नवी दिल्ली: भारताने मंगळवारी (ता.७) रात्री पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यात जैशे महंमदचा म्होरक्या मसूद अजहर याचे कुटुंब मारले गेले. या हल्ल्यांत रऊफ असगर ठार झाला. तो १९९९ मधील ‘आयसी- ८१४’ विमान अपहरण आणि २००१मधील संसदेवरील हल्ल्यासह अनेक मोठ्या दहशतवादी कारवायांचा सूत्रधार होता. बहावलपूर येथील मरकज मशीद सुभानअल्ला या ‘जैशे महंमद’ च्या मुख्य तळावर भारताने केलेल्या लक्ष्याधारी हल्ल्यांत जखमी झालेल्या रऊफचा मृत्यू झाल्याला भारतीय गुप्तचर यंत्रणेने दुजोरा दिला आहे.
भारताने हारोप या ड्रोनच्या साहाय्याने लाहोरमधील एचक्यू-9 हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली असल्याची माहिती गुरुवारी हवाई दलाच्या वतीने देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही एचक्यू-9 हवाई संरक्षण प्रणाली चिनी बनावटीची आहे. या प्रणालीद्वारे लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनाही हवेत नष्ट करण्यात येते असा दावा करण्यात येत होता. मात्र भारताने लाहोर येथील ही हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केल्याने या प्रणालीच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भारताच्या आॅपरेशन सिंदूरचा प्रतिकार करण्यासाठी चीनच्या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता, असा दावा पाकिस्तानने केला होता. या दाव्यावर चीनने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. पाकच्या दाव्याबद्दल विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लीन जिआन यांनी, ‘याबाबत मला कोणतीच माहिती नाही,’ असे सांगत हात झटकले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानने शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा, संयुक्त राष्ट्रांच्या कायद्याचे पुन्हा अवलोकन करावे आणि कोणतीही मोठी कारवाई करण्याआधी त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव निवळावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासह काम करण्यास तयार असल्याचेही जिआन यांनी यावेळी सांगितले.
मुख्य निर्देशांकात मोठी घसरण झाल्यानंतर गुरुवारी पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज (पीएसएक्स) एक तास व्यवहारासाठी बंद ठेवण्यात आला होता. कराची व लाहोरसह महत्त्वाच्या शहरांत ड्रोन हल्ले झाल्याच्या वृत्तानंतर बाजारपेठेत घबराट पसरली व बाजारात घसरण झाली. अधिकृत सूचनेनुसार, अल्पावधीतच निर्देशांकात ६.३ टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर व्यवहार थांबले. भारताबरोबरच्या तणावामुळे पाक शेअर बाजार आधीच अडचणीत असून, बुधवारी बाजार सहा टक्के घसरल्यानंतर ३.१ टक्के घसरणीसह बंद झाला. गेल्या काही महिन्यांतील ही सर्वांत मोठी घसरण आहे. पाक कुवेत इन्व्हेस्टमेंट कंपनीचे प्रमुख अदनान शेख म्हणाले की, ड्रोन पाडल्याच्या बातम्यांमुळे अल्पावधीतच बाजारपेठेत घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. याद्वारे ताज्या घडामोडींची तातडीने दखल घेतली जाणार आहे. या कक्षांचे कामकाज चोवीस तास चालणार असून येथे जमा होणारी माहिती तातडीने संकलित होणार आहे.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री अदेल अलजुबेर हे आज अचानक भारत दौऱ्यावर आले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दहशतवादाला चिरडण्याच्या भारताच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांचा हा नियोजित दौरा असून ते जयशंकर आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यभरात अतिदक्षतेचा इशारा जारी केला असून, खबरदारीचे उपाय केले आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी सांगितले. मंड्या येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्राने जारी केलेल्या सूचनांचे पालन सुरक्षेच्या हितांना लक्षात घेऊन केले जात आहे. धरणे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. आम्ही सर्वत्र दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.