पणजी: गोवा मुक्तीसंग्रामात महत्वाची भूमिका बजावलेल्या क्रांतिवीर मोहन रानडे यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाने अनेकांची मनं जिंकून घेतली. निखिल दीक्षित यांच्या सायलेंट सॅक्रिफाईज नावाच्या माहितीपटाचं पणजीत आंतराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शनावेळी सादरीकरण झालं. निखिल दीक्षित यांनी तयार केलेल्या या माहितीपटात काही ऐतिहासिक फुटेज तसेच तज्ञांचे विश्लेषण आढळते. यामुळे एकूणच मोहन रानडे यांचं योगदान सर्वसमावेशक स्वरूपात पाहता येतं.
मोहन रानडे यांचा जन्म १९३० मध्ये सांगली, महाराष्ट्र येथे झाला होता. या माहितीपटाच्या माध्यमातून मोहन रानडे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला आहे. पोर्तुगीजांच्या जुलुमी राजवटीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेले आटोकाट प्रयत्न, १९६० मध्ये सुनावण्यात आलेली २६ वर्षांची शिक्षा तसेच पोर्तुगालमध्ये सहन केलेले अत्याचार यावर दीक्षितांचा माहितीपट भाष्य करते.
गोवा परकीय राजवटीतून मुक्त झाल्यानंतर देखील मोहन रानडे यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले नव्हते, गोवा मुक्तीनंतर रानडे १३ वर्षांसाठी पोर्तुगालमध्ये शिक्षा भोगत होते.
या माहितीपटाचे निर्माते वामन प्रभू हे स्वतः मोहन रानडे यांच्या परिचयातील व्यक्ती आहेत. दिग्दर्शक निखिल दीक्षित यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण माहितीपट तयार करण्यासाठी त्यांना एक वर्षभराचा अवधी लागला होता. हा माहितीपट केवळ एक श्रद्धांजली नसून गोव्यात लवकरच मोहन रानडे यांचे स्मारक उभे राहावे म्हणून जीवनज्योत संस्था आणि निर्माते वामन प्रभू यांनी केलेला प्रयत्न आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.