Panaji Smart City Work Sandip Desai
गोवा

Panaji Smart City : ‘स्मार्ट सिटी’त निव्वळ अनागोंदी; काम पुन्हा सुरू करण्याची कंत्राटदाराला जाग

सांडपाणी वाहिन्या बंद : घरांतील शौचालये तुंबली

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji News : शहरातील स्मार्ट सिटीच्या कामात निव्वळ अनागोंदी सुरू असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. पावसाळ्याच्या तोंडावर टोंक येथील मलनिःसारण प्रकल्पाला जोडणाऱ्या वाहिन्यांच्या चेंबरचे गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले काम पुन्हा सुरू करण्याची कंत्राटदाराला जाग आली.

सांत इनेझ चर्चजवळील सांडपाणी निचऱ्याच्या चेंबरचे काम रखडल्यामुळे सांडपाणी इतस्ततः वाहून दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी वाहिन्या बंद केल्याने या परिसरातील घरांतील शौचालयांत पाणी तुंबले आहे. हे पाणी वाहून जात नसल्याने शौचालयांतील पाणी वर आले आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सांतिनेज चर्च परिसरातील शितल हॉटेलजवळील ताळगाव व करंजाळेकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांच्या मधोमध तीन ठिकाणांहून आलेल्या मलनिःसारण वाहिन्यांच्या चेंबरचे हे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे.

सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे हे काम रखडल्याने नागरिकांना दुर्गंधीसारख्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा या चेंबरच्या ठिकाणी खोदाई करणे, तो खड्डा बुजवणे व पुन्हा खोदाई करणे असे नाट्य सुरू आहे. दररोजच्या या नाट्याला मात्र नागरिक वैतागले आहेत.

वाहतुकीचा बोजवारा

सांत इनेज येथील मलनिःसारण चेंबरचे काम अचानक सुरू केल्याने व वाहतूक व्यवस्थेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने या भागातील वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही काम मंदावले

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी या कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण त्यावेळी कामाची गती वाढण्याऐवजी रोडावली. त्यामुळे हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

नागरिकांत संताप

टोंक येथील मलनिःसारण प्रकल्पाचे काम २२ एप्रिलपूर्वी पूर्ण होईल, असे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी वारंवार सांगितले होते, पण अद्याप सांतिनेज येथील चेंबरचेच काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सांडपाणी प्रकल्पाचे काम दूरच राहिले आहे. काम वेळेवर पूर्ण होत नसून नुसत्या तारखा का सांगितल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे तर ‘स्मार्ट संकट’...

‘आप’ च्या कार्यकर्त्या सिसिल रॉड्रिग्स यांनी सांतिनेज येथील सुरू असलेल्या कामाला ‘स्मार्ट सिटी संकट’ असे संबोधले आहे. त्यांनी पुढील मुद्यांकडे लक्ष वेधले. त्या म्हणतात,

  1. स्मार्ट सिटीच्या कामामुळे सांत इनेझ (वाय जंक्शन) परिसरातील पाइपलाइन दोन वेळा फुटली.

  2. कामाच्या ठिकाणी सतत सांडपाणी वाहत असून पाऊस झाला तर मोठा अनर्थ होऊ शकतो.

  3. या कामामुळे ‘बीएसएनएल’ची वाहिनीही नादुरुस्त झाली आहे. कामाच्या ठिकाणी अभियंतेही गैरहजर.

  4. केबल लाइनवरही परिणाम; लोक संतप्त असून रस्त्याची पूर्ण ‘वाट’ लागली आहे.

  5. पाऊस येण्यापूर्वी हे काम पूर्ण झाले नाही, तर नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

सांतिनेज येथील सांडपाणी पाइपलाइन घालण्याच्या कामाला चार महिने उलटले तरी काम पूर्ण होत नाही. या कामासंदर्भात संबंधित प्रभागातील नगरसेवकांनाही विश्‍वासात घेतले जात नाही. मात्र, त्या प्रभागातील लोकांना होणाऱ्या त्रासामुळे नगरसेवकाला तोंड द्यावे लागते. ही समस्या कधी सुटणार याचा नेम नाही.

- प्रसाद आमोणकर, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT