Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: बाबू कवळेकरांचे पारडे जड?

Khari Kujbuj Political Satire: राज्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शेतकरी तसेच बागायतदारांशी व्हर्च्युअल संवाद साधला

गोमन्तक डिजिटल टीम

बाबू कवळेकरांचे पारडे जड?

दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायतीच्‍या अध्‍यक्षपदाचा सुवर्णा तेंडुलकर यांना राजीनामा द्यायला लावल्‍यानंतर नव्या अध्‍यक्षपदासाठी दोन नावे चर्चेत होती. ती म्‍हणजे अनिता थोरात आणि संजना वेळीप. वास्‍तविक थोरात यांच्‍या नावाची शिफारस वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्‍हाे यांनी केली होती. त्‍यामुळे त्‍यांचेच पारडे जड होणार असे वाटले होते, पण शेवटी ही माळ संजना वेळीप यांच्‍या गळ्‍यात पडली. वेळीप यांच्‍या नावासाठी माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांनी जोर लावला होता. त्‍यामुळे बाबूंच्‍या शब्दाला अजूनही भाजपात वजन आहे हे एका अर्थाने सिद्ध झाले असेच म्‍हणायचे का? ∙∙∙

केंद्रीयमंत्र्यांकडून रवींचे कौतुक!

राज्यात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शेतकरी तसेच बागायतदारांशी व्हर्च्युअल संवाद साधला. या संवादावेळी राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्यात दूरचित्रवाणीवरील केंद्रीय कृषिमंत्र्यांचे मुद्देसूद भाषण अर्थातच मार्गदर्शन छान झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच कृषिमंत्री रवी नाईक यांनी या संवादावेळी उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्यांचा ताबा असतोच, पण त्यातल्या त्यात रवी नाईक यांच्याकडे कृषी खात्याचा ताबा असल्याने आणि राज्यातील कृषी खात्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतली, त्यांनी प्रत्यक्ष रवी नाईक यांचे कौतुकही केले आणि कृषी खात्याची योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सांगून केंद्रातर्फे अधिकाधिक लाभ गोव्यासाठी देणार असल्याचे जाहीर केले. अर्थातच यावेळी रवींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले नसेल, तर नवलच..! ∙∙∙

हवामान खात्याचे ‘अलर्ट’ चुकताहेत

राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणाऱ्या हवामान खात्याने वेळोवेळी दिलेले संकेत चुकीचे ठरत आहेत. अनेकदा राज्यात मुसळधार पाऊस पडणार असेल, तर या खात्याकडून ‘ऑरेंज’ किंवा ‘यलो अलर्ट’ दिला जातो. त्यानुसार काहीजण आपली कामे या अंदाजानुसार करतात. खात्याने आज ‘एलो अलर्ट’ दिला होता. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही असे या संकेतानुसार समजले जाते. मात्र आज वाळपई व साखळी भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांची धावपळ उडाली. अनेक बाजारपेठांमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. या अचानक पडलेल्या पावसामुळे विक्रेत्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे आता या खात्याकडून देण्यात येणारे इशारे व संकेत कितपत खरे व खोटे यावर लोकांचाही विश्‍वास उडायला लागला आहे. हवामान खात्याचे अधिकारीही या अनपेक्षित पावसामुळे चक्रावून जात आहेत. सकाळी ‘एलो अलर्ट’ दाखविल्यानंतर दुपारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ होतो व लोकही अकस्मात झालेल्या या बदलामुळे गडबडून जात आहेत. ∙∙∙

विरोधकांचे दुर्लक्ष का?

