Ponda News फोंडा तालुक्यातील सावईवेरे गावातील आधुनिक शेतकरी संजय पाटील यांच्या कुळागरात प्रत्यक्ष भेट देत सोनाळ-सत्तरीच्या बागायतदार शेतकऱ्यांनी पाटील यांनी केलेल्या आधुनिक शेती प्रयोगांची माहिती जाणून घेतली.
यावेळी पाटील यांनी पाण्याच्या कमतरतेवर मात करत कशा प्रकारे सुपारीची बागायती फुलवली यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पाण्यासाठी कुळागरात कशाप्रकारे मोठमोठे बोगदे मारून पाणी कुळागरात पोहोचवले याची माहिती दिली. त्यांनी मोठमोठे बोगदे शेतकऱ्यांना दाखविले.
संजय पाटील यांनी कुळागर जिवंत ठेवण्यासाठी बोगदे मारत पाण्याचे स्रोत मिळविले हे पाहून सोनाळचे शेतकरी अवाक् झाले. पाटील यांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार यावेळी त्यांनी काढले.
सोनाळचे बागायतदार शेतकरी श्रीधर काळे, बाळू राणे, किशोर नेने, दाजी मोरे, संभाजी मोरे, कृष्णा नेने, दिगंबर नेने, शिवराम राणे, कृष्टा नार्वेकर, चंद्रकांत गावकर, गुरू गावकर यांच्यासह पत्रकार विश्वनाथ नेने यांनी संजय पाटील यांच्या कुळागराला भेट दिली.
जीवामृत ठरले वरदान!
संजय पाटील यांच्या कुळागरात मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता होती. पण जमिनीत बोगदे मारून पाण्याचे स्रोत मिळवत त्यांनी त्यावर यशस्वी मात केली. त्याचबरोबर जीवामृताचाही आपल्या कुळागराला मोठा फायदा झाल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. कुळागरात वापरल्या जाणाऱ्या जीवामृताची माहितीही पाटील यांनी सोनाळच्या बागायतदारांना दिली.
हे अशा तऱ्हेचे बोगदे मारणे हे खूप कठीण आणि जीवावर बेतणारे असे काम होते. पण कुळागर वाचविण्यासाठी हे करण्यावाचून कोणताच दुसरा पर्याय नव्हता. कित्येक महिने सतत खणून हे बोगदे मारण्यात आले व शेवटी पाण्याचे स्रोत हाती लागले.
- संजय पाटील, प्रगतशील शेतकरी
असे बनवतात जीवामृत!
शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन यांचे मिश्रण करून जीवामृत तयार करण्यात येते. जीवामृतामुळे जमिनीतील घटक वाढतात आणि त्याचा फायदा पीकवाढीवर होतो.
रासायनिक खते न वापरता पूर्णपणे जीवामृताचा वपर बागायतीत करणे संयुक्तिक ठरते, असे पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.