१७ जुलै २०२३ रोजी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळले. रंगमंचाचा उद्ध्वस्त भाग अजूनही तसाच आहे. या रंगमंचाची दुरुस्ती झालेली नाही वा त्यासाठीची कागदोपत्री प्रक्रियाही सुरू झालेली नाही. मात्र या ठिकाणी आता कपडे वाळवण्यास घातलेले बीभत्स दृष्य दिसते.
ज्या ठिकाणी दिग्गज गोमंतकीय कलाकारांनी आपल्या आनंदी स्मृती तयार केल्या त्या ठिकाणाला लागलेली अभद्र कळा नाहीशी होण्याची वाट सारे पाहत आहेत. काही नामवंत गोमंतकीय कलाकारांच्या या जागेबद्दलच्या स्मृती आपल्यालाही कदाचित त्या काळात घेऊन जातील.
चतुरंगचे दशकपूर्ती रंग संमेलन-2000 या कार्यक्रमाची सन्मानिका मिळावी एवढी आमची ऐपत नव्हती पण लतादीदींना त्या सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी मी ५० रुपये शुल्क भरून गच्चीवरच्या स्क्रीनसमोर बसलो. पण कार्यक्रम सुरू होताच सुधीर गाडगीळ व मंगलाताईंचे निवेदनाचे शब्द ऐकून भारावलो आणि तिथले वेळूचे कुंपण तोडून खुल्या रंगमंचाच्या प्रेक्षागृहात १०१ नंबरच्या खुर्चीवर अनधिकृत श्रोता म्हणून स्थापन्न झालो. देवाकडे एकच प्रार्थना होती की मूळ १०१ नंबरवाल्याला कुठेतरी अन्य ठिकाणी गुंतवून ठेव. देवाने प्रार्थना ऐकली. त्या १०१ नंबरवरच्या खुर्चीतून मी अनुभवलेला तो आयुष्यातील परमोच्च सोहळा होता! मी शेवटच्या रांगेत बसलेलो पण नजर पहिल्या रांगेत, जिथे मंगेशकर कुटुंब लक्ष वेधून घेत होते. झाकीर भाईंचा तबलावादनाचा तो तुफान कार्यक्रम.... लतादीदी येताच त्यांचे तबला वादन बंद करून साष्टांग लोटांगण घालणे आणि त्यांचे वादन संपताच लतादीदींनी आपल्या बोटातील हिऱ्यांनी मढवलेली एक अंगठी झाकीरभाईंच्या बोटात घालणे.... आणि ‘शारदेच्या जन्मभूमीतून (विदर्भातून) शारदेच्या लीला भूमीत (गोव्यात) मी आलो’ असं म्हणत शब्दप्रभू राम शेवाळकर यांनी त्या क्षणाचं वर्णन करताना, ‘सुरांनी तालाला दिलेली ही मानवंदना आहे’ हे उच्चारलेले शब्द आजही माझ्या कानात रुंजी घालतात.
-डॉ. गोविंद भगत, निवेदक
अनेक वर्षांपूर्वी भद्रकाली प्रॉडक्शनचे 'करतलो तो भोगतोलो' हे व्यावसायिक नाटक मी दिग्दर्शित केले होते. मच्छिंद्र कांबळी, राजा मयेकर, संजीवनी जाधव, चेतन दळवी हे दिग्गज कलाकार या नाटकात भूमिका करत होते. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर या नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ नाट्य मंदिरमध्ये नाटक सादर होण्याऐवजी खुल्या रंगमंचावर सादर होत आहे त्यामुळे नाटक कसे होईल याबद्दल शंका सर्वांनाच होती. मास्टर दीनानाथ नाट्यमंदिर त्यादिवशी अन्य कार्यक्रमांसाठी आरक्षित झाले होते. नाट्यप्रयोग हाउसफुल होता. संध्याकाळी सात वाजता नाटक सुरू झाले. पडदा उघडल्यापासून प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद नाटकाला मिळायला सुरुवात झाली. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर नाटक सादर होत आहे याबद्दलच्या शंकाकुशंका सारेच विसरून गेले होते. त्याशिवाय खुल्या रंगमंचावर नाट्यप्रयोग सादर होत असल्याकारणाने अधिक संख्येने प्रेक्षकांना सामावून घेता आले होते. खुल्या रंगमंचावर नाटक सादर होण्याचा आनंद या नाटकातील कलाकार उत्साहाने घेत होते. प्रयोग बेहद्द रंगला होता.
कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर मी अनेक नाट्यप्रयोग सादर केले आहे, परंतु 'करतलो तो भोगतोलो'चा तो प्रयोग माझ्या स्मृतीत कायम कोरला गेला आहे.
