खरी कुजबुज: मासळी विक्रेत्यांची धाकधूक!

Khari Kujbuj Political Satire: खराब रस्त्यांवरून टीकेचे धनी व्हावे लागलेल्या आमदार नीलेश काब्राल यांच्यासमोर कचऱ्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे
Khari Kujbuj Political Satire: खराब रस्त्यांवरून टीकेचे धनी व्हावे लागलेल्या आमदार नीलेश काब्राल यांच्यासमोर कचऱ्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

मासळी विक्रेत्यांची धाकधूक!

पणजीतील मासळी मार्केटजवळील महानगरपालिकेच्या मालकीची जीर्ण झालेली इमारत धोकादायक म्हणून सीलबंद करण्यात आली आहे. परंतु ही इमारत कित्येक वर्षांपूर्वी प्रशासनाने धोकादायक म्हणून जाहीर केली होती, परंतु सांतिनेजमधील इमारत कोसळल्यानंतर महापालिका प्रशासनाने धसका घेत धोकायदाक ठरविलेल्या या इमारतीला टाळे ठोकले. या इमारतीतील व्यवसायिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु सर्वात धाकधूक वाढली आहे, ती मासळी विक्रेत्यांची बाजूची मांसाहारी दुकाने बंद झाल्याने आणि बंद असलेली इमारत धोकादायक ठरविली असल्याने व्यवसायाला बसणारे अनेकजण जीव मुठीत घेऊनच मासळी विक्री शेडमध्ये घुसतात. विशेष म्हणजे दररोज या मासळी विक्रेत्यांची धाकधूक वाढलेली असलीतरी अनेकांना व्यवसाय असल्याने नेमून दिलेल्या जागेवरच बसावे लागत आहे. या विक्रेत्यांनाही स्थलांतराची आस लागल्याचे त्यांच्या बोलण्यातून समजून येते. ∙∙∙

कुडचड्यातील कचरा

कुडचड्यातील खराब रस्त्यांवरून टीकेचे धनी व्हावे लागलेल्या आमदार नीलेश काब्राल यांच्यासमोर कचऱ्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. काकोडा पालिका क्षेत्रात कचरा प्रक्रीया प्रकल्प सुरु झाला आहे. त्याचे कौतुक सरकारलाही आहे. मात्र कचरा संकलनाची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची असते. त्यांनी कचराच गोळा केला नाही तर प्रक्रिया तरी कशावर करणार. कुडचडे भाजी बाजारातील कचऱ्यावरून आता लोक स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात, अशी विचारणा करू लागले आहेत. गणेश चतुर्थीच्या सणादरम्यान भाजी बाजारातील साचलेल्या कचऱ्यावरून राजकीय चिखलफेक कुडचड्यात सुरु झाली आहे. या टीकेला राजकीय दर्प मात्र जरूर आहे. त्याची दबकी चर्चा आतापासूनच कानावर पडू लागली आहे.∙∙∙

विकेट कुणाची पडणार ?

आपल्याकडे क्रिकेट , फुटबॉल या खेळांबरोबरच बेटिंगचा खेळ सट्टा नावाने जन्माला आलाय. कोण जिंकणार व कोण हरणार यावरूनच नव्हे तर कोणता खेळाडू कधी आऊट होणार, यावर पैजा लावल्या जातात. या पैजा आता खेळापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर राजकारण्यांच्या राजकीय भवितव्यावरही आता पैजा लावल्या जात आहेत. राज्य मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची चर्चा आहे. आता सट्टेबाजांकडून यावरही बेटिंग लावली जात असल्याचे कळते. रमेश तवडकरांना मंत्रिपद मिळणार यावर एकास तीन, असा भाव चालतो. तर सगळ्यात कमी भाव आहे, तो गोविंद गावडे यांना गोविंद यांची विकेट पडतेय, यावर रुपयात रुपया भाव आहे.सुभाष फळदेसाई यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळणार, यावर रुपयाला चार रुपये भाव चालतोय. काही का असेना व मंत्रिमंडळात बदल घडो वा ना घडो, सट्टेबाजांनी मात्र आपले मंत्रिमंडळ घडविले आहे.∙∙∙

कुंकळ्ळी काळोखात!

जे चकाकते ते सगळेच सोने नसते, असे म्हणतात ते खरे. गणेशोत्सवाला सगळ्या गावात व शहरात विजेचा झगमगाट केला जातो. चतुर्थी पूर्वी स्थानिक पालिका व पंचायती पथदीपांची रोषणाई करतात. मात्र कुंकळ्ळीत गणेशोत्सव काळात काळोख पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. कुंकळ्ळी बाजारात पथदीप पेटत नाहीत.हाय मास्ट दीप केवळ शोभेसाठी आहेत. पालिकेने कुठेही रोषणाई केल्याचे दिसत नाही. गणेश मंडपाजवळचे पथदीप पेटविण्याचे सौजन्य संबंधितांनी दाखविले नाही. आमदार व नगराध्यक्षांनी बाजारात एक फेरफटका मारला असता तर काळोख दिसला असता, असे गणेश भक्त म्हणायला लागले आहेत. ∙∙∙

