Goa Politics: खरी कुजबुज; मराठी भाषा का डावलली?

Khari Kujbuj Political Satire: पणजी शहर सरकारने स्मार्ट केले. त्यावर कोट्यवधींचा खर्चही झाला. तरीही सर्वसाधारण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही हे पणजीत ये जा करणारे सांगतात.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मराठी भाषा का डावलली?

सध्या क्रीडा प्राधिकरणाने घेतलेल्या एका परीक्षेवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेला डावलण्यात आल्याचा आरोप आहे, ज्यामुळे मराठी राजभाषा निर्धार समितीने सरकारला पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करत इशारा दिला आहे. राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांच्या मते, मराठीला डावलण्याचा प्रकार काही थांबत नाही आणि त्याला विरोध करण्याचा, इशारा देण्याचा प्रकारही थांबत नाही. त्यामुळे ‘क्रीडा प्राधिकरण आपल्या भूमिकेवर ठाम राहणार की मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मागणीपुढे झुकणार?’ हे पाहण्यात लोक आतुर झाले असून भाषाप्रेमींचे याकडे बारीक लक्ष्य आहे. ∙∙∙

स्मार्ट आंदोलन

पणजी शहर सरकारने स्मार्ट केले. त्यावर कोट्यवधींचा खर्चही झाला. तरीही सर्वसाधारण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही हे पणजीत ये जा करणारे सांगतात. एवढेच कशाला स्मार्ट सिटी विकासाच्या नावावर सोसलेल्या गैरसोयीची तर मोजदादच नाही. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडणे ही त्यातही सामान्य बाब. मात्र, स्मार्ट सिटीतील खड्डा हा तेवढाच चर्चेचा ठरतो. पणजीत ला कॅपिटल हॉटेलसमोरील रस्त्यात पडलेल्या खड्यात कोणीतरी रोपटे लावले आणि त्या स्मार्ट आंदोलनाची चर्चा सुरू झाली. ∙∙∙

सरकारकडून कारवाई होणार?

राज्यात समाजाच्या एकजुटीमध्ये फूट घालणारे राजकारणीच असतात हे हल्लीच सत्ताधारी मंत्र्यांनी केलेल्या आरोपातून उघड झाले आहे. समाजामध्ये अनेक नेते निर्माण झाल्यानंतर असे मतभेद तसेच वाद सुरू होतात. देवालयांमध्येही गटबाजी पाहायला मिळते. हे सर्व काही आपले वर्चस्व राखण्यासाठी खटाटोप असतो. अनुसूचित जमातीच्या बांधवांना असणाऱ्या योजना मिळण्यासाठी या समाजाच्या राजकारण्यांनी एकजूट केली तर ते शक्य आहे. मात्र, तसे न करता कित्येक वर्षांपासून खदखदत असलेला संताप एखाद्या कार्यक्रमातून तो व्यक्त करून उलट तोच राजकारणी आपले नुकसान करत असतो. कला व संस्कृतीमंत्र्यांनी हल्लीच जी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत त्याने ते चांगलेच अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी त्यांच्यावर कारवाई होईल अशी ग्वाही सरकारने दिली होती, मात्र, अखेर काहीच झाले नाही. त्यामुळे आताही कारवाई होईल यावर लोकांचा विश्‍वास नाही. ते बहुजन समाजाचे नेते आहेत. त्यामुळे कारवाई करताना केंद्र व राज्य सरकार पुरेपूर विचार केल्यानंतरच निर्णय घेण्याचा प्रयत्न करतील हे नक्की. ∙∙∙

आता नजरा दामूंकडे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आपला करिश्मा दाखवतील काय याकडे खुद्द भाजपवाल्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यांनी ज्या वेगाने मंत्री गोविंद गावडे यांच्यावर कारवाई होईल असे जाहीर केले, त्या वेगाने पुढील प्रक्रिया मात्र झाली नसल्याने दामू आता काय करतील याकडे अनेकांच्या नजरा आहेत. मंत्री आमदारांचे राजकीय भवितव्य आपण दिल्लीत देणाऱ्या अहवालावर अवलंबून आहे असा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात ते काय करतात हे पाहणे अनेकांची उत्सुकता वाढवणारे ठरले आहे. ∙∙∙

विरोधकांना गोविंदाचा पुळका

आपले राजकारणी रंग बदलण्यात सरड्यालाही मागे टाकतात, हे वारंवार अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. कालपर्यंत कला अकादमीवरून कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना आता गावडे सत्याचे पाईक वाटायला लागले आहेत की काय? असा प्रश्न काँग्रेस खासदार विरियातो व गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची विधाने वाचून जनतेला पडणे स्वाभाविक आहे. मंत्री गावडे यांनी भाजप सरकारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सत्य असून मंत्री गावडे यांनी सत्य बोलले म्हणून भाजपा टार्गेट करीत असल्याचे मत खासदार विरियातो यांनी व्यक्त केले आहे. विरियातोबाब मग कला अकादमी ज्याला आपण कालपर्यंत ताजमहाल, ताजमहाल म्हणून हिणवत होता व गोविंद गावडेंवर टीका करीत होता त्याचे काय झाले? गावडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली म्हणून तुम्ही गावडेंना पाठीशी घालता. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हे ब्रिद काँग्रेसने चांगले पकडले आहे असेच आता लोक म्हणू लागले आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: स्वखर्चाने कार्य करणाऱ्या राजेशरावांनी आता फेरीबोट देखील स्वखर्चाने आणून सेवेत रुजू करावी अशी चर्चा रंगली आहे
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak

गावडेंच्या पापात प्रकाश भागीदार?

