मडगाव: मडगावातील समाज कार्यकर्ते शिरीष काणे यांच्या मृत्यूनंतर जिल्हा इस्पितळ म्हणून वावरणाऱ्या मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळाची दैना पुन्हा एकदा दिसून आली असून या इस्पितळाकडे स्वत:च्या सक्षम अशा रुग्णाहिकाच नसल्याचे आढळून आले आहे.
वास्तविक या इस्पितळाकडे पाच रुग्णवाहिका होत्या. मात्र, त्यातील दोन रुग्णवाहिका भंगारात काढल्या असून त्या अजूनही इस्पितळाला बदलून दिलेल्या नाहीत. या भंगारात काढलेल्या रुग्णवाहिका इस्पितळाच्याच आवारात धूळ खात पडलेल्या आहेत.
आणखी एक रुग्णवाहिका तर अशा अवस्थेत आहे की या गाडीचा सक्षमता दाखला (फिटनेस सर्टिफिकेट) नसल्याने ही रुग्णवाहिका आता रस्त्यावर आणणे बंद केले आहे.
एका रुग्णवाहिकेची क्लचप्लेट मोडल्याने ती चालण्याच्या अवस्थेत नसून आणखी एक रुग्णवाहिका फक्त रक्तपेढी विभागाच्या कामालाच वापरली जाते.
काणे यांना शनिवारी गंभीर अवस्थेत गोमेकॉत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी हॉस्पिसियोकडे याच कारणांमुळे रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. १०८ ची रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने या गंभीर अवस्थेतील रुग्णाला सुमारे एक तास तशाच अवस्थेत ठेवण्यात आले होते.
हॉस्पिसियोच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सध्या या इस्पितळात टीबी इस्पितळाला देण्यात आलेली रुग्णवाहिका वापरली जाते. मात्र, या रुग्णवाहिकेचेही दिवे पेटत नसल्याने ती रात्रीच्यावेळी वापरता येत नाही.
हॉस्पिसियोच्या रुग्णवाहिका जुन्या झाल्या असून त्यांची वेळोवेळी डागडुजी केली जात नसल्याने त्या वारंवार बिघडतात अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
ज्या कंपन्यांकडून या रुग्णवाहिका विकत घेतल्या होत्या, ती कंपनीही या रुग्णवाहिका दुरुस्तीला दिल्यास स्वीकारत नाही, याचे कारण म्हणजे या कंपनीची बिले थकवून ठेवली आहेत.
सध्या जी एक रुग्णवाहिका नादुरुस्त झाली आहे, ती त्यामुळेच एका खासगी मेकॅनिककडे दुरुस्त करायला दिलेली आहे. एकूणच हॉस्पिसियोच्या रुग्णवाहिकांच्या बाबतीत हा असा सावळा गोंधळ चालू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.