प्लॉट किंवा इमारतीत कमी किमतीत फ्लॅट देतो, असे सांगून राज्यात अनेकांना ठकवलेल्या विदिशा आणि विजयनाथ गावडे या दाम्पत्याला फोंडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नंतर त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता एक दिवसाचा रिमांड वाढवला. तसेच डिचोली आणि वाळपईतही या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
या दाम्पत्याने कितीजणांना फसवले आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवाय लोकांकडून जमवलेले सुमारे साडेतीन कोटी रुपये कुठे आहेत, हेही स्पष्ट झालेले नाही. पोस्तवाडा-होंडा येथील विजयनाथ गावडे याने पत्नी विदिशाच्या मदतीने अनेकांना गंडा घातला आहे.
दाम्पत्याचे अनेक कारनामे
होंडा येथील ‘त्या’ दाम्पत्याने अनेक ठिकाणी कारनामे केल्याचे समोर येत आहे. या दाम्पत्याने डिचोलीतही काहीजणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा संशय आहे. माझ्यासह माझा भाऊ आणि मित्रांची मिळून सुमारे 25 लाखांची लुबाडणूक केली, अशी तक्रार अजित कामत यांनी डिचोली पोलिस स्थानकात केली आहे.
या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलिस निरीक्षक दीपक गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊसकर पुढील तपास करीत आहेत.
नातेवाईकांनाही घातली ‘टोपी’
या दाम्पत्याने प्रत्येकाकडून किमान दहा लाख रुपये उकळल्याने हा आकडा सुमारे साडेतीन कोटींच्या वर जातो. पैसे घेऊनही निर्धारित वेळेत प्लॉट किंवा फ्लॅट न मिळाल्याने फसवणुकीस बळी पडलेल्या लोकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे कैफियत मांडली. त्यामुळे ही तक्रार दाखल झाली, असे सांगण्यात येते. तक्रार करणाऱ्यांत गावडे याचा एक नातलगही आहे.
संशयित सरकारी कर्मचारी :
विजयनाथ गावडे हा फोंडा येथील आयडी उपजिल्हा इस्पितळात एमटीएस कामगार म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी विदिशा ही गुंतवणूक व तत्सम आर्थिक व्यवहार करते. सरकारी नोकरी असूनही जादा पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी त्यांनी हे कृत्य केल्याचे सिद्ध झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.