स्वतःवर गर्व असण्यात काही गैर नाही. मात्र, माणसाला माज चढला की तो माज घातक असतो. मंत्री गावडे यांनी एसटी समाजाच्या प्रेरणा दिवसाच्या कार्यक्रमात बोलताना सरकारवरच नव्हे, तर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर व ट्रायबल खात्याच्या संचालकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. गावडे काय म्हणाले, कोणत्या थराला जाऊन आणि कोणत्या भाषेत सरकारवर बरसले हे सगळ्या जनतेने पाहिले. मात्र, गावडे यांचे निकटवर्ती व उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांना यात काहीही गैर वाटले नाही. प्रकाश म्हणतात, गावडे यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी कोणत्याही समाजावर व कोणत्याही मंत्र्यावर व अधिकाऱ्यावर आरोप केला नाही. प्रकाशबाब मग जी मुक्ताफळे गावडे यांनी उधळली ती काय प्रशंसा होती? गावडे यांच्यावर कारवाई झाली तर उटा त्यांच्या मागे असणार व एसटी समाजाला वेगळा विचार करायला लागणार अशा धमक्या देऊन आपणही गावडेंच्या पापात भागीदार होत आहात असे आपल्याला दिसत नाही का? असा सवाल नेटिझन उपस्थित करायला लागले आहेत. प्रकाशबाब म्हातारपणी उगाच चिखलावर दगड मारून चिखल का अंगावर घेतात? असा सल्लाही या समाजातील युवक प्रकाश यांना विचारायला लागले आहेत. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: चिराग नायकांना प्रवेश देऊन काँग्रेसने मारलेला तीर, दिगंबर कामतांना लागणार की नाही?

गावडे यांचा रोष सभापतींवर?

मंत्री गोविंद गावडे व सभापती रमेश तवडकर यांचा ३६ चा आकडा आहे हे सर्वश्रुत आहे. कधी कधी गावडे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सभापतींवर अप्रत्यक्षरीत्या टीका करीत असतात. तवडकरसुद्धा नंतर त्याला समयोचित प्रत्युत्तर देतात. हे दोघेही एरव्ही एसटी समाजाचे नेते, पण दोघांमधील कथित भांडणामुळे एसटी समाजामध्ये दोन गट पडल्याचे स्पष्ट जाणवते. एक प्रेरणा, तर दुसरे संकल्प दिन साजरे करतात. गावडे यांनी प्रेरणा दिनाच्या आपल्या भाषणात आदिवासी कल्याण खात्यावर जोरदार हल्ला चढवताना मुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत हे आवेशपूर्ण भाषणात कदाचित ते विसरले असावेत, पण त्यांचा रोष म्हणे सभापतींवर होता. आदिवासी कल्याण खात्यात सभापतींचा जास्त हस्तक्षेप असतो व तेच गावडे यांच्या रागाचे मुख्य कारण आहे असे ‘उटा’ संघटनेतील पदाधिकारीच आपसात बोलताना दिसत होते. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: भ्रष्टाचारी मंत्र्याला हकलण्याची हिंमत नसलेल्या मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा; माणिकराव ठाकरे कडाडले

प्रियोळ ‘पॅनिक मोड’मध्‍ये?

प्रेरणादिनासाठी फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरमध्‍ये जमलेल्या प्रेक्षकांमध्ये अर्ध्याहून जास्त लोक प्रियोळमधील मंत्री गोविंद गावडे यांचे कार्यकर्ते होते. त्‍यावेळी मंत्री आदिवासी कल्‍याण विभागावर तोंडसुख घेताना, त्यांनी मंत्र्यांच्या प्रत्येक मुद्याचे टाळ्या वाजवून समर्थन केले होते. आता याच भाषणावरून गोविंदभाऊंचे मंत्रिपद धोक्यात आलेले पाहून हे समर्थन ‘पॅनिक मोड’मध्ये गेले आहेत असे सांगण्‍यात येते. यातील कित्येकांनी क्रीडा खात्यात सुरू असलेल्या नोकरभरतीसाठी मोठ्या आशेने परीक्षा दिली होती. आमचे काम होईपर्यंत तरी भाऊंकडे मंत्रिपद राहू दे, असे मागणे हे उमेदवार आता देवाकडे करीत असावेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com