Shweta Kapila Cow Breed  Dainik Gomantak
गोवा

Shwetkapila cow Goa: गोव्याच्या भूमीत विकसित झालेली 'श्वेतकपिला' गाय; सरकारने राजाश्रय देण्याची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shweta Kapila Cow History And Importance

राजेंद्र. पां केरकर

सुमारे दोन दशलक्ष वर्षांपासून पृथ्वीतलावरती तृणपाती भक्षण करणाऱ्या प्राण्यांचे वास्तव होते. रानावनात आढळणाऱ्या या प्राण्यातून भारतीय उपखंडात गाय या प्राण्याचे आगमन झाले आणि सुमारे नऊ हजार वर्षांपासून गाईला इथल्या अश्मयुगीन मानवाने माणसाळण्यास प्रारंभ केला.

कालांतराने गाईत असलेल्या उत्पादनक्षमता आणि उपयुक्तता या गुणांमुळे ती भारतीय लोकमानसाला विशेष भावली. ‘बॉस इंडिकस’ ही वशिंडधारी गाय भारतीय उपखंडात निर्माण होऊन खुश्कीच्या मार्गाने तिचा आफ्रिकेपर्यंत प्रसार झाला. उष्णकटिबंधातील पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी वशिंडधारी गाय अनुकूल ठरलेली आहे.

सत्तरीतल्या म्हाऊस गावात झर्मे नदीच्या पात्रात हजारो वर्षांच्या इतिहासाशी नाते सांगणारी जी प्रस्तर चित्रे आढळलेली आहेत, त्यात वशिंडधारी बैलांचे प्राबल्य आहे. सांग्यातल्या नेत्रावळी गावातल्या बुडबुड्या तळीच्या सान्निध्यात असलेल्या गोपिनाथ मंदिरातल्या पाषाणी मूर्तीवरती, त्याचप्रमाणे केपे तालुक्यातल्या कावरे गावातल्या वीरगळावरील गुरांच्या चित्रांवरून इथल्या संस्कृतीत पूर्वापार असलेले गाय आणि बैलांचे महत्त्व अधोरेखित होते.

सत्तरीतल्या वेळग्यातले गौमळ आणि गोव्यात ठिकठिकाणी असलेली गायराने, ‘गोठण’ ही स्थलनामे गाईचे स्थान स्पष्ट करतात. माळरानावर उपलब्ध असलेली तृणपाती, कडबा, धान्यांचे दाणे काढल्यावर उरलेला कणसाचा भाग भक्षण करणारी गाय गोमंतकीय लोकमानसासाठी जगण्याचा महत्त्वाचा आधार ठरली होती.

दूध, दही, ताक, लोणी आदी दुग्धजन्य पदार्थांसाठी गोव्यात गाय पाळली गेली. भारतीय धर्मग्रंथांत वर्णन केलेल्या कामधेनूच्या प्राप्तीसाठी अपरिमित संघर्ष झाल्याचे प्रसंग आढळतात. कामधेनू गायीची प्राप्ती म्हणजे सर्व सुखसमृद्धीचे माध्यम मानलेले आहे. भारतीय धर्मग्रंथांनुसार कामधेनू ही दिव्य गाय असून तिला गोवंशाची माता मानलेली आहे. ती व तिची कन्या नंदिनी, पालनकर्त्यांची इच्छा पूर्ण करायची. सागरमंथनातून तिची प्राप्ती झाल्याचे मानले जाते आणि ती जमदग्नी, वसिष्ठ ऋषींच्या ताब्यात असल्याचे मानले जाते. तिच्या प्राप्तीसाठी बऱ्याच राजांनी प्रयत्न केले आणि त्यातून त्यांना ऋषीच्या अवकृपेला सामोरे जाण्याची पाळी आली याची वर्णने आढळतात.

भारतात आजच्या घडीस ‘डांगी’, ‘गीर’, ‘खिल्लारी’, ‘साहिवाल’, ‘अमृतमहल’, ‘कंधारी’ आदी गाईच्या प्रजाती आढळतात. दक्षिण भारतात आणि कोकणातल्या हवामानाला ‘कपिला’ गाय अनुकूल ठरलेली आहे. दक्षिण कर्नाटक ते केरळातील कासारगोड येथे कपिला गाईच्या प्रजातीला पाळण्यासाठी प्राधान्य दिले जायचे.

कोकणपट्टीत कपिला प्रजातीतून मध्यम आकाराचे शरीर, निमुळते डोके, काळे डोळे आणि मध्यम कान लाभलेली ‘कोकण कपिला’ ही गाईची प्रजाती विकसित पावली. कपिला गाईच्या दुधाला पवित्र मानल्याने, तिचे दूध तिरुपती तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वराच्या मंदिरात अभिषेकासाठी प्रामुख्याने वापरले जायचे. गाय ही गोमंतकीय आणि कोकणपट्टीतल्या लोकमानसासाठी पूर्वापार पावित्र्य, संपन्नता आणि मांगल्याचे प्रतीक ठरलेली आहे. त्यामुळे त्यांनी कपिला गाईचे लालन पोषण करण्याला एकेकाळी महत्त्व दिले होते. त्यातून गोव्याच्या भूमीत जी गाय विकसित पावली तिला आज ‘श्वेतकपिला’ हे नाव प्राप्त झालेले आहे.

