धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आता वर्षभरानंतर दिवसाला 500 बाह्यरुग्ण तपासणीसाठी येऊ लागले आहेत. तपासणीसाठी केवळ 10 रुपयांचे शुल्क आणि मोफत औषधे हे अनेकांचे येथे पाय वळण्यासाठी आकर्षण ठरले आहे. केरळच्या धर्तीवर या संस्थेत पंचकर्म उपचारासाठी कुटिरांची निर्मिती करण्यात आली आहे. व्यसनमुक्ती केंद्रही सुरू करण्यात आले आहे.
या संस्थेला डिसेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले, की दिवसाला पाचशेहून अधिक बाह्यरुग्ण तपासणीसाठी येतात. सुमारे दीडशे ज्येष्ठ नागरिक दिवसाकाठी तपासणीसाठी येतात.
त्याशिवाय पंचकर्म उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. इस्पितळाच्या पहिल्या मजल्यावर त्याशिवाय इस्पितळासमोर उभारलेल्या कुटिरांत पंचकर्म उपचारासाठी सोय केली आहे. तेथे रुग्ण आपल्या कुटुंबीयांसमवेत राहून उपचार घेऊ शकतात. काहींना आपली ओळख उघड होऊ नये, असे वाटते अशांना अशा कुटिरांतील उपचारांकडे वळता येते.
यापूर्वी अशा उपचारांसाठी केरळसारख्या राज्यांत गोव्यातील रुग्णांना जावे लागत असे. आता आमच्या कुटिरांकडे लोक वळू लागले आहेत.
सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष
विदेशी नागरिकांना इस्पितळातील सेवा घेण्यासाठी पूर्ण पैसे भरावे लागतात, भारतीयांना केवळ 10 रुपयांची नोंदणी करून तपासणी करवून घेता येते ती सेवा विदेशींसाठी नाही, असे स्पष्ट करून कदम यांनी सांगितले, की अत्यंत सवलतीच्या दरात आमच्या इस्पितळात शस्त्रक्रियाही केल्या जातात. त्यासाठी सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष आहे.
व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन
व्यसनमुक्तीसाठी केंद्र सुरू केल्यावर दररोज पाच ते सहाजण त्या सेवेचा लाभ घेत आहेत. दारू सोडवण्यासाठी, अमलीपदार्थांपासून मुक्ती, सिगारेट सोडवण्यासाठी या केंद्रात समुपदेशन व उपचार केले जातात. तसेच मानसोपचारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
कर्मचारी भरतीवर भर
२० खाटांचे इस्पितळ आता ५० खाटांचे केले आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय प्रयोगशाळा चाचण्या अत्यंत वाजवी दरात केल्या जातात. क्ष-किरण तपासणी, अल्ट्रासोनोग्राफीची सोयही इस्पितळात केली आहे.
पदवी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात दुसरी तुकडी दाखल झाली आहे. सध्या कर्मचारी भरतीवर भर आहे. गोवा विद्यापीठाच्या परवानगीने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला जाईल, असे डॉ. कदम यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.