Kala Academy Goa | Natak Vitthala
Kala Academy Goa | Natak Vitthala Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Goa: योग्य पात्रनिवड अन् उत्तम अभिनय असा 'विठ्ठला' नाटकाचा प्रेक्षकसुलभ प्रयोग

दैनिक गोमन्तक

Kala Academy Goa: विठ्ठल जोशी’च्या पिंपळाच्या झाडावर राहणाऱ्या भुताची आणि नामा शिंपी यांची कथा विजय तेंडुलकर यांनी ‘विठ्ठला’ या नाटकात मांडली आहे. नामा हा गरीब शिंपी विठ्ठलाचा-पांडुरंगाचा भक्त असतो. त्याला विठ्ठलचे भूत त्याच्या दरिद्री दशेतून बाहेर येण्यास मदत करते.

आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी जगत असलेला माणूस आणि प्रत्यक्ष जीवनात इच्छा पूर्ण न झाल्यामुळे भूत बनून राहिलेला माणूस या मधील संबंध दाखवताना, या नाटकात, आपण असेल त्यात समाधानी जगलं पाहिजे, जीवनात लालसेपायी आपण सुखाऐवजी दुःख पदरी पाडून घेतो आणि मेल्यानंतरही आपल्यास सुख प्राप्त होत नाही, असा संदेश भेटतो.

नाटकाच्या सुरुवातीस विठ्ठलाच्या भजनात दंग झालेला नामा शिंपी आपल्या कामात सावळा गोंधळ घालत असताना विठ्ठल हे भूत त्याला सहानुभूतीपूर्वक मदत करते. नामा या मदतीतून आत्मकेंद्रित होताना दिसतो. तो भोंदू कीर्तनकार बंबाजी आणि त्याचा साथीदार जटायूच्या मदतीने विठ्ठलाने केलेल्या चमत्कारांचा दुरुपयोग करून द्रव्य कमावतो, पण अंती त्याला पश्चात्ताप होतो. खऱ्या जीवनाचा अर्थ समजताच तो आपल्या पूर्वीच्या शिंपी कामास जुंपून घेतो.

दिग्दर्शक वैभव नाईक यांनी पात्रांची योग्य निवड केल्याचे दिसले. त्यांनी पात्रांच्या देह रूपाचा तपशील, स्वभावजन्य लकबी आणि जुन्या नाट्यकला प्रकारातून आपले दिग्दर्शन सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला. चमत्कृतीपूर्ण घटना, स्वभावाअंतर्गत विसंगतीचे व्यंगचित्रणात्मक दर्शन, गोंधळ, संभ्रम आणि गैरसमज या घटकांचा विशेष वापर करून तसेच अभिनय आणि कोटीप्रचुर संवादाद्वारे हास्य निर्माण करून त्यांनी प्रयोग प्रेक्षकसुलभ बनविल्याचे दिसले.

नामा ही भूमिका श्रीकांत गावकर यांनी केली. त्यांनी अभिनयात आपल्या शरीराचा विलक्षण लवचीकपणे वापर केला. मुक्तशैलीत अभिनय करून त्यांनी ताजेपणाचा अनुभव दिला. त्यांना भुताची व्यक्तिरेखा उभी करणाऱ्या अमेय प्रभुगावकर यांची उत्कृष्ट साथ लाभली. प्रभुगावकर यांची देहयष्टी, संवादफेक भुताच्या व्यक्तिमत्त्वास साजेशी होती. बायकोची भूमिका करताना संपदा गावस यांनी अभिप्रेत असलेल्या शांत, आनंदी, खिन्न, भय, चिडखोर या अभिनयाच्या छटा योग्य प्रकारे प्रदर्शित केल्या.

विष्णू रघुनाथ गावस यांनी तुंबाजी आणि रोवेश शेलार यांनी जटायूच्या भूमिकेतून सामाजिक, भावनिक, कल्पनारंजक विडंबन व्यवस्थितपणे पेश केले. जानकी ही छोटीशी भूमिका शहानंदा श्रीकांत गावकर यांनी सहजपणे केली. तिचा मुलगा झालेल्या मुलाचा पहिल्या प्रवेशातील हालचाल न होणाऱ्या शरीराचा अभिनय छान वाटला. सागर गावस, गोविंद गावस, दिनेश गावस, नकुल गुरव, गीता गावकर, निकिता गावकर, आलिशा मिनेझीस, सुबोधिनी गुरव, स्वरा शिरोडकर यांनी गावकऱ्यांच्या भूमिकेत योग्य साथ दिली.

