Environment: आपण जैवविविधता, जंगल आदींच्या संवर्धनाबाबत बोलतो. आपण पृथ्वीकडून केवळ घेत आलोय आणि मोबदल्यात केवळ तिला कचरा दिलाय. शाश्वत भविष्याची सर्वाधिक जबाबदारी मनुष्याला आहे. तसेच सर्व प्राणिमात्रांसाठी देखील गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि शाश्वतता परिषदेच्या समारोप सोहळ्यात यादव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री नीलेश काब्राल, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, सीआयआयचे नितीन प्रसाद, सीमा अरोरा, महेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
मंत्री यादव पुढे म्हणाले, भारताने अमृतकालात प्रवेश केल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात हरित क्षेत्रात वाढ (ग्रीन ग्रोथ) करण्यासाठी नॅशनल ग्रीन हायड्रोजन व इतर बाबींसाठी तरतूद करण्यात आली आहे. ग्रीन क्रेडीटला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकाच पोर्टलवर परवानगी
पूर्वी उद्योगांना पर्यावरण, वन, सीआरझेड, अभयारण्य, आदी विभागांद्वारे वेगवेगळ्या मुंजरी घ्याव्या लागत असत. परंतु पर्यावरण मंत्रालयाद्वारे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यात या सर्व परवानग्या आता एकाच ठिकाणी प्राप्त होतील. त्यामुळे पर्यावरण आणि विकास हे एकमेकांचे विरोधक नसून ते एकत्रितपणे काम करू शकतात.
ई-कचरा मोठी समस्या
देशात ई-कचऱ्याचे प्रमाण अधिक असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काळात 15 ते 20 टक्के वाढ होणार आहे. ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर कशा पद्धतीने करू शकतो याबाबत सर्वांनी कार्य करणे गरजेचे आहे. एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
प्रदर्शनाला विद्यार्थ्यांची भेट
परिषद आवारात पर्यावरणपूरक उपकरणे, कचरा व्यवस्थापन, पूनर्प्रक्रिया करणारी विविध यंत्रे आदी विविध कंपन्यांद्वारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. पर्यावरणप्रेमी नागरिक, विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनाला हजेरी लावली. त्यांनी यंत्रे तसेच विविध उपकरणांची माहिती मिळविली.
पर्यावरणसंबंधी प्रत्येक कंपनीने आपले उद्दिष्ट ठरविणे तसेच वैयक्तिकरीत्या प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. आम्ही वाहतूक क्षेत्रात बदल करत आहोत. तसेच राज्यात 5 टक्के कचरा जमिनीत भरावात टाकण्यात येतो. तो कचरा रस्ता कमांसाठी वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. - नीलेश काब्राल, पर्यावरणमंत्री
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.