फोंडा: कला अकादमीच्या यंत्रणांमध्ये वारंवार होत असलेल्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणची रवींद्र भवने आणि कला-संस्कृती केंद्रांचा विषय ऐरणीवर आला आहे. तेथे आवश्यक सोयीसुविधा आहेत का?, रसिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो काय? आदी गोष्टींचा घेतलेला हा आढावा.
फोंडा आणि लगतच्या भागातील कलाकारांना आणि रसिकांना विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा, कलाकारांना त्यांची कला पेश करण्याची संधी मिळावी यासाठी उभारण्यात आलेल्या फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिराला सध्या विविध समस्या भेडसावत आहेत. स्थानिक आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी हे राजीव गांधी कलामंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला. उद्घाटन झाल्यावर दुसऱ्यांदा हे कलामंदिर मोडून परत एकदा नूतनीकरणानंतर उद्घाटन झाले. पण समस्या काही संपता संपेनात, अशी सध्या परिस्थिती आहे.
फोंड्यात पूर्वी झावळ्यांचे थिएटर होते. त्यामुळे नाट्य व कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची अतिशय कुचंबणा होत होती. हे सर्व लक्षात घेऊन रवी नाईक यांनी १९९२ मध्ये फोंड्यातील मध्यवर्ती ठिकाणी कलामंदिर बांधण्यासाठी घेतले. त्यानंतर हे काम रखडले आणि शेवटी २००२ मध्ये या कलामंदिराचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि उपमुख्यमंत्री रवी नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
काँग्रेस सरकार असताना राज्यातील रसिकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी अनेक उपक्रम आखण्यात आले. त्यातूनच कलामंदिराच्या माध्यमातून रसिकांना जादा सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुन्हा एकदा कलामंदिराच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले आणि २८ एप्रिल २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हे नूतनीकरणाचे काम गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे हाती घेण्यात आले होते. मात्र या नूतनीकरण कामात अनेक त्रुटी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्घाटन झाल्यानंतर सहा महिन्यांतच मुख्य भागातील छताचा तुकडा कोसळून पडला. सुदैवाने त्यावेळी कुणाला दुखापत झाली नाही. त्यानंतर कलामंदिराला लागलेले शुक्लकाष्ठ काही कमी झालेले नाही. आजही कलामंदिरातील दुर्दशेचा फटका कलाकारांसह रसिकांना बसतो. त्यामुळे नाचक्की ही शेवटी सरकारचीच होत आहे. सध्या सरकारकडे निधी नसल्याचे खासगीत बोलले जाते. त्यामुळे असुविधा दूर करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. फोंडा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले राजीव गांधी कलामंदिर सुसज्ज होईल, तोच खरा ‘सुदिन’ अशा प्रतिक्रिया कलाकार आणि रसिकांकडून व्यक्त होत आहेत.
गळती, वीज, ध्वनियंत्रणा.. बऱ्याच समस्या
राजीव गांधी कलामंदिराचे उद्घाटन केल्यानंतर या वास्तूला गळतीचा शापच बसला आहे. पावसाचे पाण्याची गळती होत असल्याने कलामंदिराला धोका संभवू शकतो. त्यामुळे काही विभाग बंदच करून ठेवण्यात आले आहेत. येथील टाईल्स फ्लोरिंग उखडले होते, त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे, मात्र वीज, ध्वनियंत्रणेची समस्या कायम भेडसावत असते.
संचालक मंडळाचा पत्ताच नाही!
फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिराला सध्या संचालक मंडळच नाही. गेल्या २०२२च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते आतापर्यंत राजीव गांधी कलामंदिराच्या संचालक मंडळाची निवडच करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या कलामंदिर दिशाहीन बनले आहे. कोण काय निर्णय घेतात हेच कळायला मार्ग नाही. आता तीन वर्षे संपली तरी संचालक मंडळातील सदस्यांची नावे ठरत नाहीत. त्यामुळेच हे मंडळ अस्तित्वात आलेले नाही, असे बोलले जात आहे.