चतुर्थीचा काळ; चोरट्यांचा सुकाळ

राज्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून कुणाच्या गळ्यातील दागिने पळव, कुठे घरफोडी कर तर कुठे स्वतः पोलिस असल्याची बतावणी करून लुबाडण्याचे प्रकार सुरू असल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. चोरट्यांनी धुमाकाळ घातल्याने सध्या पोलिसांपुढे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे आहे. ऐन चतुर्थीत तर मडगावात एका चोरीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकडही या चोरट्यांनी लंपास केली. आता चतुर्थीच्या काळात सोन्याचे दागिने एक तरी स्वतःसोबत न्या किंवा बँक लॉकरमध्ये ठेवा, असे वारंवार सांगूनही काहीजणांना ते समजत नाही, त्यामुळे चोऱ्या होतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शेवटी पोलिस आहेतच पण स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतःच घ्यायला नको का, असाही सवाल पोलिसांकडून केला जात आहे. पण काहीजण विचारताहेत सुरक्षितता ही पोलिसांनी द्यायची नाही का, मग पोलिस काय करतात. आता कुणाला काय उत्तर द्यायचे तेच समजत नाही बुवा...! ∙∙∙

निदान जखमेवर मीठ तरी चोळू नये!

राज्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहून साधारण माणसाला रस्त्यावरून चालताना लाज आणि शरम वाटते. पण खंतही वाटते, की प्रत्येक चौकात चौकात नेते, आमदार, मंत्री त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या जनतेला चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मोठ-मोठाले फलक लावून आज स्वतःचे हसे करून घेत आहेत. प्रत्येकजण म्हणतो विकासाच्या नावाने पैसा खाणाऱ्यांना आता याच खड्ड्यात घातले पाहिजे,असा संतापही नेटकऱ्यांतून व्यक्त होतोय. सण, उत्सव आहे म्हणून तरी रस्त्यांची डागडुजी करायला हवी, पण त्याऐवजी तोऱ्यात आपले बॅनर्स, होर्डिंग्स लावून वाहतुकीला अडचण निर्माण करणाऱ्यांना थोडीही लाज, शरम वाटत नाही का?, अशी विचारणाही होऊ लागली आहे. सरकारने लोकांचे हाल पाहून येत्या दिवाळीपूर्वी तरी रस्ते दुरुस्त करावेत, अन्यथा शुभेच्छा देऊन लोकांच्या जखमेवर मीठ चोळू नये,अशाही प्रतिक्रिया उमटताहेत.∙∙∙

फुटबॉलविषयी कुतुहलापोटी

अशे करून गेल्यार, तशे करून गेल्यार, असे लागलेले फलक हे राजकीय नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काहींनी भाषावादाशी त्या फलकांचा संबंध जोडून राजकीय पतंग उडवणे सुरू केले होते. ते फलक येत्या १७ रोजी खेळल्या जाणाऱ्या इंडियन सुपर लीगमधील पहिल्या सामन्याविषयी कुतूहल वाढवण्यासाठी लावण्यात आल्याचे आता उघड होत गेल्याने राजकीय धुळवडीचे स्वप्न पाहणाऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले आहेत. लिपीवरून भाषावाद सुरु झाला की, सरकारला वेठीस धरू शकू, असे मनाचे मांडे खाणाऱ्यांना या फलकांतून फुटबॉल सामन्याची जाहिरातबाजी केली गेली, हे समजल्यावर धक्का बसल्याशिवाय राहिला नाही. यावर त्यांनी मात्र समाज माध्यमांवर मौन बाळगणेच पसंत केले होते.∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: खराब रस्त्यांवरून टीकेचे धनी व्हावे लागलेल्या आमदार नीलेश काब्राल यांच्यासमोर कचऱ्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे
खरी कुजबुज: जेवणावळीवर ४३ लाख खर्च

इंटरनेटही चवथीच्‍या सुट्टीवर?

आधीच उल्‍हास आणि त्‍यात फाल्‍गुन मास असे म्‍हणतात, सरकारी कार्यालयातही हेच तत्‍व लागू होते. आधीच काम करायचा कंटाळा आणि त्‍यात चतुर्थीसारखा आलेला सण. म्‍हणजे कामाला टांग मारून सुट्टीवर जाणे हे आलेच. सध्‍या कुंकळ्‍ळी पालिकेत याच ‘चवथी इफेक्‍ट’चा लाेकांना मार बसला आहे, असे सांगितले जाते. पालिकेतील अर्ध्‍याहून अधिक कर्मचारी चवथीचे निमित्त सांगून सुट्टीवर गेलेले आहेत. जे कोण कामाला आहेत त्‍यांच्‍याकडे काम घेऊन गेल्‍यास इंटरनेट चालत नाही त्‍यामुळे तुमचे काम होऊ शकत नाही, असे सांगितले जाते. त्‍यामुळे आता लोकही विचारू लागले आहेत. इंटरनेटही चवथीच्‍या सुट्टीवर गेलेय का?∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com