जुन्या गोव्यातल्या भारतीय कृषी अनुसंसाधन केंद्रातल्या पशुशास्त्रज्ञांनी इथल्या गावोगावी आढळणाऱ्या गोवंशाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून तिच्या ठायी जी वैशिष्ट्ये आढळली, त्यांची अधिकृतरीत्या नोंदणी केली. गोवा राज्याची गाय म्हणून या गोवंशाला मान्यता प्राप्त व्हावी म्हणून हरियाणातील कर्नाल येथील भारतीय पशूच्या अनुवांशिक संसाधन कार्यालयाला प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावानुसार सप्टेंबर २०२०मध्ये ‘श्वेतकपिला’ ही गाय गोव्याचा गोवंश म्हणून अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब करण्यात आले.

स्वदेशी आणि स्थानिक प्रजातीच्या गोवंशाच्या पशुपालनाला गोवा सरकारने राजाश्रय देण्याची नितांत गरज आहे. श्वेतकपिला या गाईच्या दुधात मानवी आरोग्याच्या अभिवृद्धीस आवश्यक आणि उपयुक्त कोणते घटक जास्त प्रमाणात आहेत, त्यात औषधी गुणधर्म कसे आहेत, याचे संशोधन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मध्यम आकाराचे शरीर, सरळ चेहरा, आणि आखूड शिंगे, मध्यम आकाराचे पाठीवर असलेले वशिंड लाभलेली श्वेतकपिला, गोव्यातल्या खेडोपाडी पसरलेल्या कष्टकरी समाजाचे जगण्याचे समर्थ साधन ठरले होते.

परंतु गोव्यातल्या पशुसंवर्धन खात्याने जेव्हा भारत सरकारने हाती घेतलेल्या श्वेतक्रांतीनुसार दुग्ध उत्पादनाला वाव देण्यासाठी आणि राज्याला दुधाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने युरोपातल्या जास्त दुधाची पैदासी करणाऱ्या ‘जर्सी’, ‘होलस्टीन’सारख्या गाईच्या प्रजातींना राजाश्रय दिला. ‘जर्सी’, ‘होलस्टीन’ गाईच्या तुलनेत अडीच लीटरच्या आसपास दूध देणाऱ्या स्थानिक श्वेत कपिला गाईचे गोमंतकीय लोकमानसाला विस्मरण पडले. त्याचमुळे आज इथल्या कष्टकरी जातीजमातींसाठी साऱ्या संपत्तीचे भांडार एकेकाळी ठरलेला हा गोवंश भटका, उपद्रवकारक ठरलेला आहे.

एकेकाळी तेहतीस कोटी (प्रकारच्या) देवदेवतांची जन्मदात्री गायत्री म्हणून पारंपरिक लोकगीतांत जिचा गौरव ‘गायत्री/ गायतरी’असा केला ती वात्सलसिंधू भटकी ठरवून तिला गोठ्यातून विमुक्त केली. त्यामुळे आज गावोगावी रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ ठाण मांडून बसणारी, वाहतुकीला अडथळा होऊन, प्राणघातक अपघाताचे कारण ठरलेली आहे. या गाईच्या गोमयाने घरातली जमीन सारवली जायची.

गोमय (गाईचे शेण), गोमूत्र (गाईचे मूत्र), गाईचे दूध, दही आणि तूप यांच्या मिश्रणातून पंचगव्य तयार करून ते पवित्र म्हणून प्राशन करणारी पिढी गावंढळ ठरली. रासायनिक रंगरंगोटी, टाइल्स यांच्या आगमनामुळे शेणाने सारवलेल्या जमिनी इतिहासजमा होऊ लागल्या. गोमातेच्या भारतीय गोवंशाला पूर्वापार लाभलेला सन्मान आम्ही हिसकावून घेऊन, ती जागा ‘जर्सी’, ‘होलस्टीन’ गाईला दिलेला आहे.

त्यामुळे मधुमेही रुग्णांचे तांडेच्या तांडे गावोगावी उभे राहू लागलेले आहेत. ज्या गाईचे पालनपोषण करून भारतीय तत्त्वज्ञान सांख्य सिद्धांताचा प्रवर्तक ठरलेल्या कपिल ऋषीचा वारसा आम्ही विसरलेलो आहोत. या गाईच्या डोक्यावरती शिंगे, तिचे पाय डोळ्यांच्या भुवया आणि शेपटीचा तुरा यात श्वेतवर्णाचे प्राबल्य असल्यानेच या गाईला ‘श्वेतकपिला’ ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. गोव्यातल्या उष्ण, दमट हवामानाला पोषक ठरलेली माळरानावरचे मौसमी गवत आणि पालापाचोळा खाऊन पौष्टिक आणि औषधी गुणधर्मयुक्त दूध देणाऱ्या आपल्या गोमातेस आम्ही बेघर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई; निकृष्ट काजू आणि बेकायदेशीर सिगारेट जप्त!

Goa Sunburn: सनबर्नच्या 100 कोटी मानहानीच्या दाव्यावर पार पडली सुनावणी; काय म्हणाले कोर्ट वाचा

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Digital Arrest पद्धतीने अहमदाबादच्या महिलेची पाच लाखांची फसवणूक; CBI अधिकारी असल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT