Goa Government: सरकारी कार्यालयांत होणाऱ्या जनतेच्या कामांतील मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी केला जात आहे. त्यातही आणखी सुधारणा केली जाणार आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची अधिक माहिती मिळेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ‘गोमन्तक टीव्ही’च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लोकाभिमुख प्रशासन’ विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन दीप प्रज्वलनाने मुख्यमंत्री आणि उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांनी केले.
त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. या चर्चासत्राचे संचालन ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, लोकाभिमुख प्रशासन अशा चांगल्या विषयावर ‘गोमन्तक’ने चर्चासत्र ठेवले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे मते-मतांतरे ऐकावयास मिळतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात डिजिटल क्रांती केली आहे. त्यामुळे डिजिटल युगात लोकाभिमुख प्रशासन देणे शक्य होत आहे. लाभार्थ्यांना थेट त्यांच्यापर्यंत लाभ देता येत आहेत. राज्य सरकारने १२७ योजना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केल्या आहेत.
स्वयंपूर्ण मित्र कार्यरत आहेत. त्यांच्या जोडीला ग्रामीण मित्रही नेमले आहेत. सामुदायिक सेवा केंद्र चालवणाऱ्यांकडे घरपोच सेवा देण्याची जबाबदारी सोपवली आहे. ‘प्रशासन तुमच्या दारी’ हे ‘सरकार तुमच्या दारी’च्या पुढचे पाऊल आहे. नागरिकांना आता कामासाठी सरकारी कार्यालयांत जाण्याची गरज नाही.
ग्रामीण मित्रांच्या मदतीने घरबसल्या सगळ्या सेवा नागरिकांना उपलब्ध केल्या आहेत. नागरिकांना ऑनलाईन सेवा घेणे समजत नसेल तर सामुदायिक सेवा केंद्रातून तशी सेवा घेता येते.
दफ्तर दिरंगाईचा जनतेला फटका : दत्ता नायक
उद्योजक दत्ता नायक यांनी सांगितले, दक्षिण गोवा नगर नियोजन प्राधिकऱणाकडे बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रकल्प पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी अर्ज केला. अद्याप हे प्रमाणपत्र मिळालेले नाही. ते न मिळाल्याचा फटका बांधकाम व्यावसायिक म्हणून मला बसला आहेच; पण त्या प्रकल्पात सदनिका घेतलेल्या १२० जणांनाही बसला आहे. त्यामुळे प्रशासन गतिमान हवे.
मी राज्य व राज्यातील जनता यांच्याशी बांधील आहे. अद्याप बऱ्यात खात्यांत जनतेच्या कामातील मानवी हस्तक्षेप काढून टाकण्याची गरज आहे. जनतेला चांगल्या सेवा मिळणे गरजेचे आहे. या विचारांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल.- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.