आमदारच पडले होते लिफ्टमध्ये अडकून
राजीव गांधी कलामंदिराची लिफ्ट बंदच आहे. गेला बराच काळ ही लिफ्ट सेवा बंद असल्याने लोकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना कलामंदिरातील पहिल्या, दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी मोठे कष्ट सहन करावे लागतात. गेल्या वर्षी तर खुद्द फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक या लिफ्टमध्ये अडकले होते. लिफ्टमधून रवी नाईक दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी निघाले पण अर्ध्यावरच ही लिफ्ट अडकून पडली. शेवटी कशीबशी त्यांची सुटका करण्यात आली.
खुले नाट्यगृह बनले ‘अड्डा’
कलामंदिरात खुल्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या नाट्यगृहाचा वापरच होत नाही. नाट्यगृहात विविध विद्यालयांची स्नेहसंमेलने तसेच इतर संस्थांचे कार्यक्रम व्हायचे. पण आता हे खुले नाट्यगृह टाकाऊ सामानाचा अड्डा बनला आहे.
२०१४ साली स्थापन झालेल्या येथील रवींद्र भवनातील सर्व सोयीसुविधा या आजपर्यंत तरी चांगल्या पद्धतीने सेवा देत आहेत. दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता कधी तरी ही वास्तू तसेच यंत्रसामग्रीच्या निगेचा प्रश्न समोर येत आहे. त्याची योग्य तांत्रिक व्यक्तींकडून दुरुस्ती व देखभाल सुरू आहेच. तथापि सरकारतर्फे या रवींद्र भवनला देण्यात येणारा वार्षिक निधी हा दुपटीने वाढवून देण्याची मागणी रवींद्र भवनतर्फे करण्यात आली आहे.
गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे लवकरच या रवींद्र भवनच्या पूर्ण देखभालीच्या दृष्टीने काम हाती घेतले जाणार आहे. तसेच रवींद्र भवनच्या छपरावर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून पूर्णपणे सौरऊर्जेवरील वीजनिर्मितीची व्यवस्था बसविण्यात येणार आहे.
त्यामुळे या रवींद्र भवनाचे कमासि वीजबिलाच्या स्वरूपातील सुमारे दोन लाख रुपये वाचतील. हा मोठा निधी रवींद्र भवनच्या बचत खात्यात राहणार आहे आणि अशी व्यवस्था निर्माण करणारे साखळी रवींद्र भवन हे गोव्यातील नंबर एकचे रवींद्र भवन ठरणार आहे.
रवींद्र भवनामधील मुख्य सभागृह सुमारे ८०० व्यवस्था क्षमतेचा असून आजपर्यंत या सहभागृहाची निगा योग्यपणे राखण्यात आल्याने कोणत्याही पद्धतीची तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे ऐकिवात नाही. मागील काही दिवसांपूर्वी आतील साऊंड सिस्टिमची काहीशी समस्या जाणवत होती, परंतु गेल्याच वर्षी स्थापन झालेल्या नवीन संचालक मंडळाने यात गांभीर्याने लक्ष घालून पूर्ण सभागृहाची साऊंड सिस्टिम ही डॉल्बी पद्धतीची करून घेतली आहे. त्यामुळे दर्जेदार व प्रोफेशनल कार्यक्रम आयोजित केल्यास आज बाहेरची साऊंड सिस्टम या सभागृहात आणावी लागत नाही.
दुरुस्तीवर मोठा खर्च अपेक्षित
सभागृहाची वातानुकूलन व्यवस्थाही आजही पहिल्या वर्षाप्रमाणेच सुरू आहे. त्यात कधीही बिघाड झालेला किंवा लोकांना त्याचा मन:स्ताप झालेला ऐकिवात नाही. आजही ही व्यवस्था चोखपणे लोकांना सेवा देत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास आवश्यक असलेल्या जनरेटरची योग्य निगा आतपर्यंत ठेवण्यात आली आहे. आता काही जनरेटर्सची वॉरंटी संपल्याकारणाने त्यांच्या देखभालीच्या कामाची जबाबदारी रवींद्र भवनवर आल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित आहे. सदर खर्च सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीतून व्हावा यासाठीच हा निधी वाढवण्याची मागणी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर यांनी सरकारकडे केली आहे.