पार्श्वसंगीत विनोद चारी आणि तेजस मेस्त्री यांचे होते. त्यांच्या संगीताने संतकालीन नाटकांचा प्रत्यय आणून दिला, तसेच आवश्यक वातावरण निर्मितीस मदत केली. वैभव नाईक यांच्या प्रकाश योजनेत त्रुटी आढळल्या. बहुतेक दृश्यात पात्रांच्या चेहऱ्यावर अंधार जाणवत होता. दृश्यबंध मोहक दिसणे महत्त्वाचे पण नटांच्या चेहऱ्यावरील हावभाव दिसणे त्याहूनही महत्त्वाचे.

तुषार गावकर आणि महादेव गावकर यांनी केलेले नेपथ्य ठीक होते, तरीही नेपथ्यात दाखवलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रयोगाशी ढोबळपणे संबंध प्रस्थापित न होता, तो आंतरिकपणे दिसला पाहिजे. आलिया मिनेझिस यांनी वेशभूषेसाठी निवडलेल्या शैलीच्या प्रकाराचे ‘जस्टीफिकेशन’ होणे महत्त्वाचे होते. रंगभूषा श्रवण फोंडेकर यांनी केली.

स्पर्धेच्या नाटकाला ‘अपरिचिततेला’ सामोरे जाण्याचे सोडून आज प्रेक्षक परिचित विषयांवरील नाटक पाहण्यास आनंद मानतात. त्यांना दिसणारी वास्तवाची मांडणी, सद्य परिस्थितीतील शेरेबाजी, विडंबन, विनोद भेटला की धन्यता मानतात.

जुन्या नाटकातील कलावंतासारखे मान तिरपी करून संतांचे तत्त्वज्ञान आपण किती काळपर्यंत सांगत राहणार? 40-50 वर्षांपूर्वी तुघलक, अंधायुग, आषाढातला एक दिवस, घाशीराम कोतवाल यासारखी नाटके सादर होणाऱ्या मराठी रंगभूमीवर, आपण 2022 साली कला अकादमी नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने सादर झालेल्या, पन्नास वर्षाहून अधिक काळच्या सकस नाट्य परंपरेच्या अनुभवातून, नव्या आणि प्रायोगिक नाट्य शैलींचे अन्वेषण करणाऱ्या दिग्दर्शकांची, नटांची, रंगकर्मींची आणि तंत्रज्ञांची पिढी निर्माण व्हावी, ही अपेक्षा आम्ही धरावी, यात आमचा काही दोष आहे का? श्री सातेरी कलामंच मोर्ले, सत्तरी या संस्थेने विठ्ठला हे नाटक स्पर्धेत सादर केले. ग्रामीण भागातून आलेली ही संस्था आहे.

कला अकादमीच्या स्पर्धेला सुरुवात झाली, तेव्हा जुन्या प्रकाशित नाटकाचा प्रयोग करण्याशिवाय गत्यंतर नव्हते, जुन्या नाटकांना नावीन्यता देऊन प्रयोग सादर होऊ लागले. पारितोषिकासाठी नवीन संहितेची गरज म्हणून काहीजण बाहेरून संहिता प्राप्त करू लागले, तर काहीजण स्वतः नाटक लिहू लागले. तालमीत इम्प्रोविझेशन करू लागले. स्पर्धेने अनेकांना नाटककार, नट, रंगकर्मी, तंत्रज्ञ बनविले.

गोव्यातील गावागावातल्या सांस्कृतिक वातावरणात चेतना आणण्याचे काम स्पर्धेने केले. केवळ पारितोषिकासाठी स्पर्धेत भाग न घेता, आजच्या आजूबाजूच्या बदललेल्या परिस्थितीनुसार सामाजिक बांधीलकी जपून सादरीकरणात आमूलाग्र बदल आणून, स्पर्धेचा चेतनामय प्रवाह ताजा ठेवण्याची जबाबदारी स्पर्धक संस्थांनी घ्यावी ही विनंती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT