Goa Monsoon Updates: पणजी शहरापासून अवघ्या 140 किलोमीटर अंतरावर समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या वादळाचा प्रभाव राज्यभर दिसून येत असून गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हे वादळ किनारपट्टीवर धडकल्यास ते अधिक उपद्रवकारक ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील १३ पैकी सहा पर्जन्यमापक स्थानकांवर १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. हवामान खात्याने आज मॉन्सून समाप्तीची घोषणा केली असून राज्यात ११.५ टक्के अतिरिक्त पाऊस पडल्याचे जाहीर केले आहे. राज्यात ३००७.८ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३३५५.३ मिमी. पावसाची नोंद झाली.
जारी केलेल्या रेड अलर्टमुळे प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा पुन्हा सज्ज झाली आहे. रविवारी 1 ऑक्टोंबर रोजी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यांवर आले असून कुशावतीसह म्हादई यासारख्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच जेटी-रुमडावाडा येथे घरांवर दरड कोसळल्याची दुर्घटना घडली.
राज्यात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र दाणादाण उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील १२ तासांत नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून दरड, झाडे कोसळणे, पाणी साचणे, वाहतूक कोंडी अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण १३२ इंच पाऊस पडला आहे. मागील २४ तासांत राज्यात ३.४ इंच पावसाची नोंद केली असून सरासरी पावसाच्या तुलनेत ११.५ टक्के अधिक पाऊस राज्यात पडला आहे.
धरणे ओव्हरफ्लो
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यातील सर्वच सहाही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. यात साळावली (१०४.७ टक्के), अंजुणे (१००.५ टक्के), आमठाणे (१००टक्के), पंचवाडी (१०३.१ टक्के), चापोली (१००.५ टक्के), गावणे (१०१.१ टक्के) या धरणांचा समावेश असून साळावली आणि अंजुणे धरणांतून पाणी विसर्ग सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.