SCO Summit 2023 Goa  Dainik Gomantak
गोवा

SCO Summit 2023 Goa: सीमावादावर भारत-चीन चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

SCO Summit 2023 Goa: गोव्यात बाणावली येथे आजपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद सुरू झाली. या परिषदेत चीन, पाकिस्तान, रशियासह इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री सामील झाले असून या बहुतांश राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री आपल्या शिष्टमंडळासह राज्यात दाखल झाले आहेत.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग यांच्याशी सीमावादावर चर्चा केली. सीमाभागामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. या परिषदेमध्ये अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार असले तरीही सर्वांचे लक्ष भारत-पाकिस्तानच्या हालचालींकडे असणार आहे.

परिषदेचा मुख्य दिवस उद्या, शुक्रवारी असला तरी मुख्य बैठकीपूर्वीच्या चर्चांना सुरुवात झाली असून भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि परिषदेचे सेक्रेटरी जनरल झिंग मिंग यांनी आज बैठकी घेतल्या.

प्रामुख्याने सुरक्षा आणि परस्पर सहकार्य हा या बैठकीचा मुख्य उद्देश असला तरी भारताकडून स्टार्टअप, पारंपरिक औषधे, युवा सशक्तीकरण, बुद्ध वारसा, विज्ञान तंत्रज्ञान आदी मुद्यांवर चर्चा होईल, अशी माहिती डॉ. जयशंकर यांनी दिली.

शांघाय को-ऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ही युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात सक्रिय असलेली संस्था आहे. या परिषदेसाठी चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग,रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्यासह कझाकीस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तानसह यजमान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर सहभागी झाले आहेत.

या परिषदेसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेते राज्यात दाखल झाले आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग गोव्यात दाखल झाले असून आज त्यांनी राजशिष्टाचाराच्या अंतर्गत येणाऱ्या औपचारिकता पूर्ण करत बैठकांमध्ये भाग घेतला.

सर्वांचे लक्ष भारत-पाकिस्तानच्या हालचालींकडे

आंतरराष्ट्रीय मुद्यांना चीनकडून प्राधान्य

राज्य परिषद सदस्य आणि परराष्ट्रमंत्री किन गँग इतर एससीओ सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक परिस्थिती आणि विविध क्षेत्रांतील एससीओ सहकार्य, अशा विषयांवर चर्चा करतील, असे बीजिंगमधील चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

नवे देश दृष्टिक्षेपात

चीन आणि रशियाच्या नेतृत्वाखालील युरेशियन सुरक्षा गटामध्ये कझाकीस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या चार मध्य आशियाई राष्ट्रांचाही समावेश आहे, तर भारत आणि पाकिस्तान हे देश २०१७ मध्ये या गटात सामील झाले आहेत.

इराण व बेलारूस या देशांचाही या गटात समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी परस्पर संबंध दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे.

परस्पर सामंजस्याचे करार अपेक्षित

यजमान भारतातर्फे आंतरराष्ट्रीय सुरक्षा, परस्पर सहकार्य यांसह विज्ञान तंत्रज्ञान, स्टार्टअप इको-सिस्टम, भारताला लाभलेला बुद्ध वारसा युरेशियन राष्ट्रांसमोर मांडण्याची संधी आम्ही साधत आहोत. याशिवाय काही परस्पर सामंजस्याचे करार या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

- डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री, भारत

पाकिस्तानसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असून विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. या परिषदेच्या सदस्य राष्ट्रांशी अन्य विषयांवरही चर्चा, करार अपेक्षित आहेत.

- बिलावल भुट्टो, परराष्ट्रमंत्री, पाकिस्तान.

घुसखोरीच्‍या मुद्यावरून भारताने चीनच्‍या परराष्‍ट्रमंत्र्यांचे वेधले लक्ष

अलीकडच्या काळात पूर्वोत्तर सीमावर्ती भागात चीनकडून होत असलेल्‍या घुसखोरीच्‍या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्‍ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्‍ट्रमंत्री तथा स्‍टेट कौन्‍सिलर किन गंग यांच्‍याशी आज शांघाय परिषदेच्‍या आधी झालेल्‍या बैठकीत सविस्‍तर चर्चा झाली.

सीमावर्ती भागात शांतता, सौदार्हाचे वातावरण राहावे आणि त्‍यासाठी एकमेकांना अधिकाधिक सहकार्य देण्‍याविषयी मुद्दे मांडले गेले.

गेल्‍या तीन वर्षांपासून भारताच्‍या लडाख, सिक्‍कीम आणि अरुणाचल प्रदेश भागात चीनच्‍या सैन्‍याकडून सातत्‍याने घुसखोरी होत आहे. शाब्‍दिक द्वंद्व, धक्‍काबुक्‍की असे प्रकार अनेकदा घडत आहेत. भारतीय सैन्‍याने प्रत्‍युत्तर देताच चीन माघार पत्‍करते. अशा दोन घटनांमध्‍ये दोन्‍ही देशांचे अनेक सैनिक गंभीर जखमी झाले आहे.

त्‍या पार्श्वभूमीवर दीड वर्षानंतर संबंधित देशांचे परराष्‍ट्रमंत्री एकत्र आले असून, या पूर्वबैठकीत प्रामुख्‍याने याच कंगोऱ्यांवर सविस्‍तर चर्चा झाल्‍याची माहिती परराष्‍ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्टीटद्वारे दिली आहे.

उझबेकिस्तानचे मानले आभार

उझबेकिस्तानचे परराष्‍ट्रमंत्री बख्तियार सैदोव यांच्‍याशी देखील एस. जयशंकर यांनी द्विपक्षीय चर्चा केली. बख्तियार यांचे स्‍वागत करत, दोन्‍ही देशांतील संबंध अधिक सुदृढ करण्‍यावर भर देण्‍याचे ठरवण्‍यात आले.

तसेच शांघाय परिषदेच्‍या अध्यक्षपदासाठी उझबेकिस्तानने भारताला दिलेल्‍या पाठिंब्‍याबाबत आभार मानण्‍यात आले. व्‍यापाराच्‍या दृष्‍टिकोनातून दोन्‍ही देशांत भागीदारी वाढत जाईल, असा विश्वासही व्‍यक्‍त करण्‍यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT