मोरजी: मोरजी पंचायत क्षेत्रात सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून काही भागांत नळांना कमी प्रमाणात पाणी येते, तर काही भागांत नळांना पाण्याचा थेंबही येत नसल्याने ग्रामस्थ, खासकरून महिलांनी संताप व्यक्त केला आहे. नळांना पाणी नसतानाही पाण्याचे बिल कसे येते, असा सवाल महिलांनी यावेळी उपस्थित केला.
तेंबवाडा येथील महिलांनी सांगितले, की मोरजी पंचायत क्षेत्रात अवघ्याच ठिकाणी 24 तास पाणी असते, तर काही ठिकाणी बारा तास पाणी येते; परंतु दोन महिने झाले तरी नळाला पाणी येत नाही. सत्तेवर येणाऱ्या नवीन सरकारने आणि नवीन लोकप्रतिनिधींनी पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे. सध्या मार्च महिन्याच्या सुरवातीलाच पाणी टंचाई भेडसावत असल्यामुळे आणखी दोन महिने कसे दिवस काढायचे या विवंचनेत लोक आहेत.
वीज खात्यावर भिस्त
चांदेल प्रकल्पातून नियमित पाणी सोडले जाते. परंतु ज्यावेळी विजेचा लपंडाव सुरू होतो, त्यावेळी या प्रकल्पावरील पाणीवाटपाच्या कामावर परिणाम होतो, अशी माहिती तेथील अभियंते फडते यांनी दिली. आम्ही चांदेल प्रकल्पातून नियमितपणे दररोज 15 एमएलडी पाणी सोडतो. त्या पाण्याचे वितरण पेडणे पाणी विभागाचे अभियंते करतात. पाणी कोणत्या भागाला सोडायचे त्याची जबाबदारी पेडणे पाणी विभागाची आहे. पाणीपुरवठा तेच करतात, असेही फडते यावेळी म्हणाले.
मोफत नको, नियमित पाणी द्या!
स्थानिक ग्रामस्थ अल्बर्ट फर्नांडिस म्हणाले, सरकार जर नियमित पाणी देऊ शकत नाही, तर मग नियमित बिले कशी काय देता? नवीन सरकारने आणि नवीन आमदाराने अगोदर पाण्याची समस्या सोडवावी. सरकार एका बाजूने मोफत पाणी देण्याची घोषणा करते, तर दुसऱ्या बाजूने पंधरा-पंधरा दिवस नळाला पाण्याचा एक थेंबही येत नाही. असे असताना बिल मात्र नियमित दिले जाते. आम्हाला मोफत पाणी नको. पण नियमित सहा तास पाणी द्या. त्याचे नियमित बिल आम्ही भरू. मोफत पाणी देण्याची घोषणा ही केवळ घोषणाच असल्याची प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
...अन्यथा घागर मोर्चा
मोरजी पंचायत क्षेत्रातील न्यूवाडा या प्रभागात तर कधीच नळांना पाणी येत नाही. जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर येत्या चार दिवसांत आम्ही पाणी विभागावर घागर मोर्चा नेणार असल्याचा इशारा तेम्बवाडा येथील रहिवाशांनी दिला आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवार मतांसाठी वारंवार आमच्याकडे येतात. मात्र, पाण्याची समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आमच्याकडे फिरकत नाहीत, असे महिलांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.