पणजी: खाजन जमीन दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच पणजी, मेरशी, ताळगाव आणि सांताक्रुझमधील १५०.९८ हेक्टर खाजन जमीन इतर कामांसाठी वळवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘आयसीएलईआय’ या बिगरसरकारी संस्थेने एका प्रकल्पाअंतर्गत केलेल्या पाहणीत ही बाब उघड झाली आहे. या संस्थेने आज नागरी खाजनविषयक हस्तपुस्तिकेचे प्रकाशन गोवा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंकळ्ळीकर यांच्या हस्ते केले.
पर्वरीच्या विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भूषण भावे, प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर आणि संस्थेच्या दिल्लीस्थित समन्वयक मोनालिसा सेन उपस्थित होत्या.
ऋतिका फर्नांडिस यांनी केलेल्या सादरीकरणातून मिळालेल्या माहितीनुसार पणजी, ताळगाव, मेरशी व सांताक्रुझमध्ये १ हजार ७५.६८ हेक्टर खाजन जमीन होती. ही जमीन तिसवाडी तालुक्यातील खाजन जमिनीपैकी ७.७५ टक्के होती. यासाठी हा भूभाग महत्वाचा आहे. खारफुटीचे १० प्रकार या भागात आढळले आहेत.
खाऱ्या हवामानात वाढणारी ९४ प्रकारची फुलझाडे सर्वेक्षणात दिसली आहेत. विशेष म्हणजे १५ फुलझाडे ही खाऱ्या हवामानातील नसून त्या फुलझाडांनी खाजन जमिनींत अतिक्रमण केल्याचेही आढळून आले आहे. ११ प्रकारचे मासे आणि ४८ प्रकारचे कीटकही या चार गावांत मिळून सर्वेक्षकांना आढळून आले आहेत.
या भागात २००४ मध्ये किती खाजन जमीन होती याची माहिती नकाशांवरून त्यांनी मिळवली. आज अस्तित्वात असलेली खाजन जमिनीची तुलना करता १५०.९८ हेक्टर खाजन जमीन इतर कामांसाठी वळवण्यात आल्याचे दिसून आले आहे. हे क्षेत्र ११ टक्के भरते.
याचा अर्थ चार गावांत मिळून ११ टक्के खाजन जमीन घटली आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे. रस्ते, राडारोडा टाकण्यासाठी, बांधकाम टाकाऊ साहित्य फेकण्यासाठी या जमिनींचा वापर झाल्याचे दिसून आले आहे.
खाजन जमिनींत ३६३.९३ टक्के घट झाली आहे. खारफुटींचे प्रमाण शंभर टक्के वाढले आहे. आफ्रिकन कॅट फिशही खाजन जमिनीत आढळला असल्याची नोंद या सर्वेक्षकांनी घेतली आहे.
खाजन म्हणजे क्षारजन्य जमीन. ‘खज्जन’ असा शब्द सहाव्या शतकात वापरात होता. खाजन हा शब्द सोळाव्या शतकापासून रुढ आहे. म्हादई ही जीवनदायिनी तर खाजने ही धमण्यांत खेळणारे रक्त आहे.भूषण भावे, (प्राचार्य विद्याप्रबोधिनी)
मानवाच्या हव्यासापोटी बांधांना भगदाडे पडली. १८ हजार हेक्टर खाजन जमिनींपैरी आता जेमतेम १२-१३ हजार हेक्टर खाजन जमीन शिल्लक आहे. बांध बंदिस्तीसाठी आयआयटीकडून तंत्रज्ञान मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.डॉ. सतीश कुंकळ्ळीकर, (प्राचार्य कृषी महाविद्यालय)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.