गोविंद गावडे प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना थेट गृहमंत्री अमित शहा यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. परंतु ते राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांच्याशी चर्चा करू शकले असते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय सांगतात, त्यांना गावडेंना काढून टाकण्याची कसलीही घाई नाही. गुरुवारी दिवसभर ते वेगवेगळ्या कार्यक्रमांत होते व संध्याकाळी ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबरही होते. परंतु त्यांची देहबोली तणावाची वाटली नाही. कठीण राजकीय निर्णयाचे त्यांच्यावर ओझे आहे असेही वाटले नाही. पत्रकारांचा थेट प्रश्न त्यांनी टाळला. दामू नाईक यांनी मात्र हा गंभीर राजकीय प्रश्न असल्याचे मानून तातडीने राज्यात येणे पसंत केले व लागलीच ते पक्ष कार्यालयात गेले...∙∙∙
गेले दोन दिवस मंत्री गोविंद गावडे ज्या पद्धतीने वागले, बोलले त्याबद्दल भाजपच्या प्रतिमेवर निश्चित परिणाम झाला. परंतु मुख्यमंत्री मोघम बोलले. कारवाईचे संकेत दिले. परंतु त्यानंतर दोन दिवस लोटले तरी प्रत्यक्ष काही घडले नाही. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये याची चर्चा सुरू आहे. गाभा समितीचे सदस्य एकमेकांच्या संपर्कात आहेत. ताबडतोब काहीतरी व्हायला हवे होते, तसे ते सांगतात. मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेचा प्रश्न अनेक महिने प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम होत आहे. परंतु दामू नाईक प्रदेशाध्यक्ष होताच, त्यांनी जी धडाडी दाखवली व पक्षशिस्तीबद्दल जाहीर वाच्यता केली, त्यामुळे गाभा समितीचे सदस्य खुश आहेत. मात्र, हे ज्येष्ठ सदस्य असेही म्हणतात की दामू जाहीरपणे सुनावतात ते बरे आहे, परंतु प्रत्यक्ष कृती मुख्यमंत्र्यांनी केल्याशिवाय काही होणार नाही! ∙∙∙
गोविंद गावडे प्रकरणात कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले असले तरी अद्याप त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ सदस्य किंवा गाभा समितीशी सल्लामसलत केलेली नाही. यापूर्वी ढवळीकर बंधूंना मंत्रिमंडळातून काढून टाकताना लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गाभा समितीचा सल्ला घेतला होता. मनोहर पर्रीकर यांनी बाबूशना बाहेरचा रस्ता दाखवतानाही गाभा समितीशी चर्चा केली होती. परंतु अद्याप मुख्यमंत्र्यांना ज्येष्ठ सदस्यांशी चर्चा करावीशी वाटलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री गुरुवारी रात्रीपर्यंत तरी गावडेंविरोधात कारवाई करण्यात गंभीर नाहीत असाच पक्षाचा समज झाला होता. त्यामुळे गावडे यांना राजकीय व्यूहरचना आखण्यास अवधी मिळाला व गुरुवारी ते दिवसभर ‘उटा’च्या नेत्यांबरोबर फिरताना दिसले... ∙∙∙
गोवा घटक राज्य दिनाचा जाहीर कार्यक्रम घेणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची प्रथा आणि अगतिकता आहे. मोर्चे, जाहीर कार्यक्रम यशस्वी करून दाखवणे, हाही एक मोठा कार्यक्रम असतो. फक्त कार्यक्रम घेऊन चालत नाही, तो यशस्वीही करून दाखवावा लागतो. आता हेच पाहा ना; काँग्रेसने नावेलीत घटक राज्य दिनाचा कार्यक्रम असल्याचे जाहीर केले. व्हॉट्सअॅपवर निमंत्रण सर्वत्र फिरलेही. नंतर अचानक यात बदल करून कार्यक्रम पणजीच्या ‘झेड स्क्वेअर’मध्ये घेण्यात येणार असल्याचे निमंत्रण फिरले. जीपीसीसीने ‘जास्त पाऊस पडण्याची शक्यता’ असे कारण दिले. मांडव घालूनही कार्यक्रम करता आला असता. पावसाचे कारणही खरे धरले, तर निवडलेला हॉल लगेच भरेल, इतका बारीक का निवडला? यामागचे खरे कारण जास्त पाऊस पडण्याची भीती नसून, कमी गर्दी होण्याची भीती असल्याची कुजबूज सध्या जोरात, न घाबरता सुरू आहे. ∙∙∙
घटक राज्य दिनानिमित्त भाजप आणि काँग्रेसने राजधानीत बॅनरबाजी केल्याचे दिसून आले आहे. राज्यातील भाजप सरकारच्यावतीने कला अकादमीमध्ये सकाळी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर काँग्रेसने सम्राट थिएटरच्या झेड स्क्वेअरच्या हॉलमध्ये कार्यक्रम सायं. ४ वा. आयोजित केला आहे. या दोन्ही कार्यक्रमांविषयीचे फलक दोन्ही पक्षांनी ठिकठिकाणी लावले आहेत. दोनापावला येथील जॅक सिक्वेरा सर्कलभोवती दोन्ही पक्षांचे फलक शेजारी-शेजारी लावलेले आहेत. हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत, हे मात्र नक्की. भाजपात आलेल्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या पाहता अगोदरच भाजपवर काँग्रेसी सरकार म्हणून आरोप केला जात आहे. अशातच अशाप्रकारे शेजारी-शेजारी फलक लावून कार्यक्रमाची माहिती दिली गेल्याने नक्की दोन्ही पक्षांना काय संदेश द्यायचा आहे, हे दोन्ही पक्षांच्या धुरिणांनाच माहीत. ∙∙∙
काणकोण आरोग्य केंद्रात काल आपत्ती व्यवस्थापनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला काही स्थानिक लोकांनाही आमंत्रित केले होते. जर आपत्ती आली तर त्याला कसे तोंड द्यावे, यासंदर्भात काणकोण आरोग्य केंद्राच्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांत जागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या जागृती कार्यक्रमाला आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची गर्दी पाहून उपस्थित लोकांनी तोंडात बोटे घातली. एवढ्या मोठ्या संख्येने असलेले हे कर्मचारी बसतात कुठे व काम करतात काय? जेव्हा आरोग्य केंद्रात जातो तेव्हा ही गर्दी दिसत नाही. मग हे ‘मिस्टर इंडिया’ कर्मचारी कामाच्या वेळेत कुठे असतात, असा प्रश्न आता काणकोणकरांना पडणे स्वाभाविक आहे. ∙∙∙
‘सांग सांग भोलानाथ... पाऊस पडेल काय?’ हे गाणे सर्वश्रुत आहे. अशीच स्थिती सध्या गोव्यातील काही भागात दिसत आहे. राज्यातील अनेक प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. शिक्षण अधिकाऱ्यांद्वारे या कामांसंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविले आहे. अशातच येत्या ४ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. यादरम्यान जर पाऊस पडला आणि शाळांचे काम पूर्ण झाले नाही तर त्याचा दोष नेमका कुणाला दिला जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.