राज्यात बेकायदेशीर डोंगरकापणीच्या सुमारे ९५० वर तक्रारी दाखल झाल्या आहेत. नगरनियोजन खाते (टीसीपी) डोंगर कापणीविरोधात कोटीच्या दंडाचा नियम लवकरच अमलात आणणार आहे. डोंगरकापणीचा विषय सध्या सर्वत्र गाजत आहे. वेरे रेईश मागूस येथील डोंगरावरील सपाटीकरणाच्या विषयावरून आम आदमी पक्षाच्या आमदारांनी तेथे भेट देऊन याविषयी सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी केली. काँग्रेसही डोंगरकापणीच्या घटना निदर्शनास आणून देण्यात काही मागे राहिलेली नाही, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे कुडचिरे येथील बेकायदेशीर चिरेखाणींविरोधात विरोधातील कोणताच पक्ष काहीच बोलत नाही? यामागील गुपित नक्की काय आहे? हे तेथील जनतेला आणि त्या खाणमालकालाच अधिक माहीत असणार आहे. ‘गोमन्तक’ने या बेकायदेशीर चिरेखाणीविषयी काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. जर काँग्रेस आणि इतर पक्ष बेकायदा डोंगरकापणीचे विषय पोटतिडकीने मांडतात, तर कुडचिरेसारख्या ठिकाणच्या विषयाकडे न पाहिल्यासारखी भूमिका घेणे त्यांना उचित ठरणार नाही... त्यामुळे आत्ता तरी त्यांना सबुरीचा सल्ला एवढाच जनता सब जानती है! ∙∙∙

बेशिस्त पर्यटक अन् पोलिस

गोव्यात येणारे काही पर्यटक सर्व नियम धाब्यावर बसवून मन मानेल त्याप्रमाणे वागत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्यास सतावणूक केली जात असल्याचे आरोप या पर्यटकांकडून केले जातात. मात्र, हे पर्यटक बेशिस्तपणे वागतात त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर वाहने घेऊन जाण्यास मनाई आहे. सार्वजनिक जागेतही मद्यप्राशन करणे बंदी आहे. मात्र, गोव्यामध्ये काहीही केले तरी खपून जाते असा समज पर्यटकांमध्ये आहे तो अजूनही बदलला गेलेला नाही. भाड्याने वाहने घेऊन किंवा स्वतःची वाहने घेऊन गोव्यात येणारे पर्यटक रस्त्यावर वाहन चालवताना वाहनांची दारे उघडी ठेवून किंवा वाहनाच्या बोनेटवर बसून नियमांचे उल्लंघन करतात. अनेकदा ते वाहने समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाऊन धोकादायकपणे ती हाकतात. प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर वाहने नेण्यास बंदी असल्याचे फलक लावले आहेत, तरीही पर्यटक त्याला न जुमानता हे प्रकार करत आहेत. अशा पर्यटकांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे. या बेशिस्त पर्यटकांना वठणीवर आणण्यासाठी कायद्यात कडक शिक्षेची आवश्‍यकता आहे. पर्यटकांकडून आरोप केले जातात. त्यामुळे पोलिसह अनेकदा त्यांच्याविरुद्ध कारवाई करताना सावधगिरी बाळगतात. ∙∙∙

सरपंच की टॅक्सीमालक?

या दिवसांत टॅक्सीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेडण्यातील टॅक्सीवाल्यांची समस्या काही प्रमाणात सुटली न सुटली तोच आता दक्षिण गोव्यातील व विशेष करून सासष्टीच्या किनारपट्टी भागातील टॅक्सीवाले आक्रमक बनले आहेत. त्यांनी आपल्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी तसा पवित्रा घेणे यात काहीच वावगे नाही, पण त्यांचे नेतृत्व सासष्टीतील एक सरपंच करत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण अशा आंदोलनात सरपंचाने पडणे व गोवा बंद करण्याची धमकी देणे म्हणजे त्यात आपणाबरोबरच संबंधित पंचायतीला ढकलण्यासारखे होते. तशातच हा सरपंच एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने गुंता अधिक वाढत आहे. त्यामुळे त्याने टॅक्सीवाल्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर अवश्य यावे, पण त्यापूर्वी सरपंचपदाचा भार उपसरपंच वा अन्य कोणाकडे द्यावा. म्हणजे कोणत्याही प्रकरणात पंचायत अडकणार नाही असे बोलले जात आहे. पूर्वी त्यांनी ‘सी फेरर’चा प्रश्न घेऊन त्याचा पाठपुरावा केलेला असला, तरी त्यावेळी ते सरपंच नव्हते. त्यामुळे त्या प्रश्नाशी पंचायतीचा संबंध नव्हता असेही या जाणकारांचे म्हणणे आहे. ∙∙∙

