Prostitution Case: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईमुळे गोव्यात विदेशी युवतींची तस्करी करून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला खरा, परंतु ईडीने केलेल्या कारवाईमुळे हे प्रकरण चर्चेत आले असले, तरी गोव्यातच नव्हे, तर देशात अशाप्रकारे मानवी तस्करी होत असावी.
त्यामुळे या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे (एनआयए) व्हावा, अशी मागणी अन्याय रहीत जिंदगी (अर्ज) या संस्थेचे संस्थापक अरुण पांडे यांनी ‘गोमन्तक’च्या माध्यमातून केली आहे.
पांडे यांनी सांगितले की, ईडीच्या कारवाईमुळे गोव्यात वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त झाले हे खरे असले, तरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युवतींची तस्करी होत असल्याची बाब चिंतेची आहे. या प्रकरणात जो केनियन नागरिक न्यूटन किमाणी याला ताब्यात घेतले आहे, त्याच्याकडे अनेक माहिती असणार आहे.
देशभर याचे जाळे विणलेले असू शकते. वेश्या व्यवसायात असलेल्या मुलींच्याकडील मोबाईलवरील ‘एम पैसा’ ॲप किंवा क्यूआर कोडद्वारे थेट रक्कम किमाणी याच्या खात्यात जात होते. त्यातूनच हा पैसा विदेशी बँकांमध्येही हवालामार्गे गेला असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले असावे. त्यामुळेच ही कारवाई झाली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
म्हणूनच युवतींची सुटका
ईडीच्या कारवाईवेळी हणजूण पोलिस व आम्ही पुढाकार घेतल्यामुळे केनियन युवतींची त्यातून सुटका झाली आहे. मात्र, अशाप्रकारचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करायचे झाल्यास ते पोलिसांकडून होणार नाही, तर त्यासाठी हे प्रकरण ‘एनआयए’कडे सोपवावे. एनआयएकडे मानवी तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहे, ते अशा प्रकरणाच्या मुळाशी निश्चित जातील, अशी आशा आम्हाला वाटते, असेही पांडे म्हणाले.
मानवी तस्करी चिंताजनक
महत्त्वाची बाब म्हणजे देशात होत असलेल्या मानवी तस्करीचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे विदेशी युवतींची तस्करी करून त्यांना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलले जात असावे आणि केवळ गोव्यातच असा प्रकार घडत नसावा, तर देशभर तो विखुरलेला असावा, असा आपला अंदाज आहे, असे अरुण पांडे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.