
हल्लीच झालेल्या जीसीएच्या निवडणुकीत रोहन गावस यांच्या पॅनलचा पराभव केल्यामुळे चेतन आणि बाळू पॅनलचे सदस्य सध्या आनंद व्यक्त करत आहेत. सुरुवातीला या निवडणुकीचे पारडे मुख्यमंत्र्यांची साथ असल्यामुळे रोहनच्या बाजूने झुकल्याचे सांगितले जात होते. पण रोहनला ज्या क्लबनी आमचा पाठिंबा तुलाच असे सांगितले. त्यांनीच शेवटी घुमजाव करत चेतन-बाळूच्या पॅनलच्या बाजूने मत दिले. असे म्हणतात, यात काही कुडचडे आणि सावर्डे या भागातील क्लबांचाही समावेश आहे. ही मते फोडण्यासाठी एका मतामागे पाच लाख रुपये हा दाम ठरला होता असे सांगितले जाते. आता या आरोपात किती तथ्य आहे ते माहीत नाही. पण कुडचडेत काहीजणांचे नाव घेत यांनी पाच लाख रुपये घेतले असे खुलेआम सांगितले जाते एवढे मात्र खरे. ∙∙∙
क्रीडा संचालक आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ. अजय गावडे यांना प्रसिद्धी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काही प्रकार घडले. त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. याविषयी त्यांना जाणतेपणाने सल्ला देण्याचा अधिकार बजावण्यात आला आहे. सरकारमधील एका जबाबदार व्यक्तीने हे काम केल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. गावडे यांच्या कामाविषयी सरकारला काही किंतू नाही, पण ते करताना प्रसिद्धीपासून त्यांनी दूर रहावे असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. त्याचे पालन ते आता कसे करतात यावरच त्यांच्यावरील शिस्तभंग कारवाईबाबतचा निर्णय अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे. ∙∙∙
महत्त्वाकांक्षी असण्यात काही गैर नाही. जीवनात महत्त्वाकांक्षी माणसेच यश संपादन करू शकतात. गोवा क्रिकेट संघटनेवर वर्चस्व मिळविण्यात यश मिळालेल्या चेतन देसाई यांची महत्त्वाकांक्षा आता वाढली तर त्यात नवल नाही. चेतन देसाई आता आपली राजकीय महत्वाकांक्षा यशस्वी करण्याच्या तयारीत लागल्याची चर्चा काणकोणात सुरू झाली आहे. चेतन काणकोण मतदारसंघावर आता दावा करणार व पुढील विधानसभेच्या निवडणुकीत काणकोण मतदारसंघातून निवडणुकीत उतरणार, असा दावा चेतन समर्थक करतात. आता चेतन कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर दावा करणार हे अजून गुलदस्त्यात आहे. आता पाहूया महत्त्वाकांक्षा सत्यात उतरते की नाही. ∙∙∙
समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी राजधानी पणजीत प्राणघातक हल्ला झाला. आतापर्यंत सात जणांना यामध्ये अटक झाली आहे. तसेच, या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराला पकडा, अन्यथा गोवा बंद करू असा इशारा काल पणजीत काढलेल्या मोर्चावेळी आंदोलकांनी दिला आहे. यावरून प्रत्येकजण सरकारवर सध्या टीका करत आहे. अशातच समाज कार्यकर्ते संजय बर्डे यांनीही सरकारवर तोंडसुख घेतले. ज्या संशयितांना अटक झाली आहे, त्यापैकी एकाचा फोटो त्यांनी शनिवारी माध्यमांना एका विद्यमान आमदारांसोबत दाखविला. त्यांनी थेट त्या आमदाराचे नाव घेतले नाही, पण फोटो दाखवून आपले म्हणणे मांडले. आता पुढारी नेते म्हटले की, अनेकजण आमदार, मंत्र्यांसोबत फोटो काढत असतात. आता जो वरील फोटो बर्डे यांनी दाखविला, तो देखील याच कक्षेत मोडतो की त्याला दुसरे कारण आहे, हे देवच जाणे! पण रामा यांच्यावरील हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण बरेच तापले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा जोपर्यंत मुख्य सूत्रधार कोण? हे सांगत नाही, तोवर अनेक तर्कवितर्क अन् चर्चांना तोंड फुटणार हे नक्की... ∙∙∙
कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन २०१२ ते २०१७ या कालावधीत आपण मंत्री असताना सत्तेत नसलेल्या गोविंद गावडे यांनी आपल्या खात्यातून सत्तेचा उपभोग घेतला. त्यावेळी तेही गुळाच्या ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे वावरत होते ,असा आरोप केला. गोविंद गावडे हे आपल्याला जवळ असल्यामुळे आपल्याला सुदिन ढवळीकरांचा रोष पत्करावा लागला आणि त्याचा फायदा काणकोणातील आपल्या विरोधकांनी घेतला. २०१७ मध्ये आपल्याला काणकोणातून उमेदवारी न मिळण्यामागे गोविंद गावडे यांच्याकडे असलेली जवळीक हे एक कारण होते, असे तवडकर यांनी सांगितले. तवडकर सध्या सगळेच पत्ते खोलण्याच्या मूडमध्ये आहेत, असे वाटते बुवा! ∙∙∙
रामा काणकोणकर वरील हल्ल्यामुळे एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे विरोधकांची एकजूट. एरवी समोरुन कोणी गेला तर स्माईल देण्याचे सोडाच, पण साधी दखल न घेणारे अनेकजण सोशल मीडियावरील एका आवाहनानंतर हातात असलेली सगळी कामे बाजूस ठेवून आझाद मैदानावर दाखल झाले, तेही काळा पेहराव धारण करुन. या घटनेमुळे गेले काही दिवस विरोधी आघाडीच्या भवितव्याबाबत निराश झालेल्यांच्या मनांत म्हणे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण त्यांची ही एकजूट रामापुरतीच असून नये, तर प्रत्येक मुद्यासाठी असावी, अशी लोकभावना आहे. त्याला ही मंडळी कसा प्रतिसाद देतील, ते येणाऱ्या काळातच कळेल. ∙∙∙
दक्षिण गोव्यातील कोलवा हा जागतिक ख्याती लाभलेला समुद्र किनारा तेथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्यासाठी पर्रिकर सरकारने योजना तयार केली होती. पण कोणत्याही योजनेला अपशकून करण्यात गोव्यातील मंडळीचा हात धरणारा कोणी नसतो. त्यामुळे गेली दहा वर्षे ही योजना रखडली. एका बाजूने कोणत्याही गोष्टीला विरोध करणे व दुसरीकडे पर्यटकांना सुविधा नाहीत, अशी ओरड करणे हा प्रकार चालू होतो. पण आता संबंधितांना म्हणे सुबुद्धी सुचली आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी तेथील आस्थापने स्थलांतरित करण्यासही तयारी दर्शवली आहे. हेच त्यांना दहा वर्षांपूर्वी सूचले असते, तर एव्हाना कालव्याचा कायापालट झाला असता? असे म्हटले जात आहे. ∙∙∙
दिव्यांग आयोगातर्फे पुढील महिन्यात पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पर्पल फेस्ट करण्याचा आयोजकांचा मनोदय आहे. या फेस्टचे निमंत्रण आयोगाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिशांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत दिले आहे आणि अजूनही ते देत आहेत. आता त्यांनी बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमीर खान यालाही फळदेसाई यांनी या फेस्टचे निमंत्रण दिले आहे. त्यांच्याबरोबर आयोगाचे अधिकारी ताहा आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. फळदेसाई आणि ताहा यांच्याकडून त्यांनी या फेस्टविषयी आणि राज्यातील दिव्यांग आयोगाच्या कामाविषयी माहितीही जाणून घेतली. अमीर खान यांनी या फेस्टचे निमंत्रणही स्वीकारले असल्याने ते हजेरी लावतील, अशी दाट शक्यता आहे.∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.