पणजी: कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावरील कारवाई अटळ आहे. असे असले तरी मंत्रिमंडळातील अन्य फेरबदलांची चाचपणी भाजपने सुरू केली आहे.
दिल्लीत उद्या (ता. ३०) किंवा परवा (ता. ३१) गोव्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचे नियोजन आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आज मध्यरात्रीनंतर दिल्लीत डेरेदाखल झाले. ते दोन दिवस दिल्लीत असतील. उद्या (ता. ३०) घटकराज्य दिन असल्याने संभाव्य राजकीय घडामोडी नकोत, असे भाजपने ठरवल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शासकीय निवासस्थानी बैठका घेतल्या. सकाळी त्यांनी कोलवाळ कारागृहात काही उपक्रमांची सुरुवात केली, तर काही उपक्रमांची पायाभरणीही केली. त्यानंतर ते मंत्रालयात आले.
त्यांनी दिवसभर नियोजित कामकाज केले. सायंकाळी सव्वासात वाजता ते साखळीला रवाना झाले. त्यांनी या विषयासाठी आज आपला वेळ खर्ची घातला नाही. वेळात वेळ काढून त्यांनी वास्कोत जाऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच मंत्रिमंडळातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनीही आज नियमित कामकाज केले.
मंत्री गोविंद गावडे हे सायंकाळी कला अकादमीतील कार्यालयात होते. त्यांच्यासोबत ‘उटा’ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप होते. वेळीप यांनी गावडे यांच्यावरील संभाव्य कारवाईविरोधात इशारा दिला आहे. गावडे यांनीही माध्यमांशी याविषयी बोलण्यास नकार दिला. ते माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून थांबले नाहीत. त्यांची देहबोली ‘सारे काही आलबेल नाही’ याचे संकेत देत होती.
गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून काढणार का किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले आहे. त्यांना गुरुवारी सायंकाळी वारंवार विचारणा केल्यावरही त्यांनी हात जोडून स्मित करण्यापलीकडे याविषयी अवाक्षरही काढले नाही. दिल्लीला आपण अहवाल दिला आहे. तेच काय तो निर्णय घेऊ देत, अशी त्यांची भूमिका दिसते.
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या घडामोडींमध्ये मंत्रिपदासाठी चर्चेत असलेले सभापती रमेश तवडकर हेही आज राजधानी पणजीपासून दूर होते. त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार देव दर्शनासाठी श्री क्षेत्र मुरुडेश्वर येथे जाणे पसंत केले. सायंकाळी उशिरा ते गोव्यात पोचले. मात्र, तेव्हाही राजधानीतील राजकीय हालचालींनी गती घेतलेली नव्हती.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे उशिराने गोव्यात पोचले. त्यामुळे भाजप कार्यालयात आज नियोजित बैठक होऊ शकली नाही. मुख्यमंत्रीही भाजप कार्यालयातून निरोप न आल्याने साखळीला निघून गेले. त्यामुळे दामू आणि मुख्यमंत्री यांंची नियोजित भेट आज झाली नाही. त्यांनी मोबाईलवर या राजकीय घडामोडींविषयी चर्चा मात्र केली. दामू यांनी आपण दोन दिवसांसाठी दिल्लीला जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
१ दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठी उद्या (ता. ३०) आणि परवा (ता.३१) विविध बैठकांत व्यस्त आहेत.
२ देशभरातील मोजक्या नेत्यांना त्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित व्याख्यानांना आमंत्रित केले आहे.
३त्यानिमित्ताने त्यांच्यासोबतच्या अनेक बैठका नियोजित केल्या आहेत.
४ या व्याख्यानांसाठी राज्यातून खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर, शर्मद रायतूरकर, विद्या गावडे, गौरी शिरोडकर, सर्वानंद भगत, गिरीराज पै वेर्णेकर आणि आमदार दाजी साळकर यांना निमंत्रण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.