होते. पण त्‍याचा काही फायदा झाला नाही. त्‍यानंतर सासष्‍टीच्‍या साळ नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे, असे वाटते. कारण आता विजय आणि गिरीश हे राजकीयदृष्‍ट्या एवढे जवळ झाले आहेत की विजयने येथे गोव्‍यात शिंक जरी काढली तर दिल्‍लीत असतानाही गिरीश विजयना पोषक अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतात. बाबूश यांच्‍यावर विजयने येथे मडगावात आरोप केला त्‍यावेळी गिरीश दिल्‍लीला होते. पण त्‍यांनी वेळात वेळ काढून बाबूशची चौकशी करा, असे ट्‍वीट केलेच. यापूर्वी विजयने कुडचडेत संडे डायलॉग्‍स आयोजीत केले होते, त्‍यावेळी अमित पाटकर यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. पण गिरीशने सरकारला जर कुठलाही विरोधक कोंडीत पकडीत असेल तर त्‍याला विरोध का? असे म्‍हणत विजयची भलावण केली. असे काय बरे झाले असावे की गिरीश विजयच्‍या सध्‍या एवढ्या प्रेमात पडले आहे? की चर्चिल म्‍हणतो, तसे की राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही. ∙∙∙

पोलिसांकडून दबंगगिरी!

पोलिस खात्यात नोकरीला लागल्यानंतर फालतू दबंगगिरी करण्याची हुक्की अनेकांना येते. आपण पोलिस आहोत, आपले कुणी काहीच करू शकणार नाही, अशा भ्रमात हे काही पोलिस असतात आणि मग प्रकरण शेकल्यावर डोक्याला हात लावण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच नसते. बाणस्तारीतील पोलिसाला मारहाण प्रकरण हे त्याचेच द्योतक आहे. कारवाई करण्यात आलेला पोलिस हा वास्को पोलिस स्थानकात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे, मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना हेल्मेट न वापरणे, दुचाकी चालवताना रस्त्याची लेन बदलणे, नंबर प्लेट व्यवस्थित नसणे तसेच दुचाकीला साईड मिरर नव्हता, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. शेवटी कायदा हा सर्वांनाच सारखा असतो, त्यात ‘माझे तुझे’ असे काहीच नसते, बरोबर ना...! ∙∙∙

राजकारणात इच्छुक युवा वर्ग

फोंड्यात राजकारणात शिरू पाहणाऱ्या युवकांची संख्या हळूहळू वाढत आहे. अर्थातच विधानसभा निवडणुकीला अडीच वर्षे शिल्लक असली तरी आतापासूनच लाईम लाईट मध्ये येण्यासाठी अशा युवकांकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यात सणासुदीच्यावेळी शुभेच्छा देणारे फलक उभारणे, समाजसेवी संस्थांना मदत करणे, या तसेच इतर प्रकार या इच्छुक युवकांकडून होत असल्याने राजकारणात कोण कुणाच्या विरोधात उभा ठाकतो, त्याचे गणितच मतदारांना कळणे दुरापास्त ठरले आहे. शेवटी राजकीय पक्षाची निशाणी मिळवण्यासाठी अशा युवकांकडून धडपड होतेच, आणि मग ही निशाणी नाहीच मिळाली, की मग हळूच राजकारणातून काढता पाय घ्यायचा हेही प्रकार होतात. ∙∙∙

जेटी व्यवस्थापकाला सूट का?

कुटबण जेटीवर कॉलरा फैलावला, त्यात पाच कामगार ठार झाले. दोनशे कामगार बाधित झाले, हे सर्व घडण्यात जबाबदार कोण? तर सरकारचे वेतन घेणारे मच्छीमार खात्याचे कर्मचारी असलेले जेटी व्यवस्थापक. या सरकार नियुक्त जेटी अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे पाच कामगारांना जीव गमावावा लागला. जेटीवरील गैरव्यवस्थापन रोखण्यास अपयशी ठरल्यामुळे मच्छीमार खात्याच्या संचालकाची बदली केली, मात्र जबाबदार जेटी व्यवस्थापकाला, मात्र त्याच्या अपयशाची सजा झाली नाही, सरकारने त्या जेटी व्यवस्थापकाला सूट का दिली? याबाबतच अधिक चर्चा सुरू आहे. ∙∙∙

मंत्र्यांचे डोळे तरी उघडतील!

