पर्वरी: भाजपशासित गोव्यात हिंदू धर्म धोक्यात आहे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे. पर्वरीत उड्डाणपुलाच्या कामावेळी २०० वर्षे जुने वडाचे झाड आणि देव खाप्रेश्वर मंदिराच्या स्थलांतरावरुन रविवारी (०२ मार्च) मोठा वाद झाला. यावेळी भाविक आणि राजकीय नेत्यांनी घटनास्थळी हजेरी लावत स्थलांतराला विरोध केला.
राखणदार देव खाप्रेश्वराचे मंदिर स्थलांतर करण्याचा आदेश नसताना सरकार स्थलांतर का करतेय? असा सवाल राजकीय नेते आणि भाविकांनी उपस्थित केला. अमित पाटकर देखील यावेळी घटनास्थळी उपस्थित होते.
खाप्रेश्वर देवस्थान वाचवण्यासाठी सरकारला उड्डाणपुलाच्या कामात ५-१० कोटी अधिक खर्च येणार होता. पण, इव्हेंटच्या नावे पैसे उडवणाऱ्या सरकारकडे देवासाठी खर्च करायला पैसे नाहीत. मूर्ती हलत नाही यावरुन रक्षकाची ताकद लक्षात येते, असे अमित पाटकर म्हणाले.
देव खाप्रेश्वराची मूर्ती हटविण्यासाठी कोणतेही आदेश नसताना ती का हलवली जात आहे? गोव्यात भाजपशासित राज्यात हिंदू धर्म सुरक्षित राहिलेला नाही. मूर्ती हलवून कोठे नेली जाणार? याबाबत काही माहिती दिली जात नाही, असे पाटकर म्हणाले.
तसेच, कारवाईवेळी शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकाला पोलिसांनी देखील शिवीगाळ केल्याचा आरोप पाटकरांनी केला. त्या पोलिसाविरोधात देखील कारवाई करण्याची मागणी अमित पाटकर यांनी यावेळी केली.
दरम्यान, रविवारी (०२ मार्च) मोठा वाद झाल्यानंतर देव खाप्रेश्वर मंदिराच्या स्थलांतरणाची प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, पहाटे तीनच्या सुमारास मूर्ती हटविण्यात आली. तसेच, २०० वर्षे जुने झाडाचे देखील स्थलांतर करण्यात आले.
यावरुन आपचे नेते अमित पालेकरांनी सरकारवर निशाणा साधला. "भाजपने दरोडेखोरांसारखे कृत्य करत पहाटेच्या सुमारास लोक झोपेत असताना देवाची मूर्ती कट केली. सर तुम्ही असे का केलेत? एक हिंदू म्हणून मी एवढा असह्य कधीच झालो नव्हतो", असे म्हणत पालेकांनी पंतप्रधान मोदींना टॅग करता तुम्ही उत्तर द्याल का? असा सवाल उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी बोलताना वडाच्या झाडाचे आणि देव खाप्रेश्वराचे व्यवस्थित स्थलांतर केले जाईल, अशी माहिती दिली. देव खाप्रेश्वराचे वडाच्या झाडाजवळच मंदिरा उभारले जाईल असेही मुख्यमंत्री सावंत यांनी आश्वसत केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.