पणजी: देशभरात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान संपल्याने आता सर्वांना मतमोजणीचे वेध लागले आहेत. देशातील बहुसंख्य माध्यम समूहाने केलेल्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या आघाडीला सर्वाधिक 16 ते 18 जागा मिळतील तर भाजपला 14 ते 16 जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात 2017 प्रमाणेच त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे अंदाज या चाचण्यांमधून पुढे येत आहे. यामुळे मगोप-तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अपक्षांचे महत्त्व वाढणार असून ते सत्तेत महत्वाची भूमिका बजावणार असा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशमधील अखेरच्या टप्प्यासाठी मतदान संपताच आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मतदानोत्तर कलचाचणीचे अंदाज आज जाहीर झाले. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभेसाठी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मतदान झाले. यापैकी देशाच्या राजकारणावर परिणाम करू शकणाऱ्या उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे अधिक लक्ष आहे. 2017 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 403 जागांपैकी 325 असे प्रचंड बहुमत मिळाले होते. यावेळी मात्र या जागा कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत होता.
विविध संस्थांनी घेतलेल्या कलचाचण्यांमधूनही तोच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपच्या यंदा 60 ते 80 जागा कमी होऊ शकतात, असे चित्र आहे. भाजपला समाजवादी पक्षाने जोरदार टक्कर दिली असली तरी या पक्षाला 125 ते 150 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेससह इतर पक्षांची कामगिरी सुमार होण्याचा अंदाज असल्याने कोणत्याही आघाडीची शक्यता नसून भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. उत्तराखंड वगळता काँग्रेसला इतर कोणत्याही राज्यात चांगली कामगिरी करता न आल्याचे चित्र आहे.
उत्तर प्रदेशनंतर पंजाबमधील निवडणूक सर्वाधिक गाजली. या राज्यात काँग्रेसला सत्ता गमवावी लागेल, असा कलचाचण्यांचा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून येथे दबदबा निर्माण केलेल्या आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे या अंदाजातून दिसत आहे. काँग्रेसला 117 पैकी 20 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
राज्यात बहुमतासह काँग्रेस सत्तेवर येईल असा अंदाज आहे. जनमत चाचण्यांच्या आधारे सुद्धा काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असे म्हटले आहे. मात्र, आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन सत्ता स्थापन करू.
- दिगंबर कामत
गोव्यात जनमत चाचण्यांच्या आकडेवारीनुसार भाजपला 18 ते 22 जागा मिळतील. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल. यूपी, उत्तराखंड व मणिपूरमध्ये भाजप सत्तेवर येईल तर पंजाब मध्ये भाजपची कामगिरी चांगली राहील.
- डॉ. प्रमोद सावंत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.