केंद्र सरकारने जीएसटीमध्ये केलेली घट कशी व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना लाभदायक आहे, याबाबत पणजीतील दुकाने फिरत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रके वाटून जागृती करत होते. पत्रके वाटत मुख्यमंत्री सोन्याच्या दुकानात गेले त्यावेळी भाजप कार्यकर्ता असलेली एक महिला म्हणाली, ‘दोतोर भांगर सवाय कर’ .... मुख्यमंत्री यावेळी माध्यमांशी बोलत असल्याने त्या महिलेला प्रतिसाद देऊ शकले नाहीत, परंतु ती महिला मुख्यमंत्र्यांजवळ गेली आणि तिने पुन्हा सांगतले की, दोतोर भांगर सवाय कर त्यावेळी मुख्यमंत्री त्या महिलेला म्हणाले मोदींनी आता जीएसटी कर कमी केला आहे, येत्या काळात सोन्याचे दर देखील कमी होतील... त्यामुळे ‘भिवपाची गरज ना’... त्यांच्या या उत्तराने त्या महिलेचे समाधान झाले आणि ‘भांगर सवाय कर, भांगर सवाय कर’चा नारा थांबवला ∙∙∙
जीएसटी दरात झालेल्या कपातीमुळे राज्यात उत्साहाचे वातावरण आहे आणि खरेदीला मोठा वेग आला आहे. मात्र, काही जाणकारांच्या मते यात अजूनही काही त्रुटी आहेत. आता या त्रुटी नेमक्या काय आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे. या त्रुटी विरोधक लोकांच्या लक्षात आणून देतील, अशी अनेकांना अपेक्षा आहे, पण त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. जर विरोधकांनी या त्रुटींवर आवाज उठवला नाही, तर याचा अर्थ त्यांनी सरकारच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे, असे मानले जाईल. सध्या हीच चर्चा राज्यभर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जीएसटी कपातीचा सर्वसामान्यांना खरोखरच फायदा होणार की यात काही छुपे अडथळे आहेत, हे येणारा काळच दाखवेल. ∙∙∙
रामा काणकोणकर मारहाण प्रकरणी मुख्य सूत्रधार कोण, हे अद्याप बाहेर आलेले नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणी सावध पवित्रा सोमवारी घेतला. पोलिस तपास करत आहेत तेच याबाबतीत सांगू शकतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार दाजी साळकर व भायजुमोचे अध्यक्ष तुषार केळकर यांनी मुख्य सूत्रधारासही पकडले, असे विधान केले. यामुळे साहजिकच मुख्य सूत्रधार कोण, अशी विचारणा पत्रकारांकडून झाली. त्यावर पोलिस तपास करत आहेत, असे सांगून वेळ मारून नेण्याची वेळ आली. तरीही मुख्य सूत्रधार कोण याची चर्चा मात्र थांबलेली नाही. ∙∙∙
बीसीसीआयवर जीसीएचे प्रतिनिधीत्व रोहन गावस देसाई यांनी करावे. त्या बदल्यात त्यांनी जीसीएच्या निवडणुकीतून आपल्या समर्थकांना मागे घ्यावे असा प्रस्ताव त्यांना देणदेण्यात आला होता. मात्र जीसीए आणि बीसीसीआयवरील प्रतिनिधीत्व या दोन्ही गोष्टी आपल्यालाच हव्यात असा अट्टहास रोहन यांनी धरला. बीसीसीआयचे पदही गेले आणि संघटनेवरील पकडही सुटली. यामुळे त्यांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटला अशी खिल्ली काहीजण खासगीत का होईना उडवू लागले आहेत. बीसीसीआयचे संयुक्त सचिवपद हे मानाचे पद हातचे गेल्यामुळे समोरच्या व्यक्तींच्या वर्तणुकीत कसा फरक पडतो याचा अनुभव अद्याप त्यांना यायचा आहे, असेही बोलले जाऊ लागले आहे. ∙∙∙
‘ओंकार’ या पेडणे तालुक्यात शिरलेल्या रानटी हत्तीने गोवा सरकराला कर्नाटकाचा धावा करण्यास भाग पाडले आहे. हत्ती पकडण्याचे प्रशिक्षण कर्नाटकाच्या वन कर्मचाऱ्यांना दिलेले आहे. त्यांच्याकडे माहूत आणि प्रशिक्षित हत्तीही आहेत. त्यांच्या मदतीने ‘ओंकार’ला पकडून महाराष्ट्राच्या स्वाधीन करण्याची योजना आखण्यात आली आहे. आता कर्नाटकाचे पथक कधी येते आणि ‘ओंकार’चा बंदोबस्त कधी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यासाठी कर्नाटकाचा धावा करण्याची वेळ वन खात्यावर आली आहे. यापूर्वी गोव्याचे तत्कालीन वनाधिकारी अनिल शेटगावकर व परेश पोरोब यांनी आलेल्या रानटी हत्तींना गोव्याच्या हद्दीबाहेर कसे हाकलले होते, त्याच्या सुरस कथा ऐकावयास मिळत आहेत. ∙∙∙
आयआयटीवरून कोडार गाव आता ‘फेमस’ झाला आहे. कोडारला आयआयटी आणण्याचा सरकारचा डाव सपशेल उधळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोडारला भेट देऊन तेथील ग्रामस्थांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. स्थानिकही सध्या खूष आहेत, कारण भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा त्यांना मिळाला आहे, त्यामुळे आयआयटीचे शुक्लकाष्ठ कोडार गावातून हद्दपार होईल, असा विश्वास स्थानिक व्यक्त करताना दिसत आहेत. आयआयटीवरून मागच्या चार जागांवर सरकारची निश्चिती झाली नाही, त्यामुळे आता पाचवीही जागा सरकारच्या हातून निसटल्यात जमा आहे, लोकच बोलताहेत हे...! ∙∙∙
क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी अखेर गोविंद गावडेंसोबतचा वाद न वाढवण्याचे ठरवले आहे. त्यांनी गावडे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर गावडे यांनीही आणखी शाब्दीक शरसंधान केले. त्याला सोमवारी तवडकर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे पत्रकारांकडून त्यांना विचारणाही झाली. मात्र समंजसपणे आपल्यापुरता तो वाद संपला असे सांगत त्यांनी विषय गुंडाळला. जाता जाता चिखलावर दगड मारून चिखल अंगावर का उसळवून घ्यायचा असे म्हणत बोचकारे काढलेच. गेले काही दिवस हा वाद विकोपाला गेल्याचे दिसत होते. आता तवडकर यांनी समंजसपणाची भूमिका घेतली असल्याचे दिसत असले तरी त्यांनी तलवार म्यान का केली याची सुरस चर्चा मात्र सुरू झाली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.