Goa Miles Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: ‘गोवा माईल्स’चे सरकारकडून समर्थन; साडेआठ कोटींचा महसूल मिळाल्याचा दावा

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: इतर टॅक्सी व्यावसायिकांकडून १०० कोटींचे नुकसान; ५५ लाख प्रवाशांनी घेतली गोवा माईल्सची सेवा

गोमन्तक डिजिटल टीम

‘गोवा माईल्स’ या ॲपआधारित टॅक्सी सेवेचे सरकारने जोरदार समर्थन केले. या टॅक्सी सेवेसाठी मोपा विमानतळावर दिलेला काऊंटर बंद केला जाणार नाही, असेही वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत आज ठणकावून सांगितले. ‘गोवा माईल्स’कडून साडेआठ कोटींचा महसूल मिळाला. मात्र, इतर टॅक्सी व्यावसायिकांकडून १०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा गुदिन्हो यांनी केला.

‘गोवा माईल्स’ हे ठरलेल्या प्रवासी दरापेक्षा २० टक्के कमी दराने सेवा पुरवते, याकडेही वाहतूक मंत्र्यांनी प्रश्न विचारणारे पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचे लक्ष वेधले. आर्लेकर यांनी गोवा माईल्सच्या मोपा विमानतळावर किती गाड्या चालतात, ॲपआधारित टॅक्सी सेवा असताना त्यांना काऊंटर का दिला, अशी विचारणा विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला केली होती. सरकार हा काऊंटर कधी बंद करणार ते सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली. या टॅक्सी सेवेमुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांवर अन्याय होतो, याकडेही सरकारचे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मोपा विमानतळाचे उदघाटन झाले, त्यावेळी ‘गोवा माईल्स’ या सेवा पुरवठादाराने दाबोळीकडच्या टॅक्सी मोपाकडे वळवून सेवा बजावली होती, हेही विसरता कामा नये. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘गोंयचो टॅक्सी पात्रांव’ ही योजना आणली. त्यातून साध्या गाड्या बदलून चांगल्या गाड्या घेण्यासाठी अर्थसाहाय्य दिले गेले.

आजवर गोवा माईल्सची सेवा ५५ लाख प्रवाशांनी घेतली आहे. यात गोमंतकीयांचे प्रमाण जास्त आहे, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, देशभरातील सगळ्याच विमानतळांवर भारतीय विमान प्राधिकरणाने ॲपआधारित टॅक्सी सेवेसाठी काऊंटर दिले आहेत, याला मोपा विमानतळाचाही अपवाद नाही. याशिवाय मोठ्या रेल्वे स्थानकांवरही टॅक्सी सेवेचे काऊंटर आता सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही टॅक्सीच्या विषयावर यापूर्वी घेतलेल्या बैठकीतून अर्धे प्रश्न सुटले होते, असे नमूद केले. ते म्हणाले की, पुन्हा एकदा टॅक्सी विषयावर बैठक घेऊ. यावर विरोधी आमदारांकडून विधानसभेतच अर्धा तास चर्चेसाठी द्या, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या गदारोळातच सभापती रमेश तवडकर यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे जाहीर केले.

‘गोवा माईल्स’कडून साडेआठ कोटींचा महसूल

वाहतूकमंत्री गुदिन्हो म्हणाले की, ‘गोवा माईल्स’कडून सुमारे सात कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर तसेच दीड कोटी रुपयांचा प्राप्तिकर सरकारला मिळाला. पण राज्यातील १८ हजार टॅक्सी व्यावसायिकांकडून वस्तू व सेवा कर तसेच प्राप्तीकराच्या रूपाने सरकारचे शंभर कोटींचे नुकसान झाले आहे. टॅक्सी व्यावसायिकांनी स्वतःची ॲप बेस टॅक्सीसेवा सुरू करावी.

आकडेवारीवरून आमदारांचा दावा फोल

वाहतूकमंत्री गुदिन्हो म्हणाले की, मोपा येथील विमानतळावर ‘गोवा माईल्स’च्या ५१३ टॅक्सी आहेत. त्यातील ९० टक्के व्यावसायिक गोमंतकीय असून त्यातही ८० टक्के हे पेडणे तालुक्यातील आहेत. ‘गोवा माईल्स’शी संलग्न असलेल्या टॅक्सी व्यावसायिकांपैकी ९० टक्के जण स्वतः टॅक्सी चालवतात, तर केवळ दहा टक्के जणांनी चालक ठेवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

SCROLL FOR NEXT