Purple Fest : पणजी, दिव्यांग व्यक्तींची ओळख ही इतर कोणत्याही बाबीवर अवलंबून नसते तर ती त्यांच्या सामर्थ्यावर अवलंबून असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपाठीवर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय सचिव राजेश अग्रवाल, दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर, आमदार राजेश फळदेसाई, मानसी जोशी, अभिनेत्री अदाह शर्मा, संचालक अजित पंचावाडकर, तहा हाजिक आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्पल फेस्टच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले. गोव्यात दिव्यांश केंद्र, मणका पुनर्वसरन केंद्राची नव्याने सुरूवात करण्यात आली.
दिव्यांगांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, सर्वसामावेशक समाज, दिव्यांगांचे विविध विषय या फेस्टच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. हे फेस्ट सर्वार्थाने यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
पर्पल फेस्ट हा महोत्सव नसून दिव्यांगांच्या आयुष्यात क्रांती घडवून आणणारा उपक्रम आहे. सर्वसामावेशकतेच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
पॅरा ऑलिंपिक, बुद्धिबळचे बक्षीस वितरण
पर्पल फेस्टच्या अनुषंगाने आयोजित पॅरा ऑलिंपिक आणि बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात हरियाणा (प्रथम) उत्तरप्रदेश (द्वितीय) व केरळला (तृतीय) पारितोषिक प्राप्त झाले. बुद्धिबळातील बक्षिसे प्रथम सुपेंद्र पात्रा (ओडिशा),
द्वितीय किशन गांगोली (कर्नाटक), तृतीय मॅनसन जॉर्गन (स्वीडन), चौथे अहत खान (उझबेकिस्तान), पाचवे मारिमुत्तु के (तामिळनाडू) आणि सहावे व्यंकट रेड्डी (आंध्रप्रदेश) यांना प्राप्त झाले. यावेळी राजेश अग्रवाल, गुरुप्रसाद पावस्कर व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.