बायणा-वास्को येथील रवींद्र भवन हे रवींद्र किनारपट्टीपासून अवघ्या काही अंतरावर असल्याने अनेक समस्यांनी घेरलेले आहे. इमारतीसह यंत्रणांवर मोठा परिणाम होतो. पूर्वीची वातानुकूलन यंत्रणा नादुरुस्त झाली होती. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सुविधांचा पुरेपूर लाभ घेण्यास अडचणी येत आहेत.
आता या रवींद्र भवनाच्या अंतर्गत भागाचे नूतनीकरण करताना डिजिटल साऊंड, लाईट तसेच एअर कंडिशन सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अनेक गैरसोयी दूर झाल्या आहेत. नुकताच तेथे ‘पुरुष’ नाटकाचा प्रयोग झाला. यावेळी रंगकर्मी शरद पोंक्षे यांनी या रवींद्र भवनाचे खास कौतुक केले, असे रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी सांगितले.
बायणा वेश्यावस्ती पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यावर मोकळ्या झालेल्या जागेवर रवींद्र भवनाची उभारणी करण्यात आली आहे. माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी रवींद्र भवन उभारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविली होती. त्यानंतर माजी आमदार मिलिंद नाईक यांनी रवींद्र भवनाचे काम वेगाने व्हावे यासाठी लक्ष घातले होते. या रवींद्र भवनामुळे वास्कोतील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
२ कोटी ८० लाख रुपये खर्चून नवीन वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली. लाईट व्यवस्थाही सुधारण्यात आली. साऊंड सिस्टमसाठी खास लक्ष देण्यात आले. त्यामुळे आता विविध नाटके सादर करण्यात येत आहेत. रवींद्र भवनातील मुख्य प्रेक्षागृह म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावकर हॉलची आसनक्षमता ७४० आहे. मिनी हॉल अर्थात मनोहर पर्रीकर सभागृहाची आसनक्षमता १७० असून ते वातानुकूलन आहे.
येथे आर्ट गॅलरी आहे. तथापि, तेथे आता मामलेदार कार्यालय असल्याने वापर करता येत नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्तींसाठी निरनिराळे वॉश रूम आहेत. लिफ्टची, कँटीनची सोय आहे. येथील वाहने उभी करण्यासाठी परिसरात व परिसराबाहेर पार्किंगचीही सोय आहे.
साऊंड, लाईट डिजिटल व्यवस्था हाताळण्यासाठी प्रत्येकी एक कर्मचारी आहे. त्यामुळे काही वेळा कला व सांस्कृतिक संचालनालयाला त्या दिवसासाठी अतिरिक्त कर्मचारी पाठविण्याची विनंती करावी लागते. या कर्मचाऱ्यांपैकी एकाला बीएलओचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे काही वेळा अडचणीला तोंड द्यावे लागते.
येथील रवींद्र भवनाची वास्तू तब्बल आठ वर्षांनी पूर्ण झाली आणि काणकोणवासीयांची गेल्या कित्येक वर्षांची मागणी पूर्ण झाली. मात्र प्रकाशयोजना, ध्वनियंत्रणा या बाबतीत ती खूपच कमी पडत असल्याचे रंगकर्मी व रसिकांचे म्हणणे आहे.
सदर रवींद्र भवन उभारताना कला-संस्कृती खात्याने स्थानिक कलाकारांची एक देखरेख समिती नेमली होती. त्यांनी वेळोवेळी या तांत्रिक बाबी निदर्शनास आणून दिल्या. विशेष म्हणजे या वास्तूत कँटीनसाठी स्वतंत्र जागा नाही. भवनाच्या मोकळ्या जागेत कँटीन उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. येथे आवश्यक सुविधा पुरवा अशी मागणी नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांनी केली आहे.
रवींद्र भवन ही काणकोणातील सर्वांत मोठी वास्तू आहे. मात्र तिची देखभाल करण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. रवींद्र भवन परिसरात गलिच्छ वातावरण आहे व ही गोष्ट काणकोणवासीयांसाठी भूषणावह नाही. रवींद्र भवनात स्वच्छता कामगार, परिषद सभागृहात खुर्च्या नसल्याने कार्यक्रम करणाऱ्या यजमानांना भाड्याच्या खुर्च्या आणून कार्यक्रम करावे लागतात. ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे, असे गावकर यांनी सांगितले.
रवींद्र भवनात अद्याप कँटीनची व्यवस्था नाही. २ जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली. नंतर दोन वर्षांच्या कालावधीत म्हणजे १ जानेवारी २०१९ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र कोरोनामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला. त्यासाठी ६२ कोटी ३० लाख ८३ हजार १४ रुपयांची निविदा जारी करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने हे काम ५९ कोटी २७ लाख ५५ हजार ७४० रुपयांना स्वीकारले होते. कृष्णा बिल्डर्स हे कंत्राटदार आहेत.
रवींद्र भवन प्रकल्पात ८०० आसनव्यवस्था असलेले प्रेक्षागृह, तालीम सभागृह, आर्ट गॅलरी, संगीत, नृत्य आणि नाट्य यासाठी स्वतंत्र वर्ग खोल्या, पाहुण्या कलाकारांसाठी गेस्ट रूम, कँटीन, प्रशासकीय ब्लॉक, वाचनालय आणि अन्य सोयीसुविधा आहेत. ‘लता मंगेशकर’ असे या रवींद्र भवनाचे नामांतर करण्यात आले आहे. मुख्य सभागृहाला माजी कला-संस्कृतीमंत्री संजय बांदेकर यांचे नाव देण्यात येणार असल्याचे विद्यमान कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी उद्घाटन सोहळ्यावेळी जाहीर केले होते, मात्र त्यास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
या रवींद्र भवनात प्रकाश व ध्वनियोजनेची व्यवस्थित सोय नाही. तसेच दिव्यांग कलाकारांना मुख्य रंगमंचावर जाण्यासाठी रॅम्पची व्यवस्था नसल्याचे काणकोणचे एक सूत्रनिवेदक शिरीष पै यांनी सांगितले.
कुडचडे येथील रवींद्र भवनामुळे कुडचडे व आसपासच्या लोकांना खूप मोठा फायदा होत आहे. नाट्यमहोत्सव, तियात्र, बालनाट्य कार्यशाळा, व्यापक नाट्यकार्यशाळा, मुलांसाठी शिबिरे, महिला सक्षमीकरण, विविध लोकप्रकार, संगीतावरील कार्यशाळा, शैक्षणिक कार्यक्रम, छायाचित्रण कार्यशाळा आदी अनेक उपक्रम येथे नियमितपणे आयोजित केले जातात. तियात्र अकादमी ऑफ गोवा (TAG), कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या सहकार्याने विविध महोत्सवही होतात. त्यामुळे सामान्य लोकांची खूप चांगली सोय झालेली आहे.
सुमारे ८०० लोकांना बसण्याची सुविधा आहे. सभागृहातील सुविधांबाबत अजूनपर्यंत तरी लोकांच्या तक्रारी आलेल्या नाहीत. वातानुकूलित सेवा, ध्वनी व प्रकाशयोजना चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. नाटक, तियात्र व इतर काही कार्यक्रमांसाठी सभागृहातील ध्वनियंत्रणा वापरली जाते तर मोठ्या कार्यक्रमांसाठीच बाहेरून यंत्रणा आणली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.