फोंडा/वास्को : घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरून दामदुपटीने विकण्याचा काळाबाजार उघडकीस आला आहे. नागरीपुरवठा खात्याच्या भरारी पथकाने सांकवाळ-वेर्णा भागात या रॅकेटचा पर्दाफाश केला. तेथे सात ट्रकांमध्ये एकूण १०२३ सिलिंडर होते, ते जप्त करण्यात आले. त्यातील २८३ सिलिंडरची तपासणी करण्यात आली. त्यात १३२ सिलिंडर कमी वजनाचे सापडले. रात्री उशिरापर्यंत तपासणीचे काम सुरू होते.
भरारी पथकाने ज्यावेळी हा छापा टाकला, त्यावेळी हा काळा बाजार करणाऱ्यांनी साधनांसह पळ काढला. परंतु तीन ट्रकचालक पोलिसांच्या हाती लागले. ही छापेमारी काल मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली. गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याची तक्रार नागरीपुरवठा खात्याकडे आल्यानंतर लगेच मोहीम हाती घेण्यात आली.
सांकवाळ-वेर्णा येथील पिकॉक व्हॅलीच्या मोकळ्या जागेत खात्याच्या भरारी पथकाने छापा टाकून सात ट्रक ताब्यात घेतले. या ट्रकांमध्ये एकूण १०२३ सिलिंडर होते. या छाप्यावेळी नागरीपुरवठा खात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत वेर्णा पोलिस, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी उपस्थित होते.
सांकवाळ येथील ‘काबेज गॅस सर्व्हिस’ या आस्थापनाशी सिलिंडरवाहू सहा ट्रक संबंधित असून एक ट्रक अनोळखी व्यक्तीचा असल्याचे निदर्शनास आले. सध्या सातही ट्रक आणि सिलिंडर वेर्णा पोलिसांच्या ताब्यात आहेत.
उर्वरित सिलिंडरची तपासणी व चौकशी सुरू आहे. हा छापा नागरीपुरवठा खात्याचे साहाय्यक संचालक तुळशीदास दाभोळकर, महेशकुमार नाईक व विजयकुमार जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आला. त्यांना खात्याच्या सरिता मोरजकर, रूबन तोरसकर, श्रवण मळीक, सत्यवान नाईक व सिद्धानंद नार्वेकर यांनी साहाय्य केले. वेर्णा पोलिसांच्या सहकार्याने हा छापा टाकण्यात आला.
नागरीपुरवठा खात्याची धडक कारवाई
नागरीपुरवठा खात्याला सांकवाळ-वेर्णा पठारावरील मुख्य रस्त्यापासून ५०० मीटर आत निर्मनुष्य अशा जागी गॅस सिलिंडरची बेकायदा हाताळणी होत असल्याची खबर मिळाली होती.हा प्रकार मागच्या किती काळापासून सुरू होता, याची चौकशी सध्या केली जात आहे.
घरगुती किंवा व्यावसायिक वापरासाठी या सिलिंडरचा वापर केला जात होता की काय, याबाबतही चौकशी सुरू आहे. भरलेल्या सिलिंडरमधील गॅस काढून खाली सिलिंडरमध्ये भरून त्यावर सील ठोकून हे सिलिंडर दामदुपटीने विकले जायचे. विशेषतः असे सिलिंडर भंगारअड्डे तसेच इतर वापरासाठी देण्यात येत असत.
तपासणीवेळी काही सिलिंडरमध्ये निर्धारित गॅसपेक्षा एक किलो, दीड किलो, दोन किलो तसेच अडीच किलो वजन कमी असल्याचे दिसून आले. हे प्रकरण आता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, पोलिस तसेच नागरीपुरवठा खात्याच्या सहकार्याने हाताळले जाणार आहे.
गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या वापरातील गॅस सिलिंडर हा एक घटक आहे. ग्राहक पूर्ण पैसे भरून सिलिंडर घेतात. मात्र हे सिलिंडर जर कमी वजनाचे असतील तर साहजिकच ग्राहकांनाच त्याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे काळाबाजार करून ग्राहकांना फसवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. - रवी नाईक, नागरीपुरवठामंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.