कुटबण जेटी परिसरात कॉलरामुळे झालेल्या कामगारांच्या मृत्यूच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्याठिकाणी पाहणी केली. कामगार परराज्यातील असल्याने या घटनेविषयी विरोधकांचा आवाजही बोथट दिसून आला. एका सरकारी खात्याकडून झालेल्या चुकांमुळे सर्व सरकारकडे बोट दाखविले जाते. मुख्यमंत्री यांनी तत्काळ जाऊन भेट देणे किंवा पाहणी करणे हे गरजेचे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कुटबण येथील अस्वच्छता तरी दिसून आली. त्याशिवाय सरकारातील खात्यांकडून किती जबाबदारीने कामे होतात, हेही कळून आले असेल. कुटबण जेटीवरच अशी स्थिती आहे, असे नाही तर पणजी शेजारच्या बेती जेटीवर परिस्थिती काही चांगली आहे, असेही नाही. पणजीच्या मासळी मार्केटमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाऊन फेरफटका मारला, तरी त्यांना तेथील अस्वच्छतेची कल्पना येईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता अशा ठिकाणी भेटी द्याव्यात म्हणजे त्या-त्या खात्याच्या मंत्र्यांची डोळे तरी उघडतील.

धास्तीचे दिवस

स्मार्ट सिटी प्रकल्पातील गैरव्यवहाराचा तपास सुरू झाल्याने काही जणांना चिंता वाटू लागली आहे. स्वयंदीप्तो पाल यांच्याविरोधात एफआयआर नोंद झाला असला तरी तपास पुढे सरकत कोणा कोणापर्यंत आपल्या कवेत घेईल याची कल्पना आल्याने ही घबराट उडाली आहे. सत्ताधारी गोटात याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. पणजीच्या सौंदर्यीकरणावर पाण्यासारखा खर्च करताना कोणी मागेपुढे पाहिले नव्हते. नंतर ते सौंदर्यीकरण नष्ट झाल्यावर नामानिराळे राहण्याचा कोणी प्रयत्न केला होता याची उजळणी यानिमित्ताने होऊ लागली आहे. एकंदरीत कारवाईची धास्तीच जास्त वाटू लागल्याचे दिसत आहे. ∙∙∙

ट्रॉलरमालकांची जबाबदारी

कुटबण धक्क्यावरील एकंदर स्थितीची कल्पना आल्यानंतर दोतोर मुख्यमंत्री संतप्त होणे स्वाभाविक होते. खरेतर गेले अनेक महिने नव्हे, तर अनेक वर्षे मासेमारी हंगाम सुरू झाला की तेथे अशीच स्थिती असायची. यंदा सततच्या मुसळधार पावसामुळे ती अधिक बिघडली व त्याचे पर्यवसान साथीच्या आजारात व काही कामगारांच्या मृत्यूंत झाले. दरवर्षी या परिस्थितीवर प्रसारमाध्यमे रकानेच्या रकाने माहिती प्रसिद्ध करतात, पण सरकारी यंत्रणा नव्हे, तर मच्छीमारी व्यवसायाशी संबंधित मंडळीही गांभीर्याने घेत नाहीत. यंदा साथीच्या आजाराने कामगार दगावले, सगळ्यांची धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारमंत्री व संचालकांना बाजूला ठेवून कुटबणची पहाणी करणे व दिवंगताला भरपाई जाहीर करणे, संबंधित ट्रोलर मालकांना ही तशी ती देण्याचा आदेश देणे यावरून सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे उघड होते. पण मुद्दा तो नाही, तर या आदेशानंतर ट्रोलर मालकांनी नाराजी व्यक्त करणे सर्वांनाच खटकले आहे. ज्या लोकांच्या बळावर आपण जे ऐश्वर्य उपभोगतो, त्याच्या प्रती जबाबदारी टाळण्याची ही प्रवृत्त क्रृतघ्नपणा असल्याचे आता सार्वत्रिक पणे बोलले जात आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: विद्यार्थ्यांच्या भांडणात तिसरीतली विद्यार्थीनी गंभीर जखमी, अत्यवस्थ होऊनही शाळेचे दुर्लक्ष; पालक संतप्त

Sunburn Festival 2024: ‘आमका नाका सनबर्न’! गावपण टिकवण्यासाठी कामुर्लीत स्थानिक एकवटले

Bollywood Actress Alia Bhatt: हसमुख आलियाचा हॉट अंदाज चाहत्यांना मोहीनी घालतोय!

Goa Eco Sensitive Zone बाबत 'सरकारचे' म्हणणे पोचण्याआधी 'ग्रामस्थांची निवेदने' दिल्लीत पोचली; पैंगीण, लोलयेचे जैवविविधतेला प्राधान्य

Kulem Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'; कुत्रे आडवे आल्याने झाला विचित्र अपघात; दोघे आश्‍चर्यकारकरित्या बचावले

SCROLL FOR NEXT