Goa Rain Update : जुलैच्या शेवटपासून ऑगस्ट महिन्यात कमी झालेला पाऊस, गेल्या चार दिवसांपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारी मॉन्सून पावसाने इंचाच्या आकडेवारीमध्ये शंभरी गाठली आहे. मात्र, यापूर्वीच पाच तालुक्यांमध्ये शंभर इंचापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. राज्याची सरासरी गाठण्यासाठी पावसाला रविवारचा दिवस उजाडावा लागला. अलीकडील दहा वर्षांतील ही सर्वात उशिराची शंभरी आहे.
यंदा अंदमान-निकोबारमध्ये सर्वात अगोदर 22 मे ला मॉन्सून सक्रिय झाला. केरळमध्येही त्याने अगोदरच हजेरी लावली. मात्र, राज्याच्या उंबरठ्यावर कारवारजवळ त्याने चक्क दहा दिवसाचा मुक्काम ठोकल्याने राज्यात उशिरा 10 जूनला मॉन्सून पाऊस सुरू झाला. आतापर्यंतच्या नोंदीनुसार सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यामध्ये झाला असून 5 जुलैला तो 156.2 मिलिमीटर तर 8 जुलैला या वर्षातला सर्वाधिक म्हणजे 161.7 मिलिमीटर कोसळला. मात्र, पुढे 18 जुलैपासून पावसाची गळती सुरू झाली. आणि तो 7 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा कमीच होता. ऑगस्ट महिन्यातला यावर्षीचा पाऊस तर अलीकडील काळातला सर्वात कमी पाऊस आहे. 6 ऑगस्ट रोजी झालेला 40.5 मिमी आणि 9 ऑगस्ट रोजी झालेला 37.2 मिमी पाऊस वगळता संपूर्ण ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला. त्यातही 29 आणि 30 जुलैला सर्वात अत्यल्प पावसाची नोंद झाली.
पाच तालुक्यांत यापूर्वीच नोंद
भारतीय हवामान खाते मिलिमीटरमध्ये पाऊस मोजते. 25.4 मिलिमीटर पाऊस म्हणजे 1 इंच पाऊस. मिमी हे सर्वात अधिक न्यूनतम एकक असले तरी रूढ अर्थाने पाऊस इंचामध्ये प्रचलित आहे. त्यामुळेच पावसाच्या इंचाची शंभरी महत्त्वपूर्ण मानली जाते. राज्यात आतापर्यंत सरासरी 100 इंच पाऊस पडल्याची नोंद झाल्याची माहिती गोवा वेधशाळेने दिली आहे. तरीही यावर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा 9.8 टक्क्याने कमीच आहे.
गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात दक्षिण ओरिसा किनारपट्टीजवळ निर्माण झालेले कमी दाबाचा पट्टा आणि कोकण किनारपट्टी लगतचा टर्फ, यामुळे राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. 14 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून या महिन्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती गोवा वेधशाळेतील वैज्ञानिक डॉ. राजश्री यांनी दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.