- रवींद्र आमोणकर, नाट्य दिग्दर्शक
कला अकादमीशी माझा संबंध फार जुना आहे. अनेक वर्षांपूर्वी कला अकादमीची निर्मिती असलेले ‘गोमंत गानवृंद’ आणि ‘गोमंत दर्शन’ या दोन्ही कार्यक्रमांत माझा सहभाग होता. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी ‘गोमंत गानवृंद’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते. या कार्यक्रमाचे सर्वात प्रथम सादरीकरण कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर आम्ही सादर केले होते. रसिकांचं अतिशय उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला होता. त्या कार्यक्रमाची आठवण होताच अजूनही माझे मन हेलावते. ‘गोमंत दर्शन’ ही देखील कला अकादमीची भव्य निर्मिती होती. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर या कार्यक्रमाची तालीम आम्ही कितीतरी महिने करत होतो. ते दिवस मौजेचे होते. खुल्या रंगमंचासंबंधीतच्या माझ्या या आठवणी मी कधीच विसरू शकणार नाही.
गोमंतकीय कलाकारांची निर्मिती असलेले 'तुघलक' या नाटकाची तालीमही अनेक दिवस कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर आम्ही केली आहे. या नाटकाच्या नेपथ्य निर्मितीचा मी भाग होतो. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावरील माझ्या वावराच्या या आठवणी माझ्या स्मृतीत गडद आहेत.
- लाला च्यारी, चित्रकार/नाट्यकलाकार
कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाच्या अनेक आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. लता मंगेशकर यांचा हृद्य सत्कार, आणि त्या निमित्ताने उस्ताद झाकीर हुसेन यांचे झालेले तबला वादन हा एकूण कार्यकम कायम स्मरणात आहे. त्या सोहळ्यात झालेले लालकृष्ण अडवाणी यांचे भाषण, लता दीदींचे सत्काराला उत्तर हे सारेच दिव्य होते. संपूर्ण खुला रंगमंच रसिकाने तुडुंब भरला होता व प्रत्येकजण या कार्यक्रमाला आपली उत्स्फूर्त दाद देत होता.
आमच्या स्वस्तिक संस्थेतर्फे दरवर्षी गुढी पाडव्याला सलग १० संगीताचे बहारदार कार्यक्रम आम्ही खुल्या रंगमंचावर आयोजित केले आहेत. या कार्यक्रमात सुरेश वाडकर, हृदयनाथ मंगेशकर, देवकी पंडित, राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, आरती अंकलीकर, स्वप्नील बांदोडकर अशा दिग्गज गायकांच्या संस्मरणीय मैफली आम्ही आयोजित केल्या. रसिकांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून भरभरून दिलेला प्रतिसाद मला आठवतो.
उस्ताद झाकीर हुसेन आणि त्यांच्या इतर साथीदारांचा ‘शक्ती’ हा फ्युजन कार्यक्रम या खुल्या रंगमंचावर दोनदा अनुभवायला मिळाला. त्या कार्यक्रमाचे सूरही अजून कानात आणि मनात रेंगाळत असतात.
- डॉ. प्रवीण गावकर
कॉलेजमध्ये असतानाचे आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे दिवस मला आठवतात. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावर त्या काळी त्या स्पर्धा व्हायच्या. मी देखील एका वर्षी एकांकिका स्पर्धेत अभिनेता म्हणून भाग घेतला होता. मला विश्वास होता की मी चांगली कामगिरी करेन कारण तेव्हा मी पूर्ण लांबीच्या नाटकांमध्ये देखील काम करायचंचो. खरंतर माझा आत्मविश्वास जरा अतीच होता. या एकांकिकेत मी एकटाच अभिनय करत होतो.
एकांकिका सादरीकरणाच्या दिवशी एकांकिका अर्ध्यावर असताना माझ्या मनात एक विचित्र विचार आला- मी रंगमंचावर कधीच ब्लॅंक होऊ शकणार नाही आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी मी पूर्णपणे ब्लँक झालो होतो. एक मिनिटभर मी सगळं विसरून गेलो. ते मिनिट जणू आयुष्यभराइतके लांबलेले वाटले. मी कसातरी शांत राहण्याचा प्रयत्न केला आणि काहीच झाले नाही असा आव आणून स्टेजवर फिरत राहिलो. नंतर काही वेळाने हळूहळू स्वतःला सावरून, जिथून मी ब्लॅंक झालो होतो तिथून पुन्हा सुरुवात केली.
त्यादिवशी मी एक महत्त्वाचा धडा शिकलो: कलेपेक्षा कोणीही मोठा नसतो. काहींना वाटेल की रंगमंचावरील माझ्या आयुष्यातील हा सर्वात वाईट दिवस होता, परंतु प्रत्यक्षात तो सर्वोत्तम होता. कारण तो प्रसंग ज्याला आम्ही मंदिर मानतो त्या कला अकादमीच्या अशा मंचावर घटला होता, जिथे दिग्गजांनी कला सादरीकरण केले होते. त्या पवित्र रंगमंचाने मला सर्वात मौल्यवान धडा शिकवला: नम्र रहा आणि तुमच्या प्रत्येक सादरीकरणला ते पहिलेच असल्याप्रमाणे वागवा.
- उदय च्यारी, चित्रकार/रेडियो जोकी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.