पणजी: कळसा–भांडुरा प्रकल्पाची हवाई पाहणी करावी, या परिसराला भेट देत असताना आम्हाला पोलिस संरक्षण द्यावे, अशा मागण्या म्हादई बचाव अभियानच्या अध्यक्ष निर्मला सावंत व इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केल्या.
यावर याबाबत आपण ॲडव्होकेट जनरल व संबंधितांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शिवाय म्हादई पाणी तंटा लवादाने मान्यता दिल्यास कळसा–भांडुरा प्रकल्पाच्या पाहणीवेळी पोलिस संरक्षण दिले जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.
म्हादई बचाव अभियानच्या अध्यक्ष निर्मला सावंत यांच्यासह राजेंद्र केरकर, प्रजल साखरदांडे यांनी सोमवारी म्हादईबाबत आपली भेट घेत काही सूचना आणि मागण्या केल्या. यासंदर्भात आपण ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम आणि इतरांशी चर्चा करणार आहे. कळसा–भांडुराच्या प्रत्यक्ष पाहणीवेळी आपल्याला पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
परंतु, त्यासाठी म्हादई पाणी तंटा लवादाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. या पदाधिकाऱ्यांनी याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागावी, अशीही मागणी केली आहे. त्याबाबतही विचार केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
१ म्हादईसंदर्भातील सुनावणी लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे.
२ कळसा–भांडुरा प्रकल्पाची हवाई पाहणी करण्यात यावी तसेच या परिसरात भेट देत असताना आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे.
३ सर्वोच्च न्यायालयातील म्हादई खटल्याची जबाबदारी दिल्लीस्थित वकिलाकडे द्यावी.
४ म्हादई विषयावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घडवून आणावी.
५ म्हादईचा विषय जलस्रोत खात्याचे अतिरिक्त अभियंता दिलीप नाईक यांच्याकडे सोपवावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.