कोकणी मंडळाची भाषा

वार्षिक कथाकथन स्पर्धा रविवारी मडगावात झाली. विजेत्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे फेसबूकवरही पाहायला मिळाली. त्यांत अमुक एकाने ‘पयलें इनाम हातासलें’ असे म्हटले आहे. ‘हातासलें’ म्हणजे हात मारला म्हणजेच चोरले असा एकमेव अर्थ होतो. मुलांनी बक्षिसे मिळवली आहेत. बळकावलेली नाहीत. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली असून ‘हीच का ती राजभाषा?’ असा सवाल विचारला जात आहे. त्या प्रमाणपत्रावर अंतिम स्पर्धेची तारीखही नाही. अमुक अमुक याला/हिला असे त्यात म्हटलेले आहे, तिथं तो की ती हेही कळत नाही. कारण एक शब्द खोडण्याचा आळस की बेपर्वाई हेही समजत नाही. भाषा तज्ज्ञ शणै गोंयबाबांच्या नावाने ही स्पर्धा होत असून या अक्षम्य घोडचुका ही कोकणीची प्रगती का? हा सवाल पालक खेदाने विचारत आहेत. कार्यक्रमानंतर पार्टी झाली, या वाक्यात पार्टी म्हणजे मेजवानी हा अर्थ होतो, पक्ष नव्हे! तथापि, रोमीवाल्यांच्या प्रश्नावर किंवा एका लेखकाच्या वादग्रस्त विधानावरील वादळावर मराठी जनांच्या रोषावर मंडळाने काहीही भूमिका किंवा प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही हे आश्चर्यच. ∙∙∙

‘पंचायत तुमच्या दारांत’चा स्टंट

गोवा सरकारची एक खासियत म्हणजे ते नवनवे कार्यक्रम करून लोकांची दिशाभूल तर करत नाही ना असा सवाल आता सर्वसामान्य लोक सर्रास करू लागले आहेत. गेल्यावर्षी ‘सरकार तुमच्या दारांत’ हा उपक्रम राबवला. त्यातून काय साध्य झाले ते त्यांचे त्यांनाच माहीत. त्यानंतर आता ‘पंचायत तुमच्या दारांत’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. यातून काय साध्य होणार हासुध्दा एक प्रश्नच आहे. रविवारी नावेली मतदारसंघातील दवर्ली-दिकरपाली पंचायतीत या कार्यक्रमाचा शो केला गेला. हा एक दिवसीय कार्यक्रम कशासाठी अशी विचारणा अनेकांनी केली. या पंचायतीत साईश सारखे उत्साही सरपंच लाभल्यावर अनेकांना काही तरी कामे होतील असे वाटले होते, पण तेच आता कसचे काय अशी विचारणा करताना दिसत आहेत. पंचायतीत जागोजागी कचरा टाकण्यास मनाई करणारे फलक लावले आहेत तेथेच कचऱ्याच्या राशी आहेत. फार दूर कशाला मारुती मंदिराजवळील विर्जीनकर निवासालगत गेल्या महिन्यात कोसळलेले झाड अग्निशमन दलाने कापून टाकले ते अद्याप तसेच आहे. ते गटारांत पडल्याने गटार तुंबून रस्त्यावरून पाणी वाहते. ही अवस्था असताना पंचायत दारांत येऊन काय उपयोग अशी विचारणा लोक करत आहेत. ∙∙∙

भाजप सदस्यता मोहिमेसाठी टार्गेट

राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाने सदस्यता मोहीम जोरात सुरू केली आहे. प्रत्येकाला टार्गेट दिले असल्याची चर्चा मात्र यानिमित्ताने होत आहे. सुरवातीला जशी भाजपला लोकांकडून पसंती होती, ती आता काहीशी कमी झाल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी सदस्यता मोहीम वाढवून जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे वळवण्याचे ठरवले असल्याचे समजते. त्यामुळेच ही सदस्यता मोहीम जोरात राबवली जात आहे. अर्थातच या सदस्यता मोहिमेसाठी राज्यभरातील भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच नेत्यांकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: सायबर क्राईम रोखण्यासाठी गोवा पोलिस अलर्ट, 152 मोबईल नंबर केले ब्लॉक

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

SCROLL FOR NEXT