
खांडोळा-तांबसुली गावातील कातळावर कधीकाळी नंदनवन फुलेल असे चार दशकांपूर्वी कोणी सांगितले असते... तर तिथले गावकरी हसले असते पण निसर्गप्रेमी आणि ज्येष्ठ शेतकरी मधू गावकर यांनी हा चमत्कार प्रत्यक्षात करून दाखवला आहे.
शेतीकडे शेतकऱ्यांचेदेखील दुर्लक्ष होतेय, शेती कसण्यात आता अनेकांना रस नाही, बहुसंख्य लोकांना चांगली नोकरी फक्त हवी असते पण गेल्या चार दशकापूर्वीच सरकारी नोकरीलाच रामराम करून शेती व इतर व्यवसायात कार्यरत असणाऱ्या खांडोळा-तांबसुली गावातील मधू गावकरांनी गावातील पडिक कातळावर शेकडो ट्रक माती पसरून त्यावर नंदनवन फुलवले आहे. ही नव्या पिढीसाठी कौतुकास्पद बाब आहे.
वयाच्या सातव्या वर्षी आई-वडिलांसोबत भातशेतीतील पाणी तुडवणारा हा मुलगा मोठा झाल्यावर त्याला सरकारी नोकरी मिळाली; पण काही वर्षांतच त्याने नोकरीला रामराम ठोकला आणि पुन्हा तो मातीकडे परतला. आज त्याचे वय ७५ वर्षांचे आहे पण त्याचा उत्साह आणि जिद्द मात्र तरुणाईलाही लाजवेल अशीच आहे.
पावसाच्या पाण्याचा नेमका उपयोग करून घेणे, वेळेवर पाणी देणे आणि कष्ट घेणे यामुळे तिथे त्यांनी हिरवळ फुलवली. या बागायतीत त्यांनी उभी केलेली हिरवळ म्हणजे त्यातील फळझाडे आणि भाज्या. आंबा (मावावार्का, इस्राईली), मोसंबी, नारळ, सिताफळ, कोकम, सुपारी, नागचाफा, सोनचाफा अशी झाडे तर भेंडी, काकडी, दोडकी, कारली, मिरची, अननस, कोथिंबीर आशा भाज्या व हंगामी पिके.
तिथल्या भेंडीच्या झाडांवर तब्बल २०-२५ भेंड्या लगडलेल्या असतात, काकडी मस्त गोडसर असते. "ही भाजी विक्रीसाठी नाही, मित्रपरिवारासाठीच आहे. खारूताईही काकडीचा आस्वाद घेते," मधूभाई अभिमानाने सांगत असतात. या मळ्यात रासायनिक खतांचा वापर नाही– केवळ सेंद्रिय पद्धती त्यामुळे प्रत्येक भाजीला नैसर्गिक चव, गंध आहे.
मधू गावकर केवळ शेतकरीच नाहीत तर ते जलसंवर्धनाचे प्रवक्ते आहेत. गोव्यातील शंभराहून अधिक नाले, ओहोळ, नद्यांवर त्यांची सातत्याने भ्रमंती असते. पाण्याचे महत्त्व पटवण्यासाठी गावोगावच्या लोकांशी ते संवाद साधत असतात, त्यासंबंधाने लेखन करत असतात. पर्यावरणावर त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून, आणखी किमान दोन-तीन पुस्तके लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहेत. भाजीमळ्याच्या त्यांच्या ध्यासामुळेच कातळावरही एक सुंदर जीवन फुललंय. एकेकाळी उजाड पडलेली ही जमीन आज सुगंधी फुलांनी, फळझाडांनी आणि हिरव्यागार मळ्याने बहरलेली आहे. "डोंगरालाही पाझर फुटतो" हा वाक्प्रचार मधूभाईंच्या मळ्यात प्रत्यक्षात उतरल्याचे पाहायला मिळतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.