Dengue In Goa: ताप, मलेरिया, आदी साथीचे आजार नियंत्रणात असले, तरी डिचोलीत ‘डेंग्यू’ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. उलट ‘डेंग्यू’चा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. बाजार परिसर तर डेंग्यूचा हॉटस्पॉट बनला आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने डिचोलीतील रहिवाशी भयभीत झाले आहेत.
दुकानदारांना मिळून बाजार परिसरातच चार ते पाचजणांना डेंग्यूची लागण झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य खात्याने त्वरित आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अधिकृत आकडेवारी उपलब्ध झाली नसली, तरी सध्यस्थितीत शहरात ‘डेंग्यू’चे दहाहून अधिक रुग्ण असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी फॉगिंग आदी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. अशी माहिती आरोग्य केंद्रातून उपलब्ध झाली आहे. महिन्यापूर्वी डिचोली सामाजिक आरोग्य केंद्र क्षेत्रात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले होते.
आमदार शेट्येंची भेट
दरम्यान, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आज (बुधवारी) सामाजिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांची भेट घेऊन डेंग्यू विषयीची सद्यस्थिती जाणून घेतली.
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरित हाती घ्यावी,अशी सूचना आरोग्याधिकाऱ्यांसह अन्य संबंधितांना केली आहे. जनतेनेही तेवढीच काळजी घ्यावी. ताप आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी.-डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार डिचोली
गेल्या काही दिवसांपासून डिचोली परिसरात सर्दी-तापाचे रुग्णही वाढत आहे. डॉक्टरांकडे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही सध्या वाढू लागली आहे. डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचा आंकडाही
दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दरदिवशी तीनशेच्या आसपास रुग्ण तपासणीसाठी आरोग्य केंद्रात धाव घेतात. यात ताप येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. परिणामी आरोग्य केंद्रावरील ताणही वाढत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.