खांडोळा: बेतकी-खांडोळा ग्रामपंचायतीची सर्वसाधारण सभा सरपंच विशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत गावातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा ठळकपणे पुढे आला. रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून, उच्च माध्यमिक विद्यालय ते देवळाय या अंतर्गत रस्त्यावर तर दुर्गंधीमुळे नागरिकांना नाकातोंडावर हात ठेवून जावे लागते, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांनी सांगितले, की पंचायतीकडून कचरा नियमित उचलला जात नाही. काही मजूर वाड्यांवर पोहोचत नाहीत, तसेच वाहनांच्या अनुपस्थितीमुळे कामात अडथळे येतात. वाहन चालक संध्याकाळी येतो, तेव्हा मजूर थकलेले असल्याने काम अपूर्ण राहते, असेही नमूद करण्यात आले.
सरपंच विशांत नाईक म्हणाले, कचरा व्यवस्थापनासाठी पंचायत विविध प्रयत्न करत आहे. मात्र, काही सुशिक्षित व बेजबाबदार नागरिकच रस्त्याच्या कडेला कचरा फेकतात. सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी हे लोक जिथे कॅमेरा नाही तिथेच कचरा टाकतात.
ग्रामस्थांनीच पुढाकार घेत प्रत्येक वाड्यातील पंच, सुजाण नागरिकांनी घराघरांत भेट देऊन कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. उपसरपंच संजीवनी तळेकर यांनी आभार मानले.
देवळाय रहिवासी संघटनेचे अध्यक्ष संतोष परब यांनी वादग्रस्त गेरा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करत, तो कायमचा बंद ठेवण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी अशी मागणी केली.
कृष्णानंद गावकर यांनी देवळाय जंक्शनवर वाहतूक पोलिस व गतिरोधक बसवण्याची मागणी केली.
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या युवकांवर नियंत्रण आणावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. सरपंचांनी पालकांनीच मुलांना समज द्यावी, पोलिस कारवाई झाल्यास त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे सांगितले.
मिलिंद फडते यांनी तामसुलीतील गणेश विसर्जन तळ्याची मोडतोड थांबवावी अशी मागणी केली.
पांडुरंग नाईक यांनी तामसुली-गिमोणा मार्गावरील झुडपे कापावीत व वळणांपूर्वी गतिरोधक बसवावेत, अशी विनंती केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.