World Wildlife Day 2023 : गोव्यात जखमी स्थितीत वन्यपशू सापडले तर त्यांच्यावर त्वरित इलाज करून त्यांचा जीव वाचविण्यासाठी लागणारे अद्ययावत इस्पितळ अस्तित्वात नाही, याबद्दल पशू बचाव केद्राने खंत व्यक्त केली आहे.
वन्यपशू दिनानिमित्त आज ‘सडेतोड नायक’ या ‘गोमन्तक’ टीव्हीच्या कार्यक्रमात या केंद्राचे सदस्य चरण देसाई म्हणाले, ‘वन्यपशू बचाव केंद्राला विविध स्थितीत जखमी झालेल्या पशूंना वाचविण्यासंदर्भात वर्षाकाठी किमान 400 विनंत्या येतात.
त्यातील जखमी पशूला आम्हाला तातडीने इलाज करण्यासाठी एक तर खासगी दवाखान्यात न्यावे लागते किंवा बोंडला पशू अभयारण्यात पाठवावे लागते.
पशू संरक्षण कायद्यान्वये वन्य पशू जखमी अवस्थेत सापडल्यानंतर ते अभयारण्याच्या हद्दीबाहेरच्या रुग्णालयात पाठवावे लागते. कारण एखादा जखमी कोल्हा अभयारण्यातील रुग्णालयात ठेवला तर त्याला असलेला रोग इतर प्राण्यांमध्ये पसरवू शकतो,’
अशी माहिती देसाई यांनी दिली. केंद्राचे अध्यक्ष अमृतसिंग यांनी सांगितले, की वर्षाकाठी आम्हाला 400 तरी आर्जवे लोकांकडून येतात.
एकदा आम्ही नाराजी व्यक्त करून सरकारी पशू बचाव कर्मचाऱ्यांचे फोन क्रमांक द्यायला लागलो, तेव्हा हे फोनच उचलले जात नसल्याचे अनुभव लोकांना आले. अनेकदा वनाधिकाऱ्यांच्या घरात साप येतात, तेव्हा आम्हीच जाऊन ते वाचविले आहेत.’
राज्यात सुविधांची वानवा
गोव्यात समुद्री जीवांचेही प्राण विविध कारणांनी धोक्यात येतात. त्यासंदर्भात कर्नाटकातील एका संस्थेने केंद्राशी संपर्क साधून या जीवांवर उपचार करण्यासाठी मान्यता प्राप्त केली आहे.
‘टिफवॉच’ या संघटनेला केंद्राची मान्यता मिळाली असेल तर वन्यपशूंबाबत राज्य सरकारने दुसऱ्या स्थानिक एनजीओची मदत का घेऊ नये?, असा प्रश्न आहे. घारी, घुबडे आदी पक्ष्यांना बरे केल्यानंतर उडण्याचा सराव करण्यासाठी राज्यात व्यवस्था उपलब्ध नाही, अशीही माहिती मिळाली.
"आम्ही पशू वाचविण्याचे कार्य करूनही सरकारचा दृष्टिकोन फारसा उत्साहवर्धक नाही. अनेकदा जनावरांच्या संरक्षणाचा तुम्हाला अधिकार कोणी दिला?, असा उलट प्रश्न केला जातो. आम्ही अनेकदा प्राणी वाचवितो तेव्हा शाबासकी मिळण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून दुषणेच अधिक येतात."
- अमृतसिंग, अध्यक्ष, पशू बचाव केंद्र
केंद्राची महत्त्वपूर्ण कामगिरी
धक्कादायक बाब म्हणजे बोंडलामध्ये सुद्धा एकच पशूवैद्य असून त्यांच्याकडे यापूर्वीच तीन कामांचे ताबे आहेत. त्यामुळे त्यांच्या पाहणीत येण्यापूर्वी हे जखमी प्राणी दगावतात.
राज्यातील पशू बचाव केंद्र निःस्वार्थी तत्त्वावर राज्यात ठिकठिकाणी धावत जाऊन सापापासून पशु-पक्ष्यांपर्यंत अनेकांचे जीव वाचविण्याचे वैशिष्ट्यपूर्ण काम करतात.
परंतु सरकार स्वतः रुग्णालय सुरू करीत नाही, शिवाय या केंद्रावरही स्वयंसेवी तत्त्वावर ते सुरू करू देण्यास मान्यता देत नाही.
चरण देसाई यांनी गोव्यातील परिस्थितीसंदर्भात केंद्रीय वन खात्याला पत्र लिहून त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.