Sri Sri Ravi Shankar In IFFI Goa 2024
पणजी: कलाकार, मग तो कोणताही असो, तो कला सादर करून लोकांना हसवतो, आनंदी ठेवतो; परंतु त्याच्या आयुष्यातही दुःख असतेच. हे दुःख दूर झाले पाहिजे. त्यासाठी कलाकाराने केवळ कला सादर करतानाच आनंदाचे क्षण न जगता प्रत्येक क्षणी आनंद लुटायला हवा, असा मूलमंत्र ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी दिला.
ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant), बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार, श्री श्री रविशंकर, खासदार सदानंद तानावडे, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नारळाच्या रोपाला पाणी घालून झाले. भारताची विविधता आणि धार्मिक परंपरा यांचे दर्शन घडविणाऱ्या ‘भारत वंदन’ या नृत्य कलाविष्काराने उद््घाटन सोहळ्यास प्रारंभ झाला.
अभिनेता बोमन इराणी यांनी ‘टाईमलेस सोल्स’ या कार्यक्रमातून राज कपूर, अक्किनेनी नागेश्वर राव, तपन सिन्हा आणि मोहम्मद रफी या लिजंड्सना दृश्ये, संगीत आणि कविता यांच्या माध्यमातून काव्यात्मक अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री श्री रविशंकर यांचा शाल आणि मानचिन्ह देऊन सन्मान केला. तसेच अभिनेता जयदीप अहलावत, अभिनेता नागार्जुन अक्कीनेनी, आर. सरथ कुमार, राजकुमार राव, अभिनेत्री प्रणिता सुभाष, अमला अक्किनेनी यांचाही सन्मान केला.
माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी दिग्दर्शक सुभाष घई, चिरनंदा नायक, आर. के. सेल्वमणी, अभिनेता बोमन इराणी यांचा सन्मान केला. अभिनेता रणदीप हुड्डा, अभिनेत्री नित्या मेनन यांचाही सन्मान करण्यात आला. शाल आणि मानचिन्ह देऊन सत्कारमूर्तींना सन्मानित करण्यात आले. उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अभिषेक बॅनर्जी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी केले.
यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, आर. के. सेल्वमणी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि गीतकार प्रसून जोशी, प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन, नित्या मेनन, मानुषी छिल्लर, बोमन इराणी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, जयदीप अहलावत, रणदीप हुडा, सान्या मल्होत्रा, आर. सरथ कुमार, अंकिता लोखंडे, विकी जैन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
‘जानावी डान्स क्लॅन’ या ऑस्ट्रेलियन डान्स ग्रुपने अनोख्या नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या देशातील संस्कृतीचे दर्शन नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांसमोर मांडले. यावर्षी ऑस्ट्रेलिया हा इफ्फीतील विशेष आकर्षणाचा देश म्हणून निवडला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, पर्रीकर यांनी २००४ साली इफ्फीची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने गोवा (Goa) हे इफ्फीचे कायमस्वरूपी स्थळ बनले. आज देश-विदेशातून या महोत्सवाला प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक उपस्थित राहतात. इफ्फीने गोव्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आज जगभरात गोव्याचा नावलौकिक आहे.
उदघाटन सोहळ्यापूर्वी पणजीतील आयनॉक्स थिएटरमध्ये ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकल ग्रेसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटातील कलाकारांनी रेड-कार्पेटवर उपस्थिती दर्शविली. याठिकाणी चारही चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा दाखविण्यात आला. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
सैनिक जेव्हा भारताच्या सीमांवर ऊन-वारा-पावसाची पर्वा न करता भारतीयांची सुरक्षा करतात, तेव्हा त्यांचा कुटुंबात कोणत्या समस्या असतात आणि त्यांचे आयुष्य काय असते हे दाखविणारा ‘फौजी-२’ हा कार्यक्रम दूरदर्शनवर प्रसारित होत आहे. या शोमध्ये काम करणारे कलाकार इफ्फीच्या व्यासपीठावर आले होते. सोमवार ते गुरुवारी प्रसारित होणारा हा शो पाहण्याचे आवाहन त्यांनी रसिकांना केले.
‘क्रिएटीव्ह माईंड’साठी १०३२ प्रवेशिका आल्या
यातून यावर्षी १०० जणांची निवड केली.
चित्रपटांसाठी १०१ देशांतून आल्या १,६७६ प्रवेशिका.
अभिनेता ईशान खट्टर, तसेच अभिनेत्री मानुषी चिल्लर यांचे नृत्य सादरीकरण.
इफ्फीत प्रथमच लाईव्ह भारतीय सांकेतिक भाषांचा अनुवाद.
त्यामुळे कर्णदोष असलेल्यांनी महोत्सवात घेतला आनंद.
अभिनेता सनी कौशल आणि सान्या मल्होत्रा यांच्या नृत्याने महोत्सवाची सांगता.
या सोहळ्यास शेकडो सिनेरसिक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.